राज्यातील लाखो विद्यार्थी व नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा निर्णय घेत जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेयर सर्टिफिकेट आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रासह शासकीय कार्यालयांमध्ये दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांवरील ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी या प्रमाणपत्रांसाठी नागरिकांना ३ ते ४ हजारांचा खर्च येत असे. मात्र, आता एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित (Self-Attested) अर्ज लिहून संबंधित प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून मिळू शकणार आहे.
महसूलमंत्री बावनकुळे यांनी या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना वेळ आणि पैशांची मोठी बचत होणार असून, सरकारी कामकाज सुलभ होईल.
या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळणार आहे. विशेषतः शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती, आणि इतर शासकीय योजनांसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांसाठी होणारा खर्च आणि किचकट प्रक्रिया सोपी होईल.राज्य सरकारच्या या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.