ज्येष्ठ मराठी साहित्यिक कै.जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होण्यापूर्वी त्यांच्या आरवली गावी स्मारकाची पायाभरणी करून पुढील दीड वर्षात स्मारक पूर्णत्वास नेण्याचा निर्धार नुकताच शिरोडा येथील खटखटे ग्रंथालयात आयोजित या संदर्भातील एका विशेष बैठकीत करण्यात आला.
शिरोडा (सिंधुदुर्ग) येथे गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपन्न झालेल्या प्रेरणा साहित्य संमेलनात कै.जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून दळवी यांच्या स्मारकासंदर्भातील सर्वानुमते पारित करण्यात आलेल्या ठरावाची प्रत्यक्ष कार्यवाही संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी आयोजित केलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कै.जयवंत दळवी यांच्या स्मारकाचा ध्यास घेतलेले उद्योजक रघुवीर मंत्री हे होते.
बैठकीत कै.जयवंत दळवी यांचे पुतणे तथा उद्योजक सचिन दळवी यांच्या अध्यक्षतेखाली ‘कै.जयवंत दळवी स्मारक समिती’ निवडण्यात आली. आजगांव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक तथा नामवंत कवी विनय सौदागर यांची उपाध्यक्ष म्हणून, तर मांद्रे (गोवा) येथील ‘साहित्य संगम’ चे कार्यवाह तथा निवृत्त प्राचार्य गजानन मांद्रेकर यांची कार्यवाह म्हणून निवड करण्यात आली.
उद्योजक रघुवीर मंत्री हे या समितीचे कोषाध्यक्ष आहेत. शिरोडा व्यापार संघाचे तथा खटखटे ग्रंथालयाचे अध्यक्ष राजन शिरोडकर, आंबा व्यावसायिक तथा खटखटे ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे व रोटरी क्लब ऑफ शिरोडाचे अध्यक्ष तथा आंबा वाहतूकदार जनार्दन पडवळ हे या समितीचे सदस्य आहेत. हे स्मारक पूर्णत्वास येईपर्यंत या प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी साप्ताहिक बैठक घेण्याचेही यावेळी ठरविण्यात आले.