राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शासन 'हॅपी सॅटर्डे' हा नवा उपक्रम राबवणार आहे.आचार संहिता संपल्यानंतर या उपक्रमाची घोषणा केली जाणार आहे. पुढील शालेय शिक्षण वर्षापासून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 'हॅपी सॅटर्डे' हा उपक्रम पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. या उपक्रमांतर्गत वही, पुस्तक म्हणजे दप्तर शनिवारच्या दिवशी शाळेत आणायचं नाही.
या दिवशी विद्यार्थ्यांना शेती, क्रीडा, कला, तंत्रज्ञान, विज्ञान या विषयीच्या विविध उपक्रमांचे प्रात्यक्षिक शिकवण्यात येणार आहे, .यासाठी विद्यार्थ्यांना मैदानात घेऊन जाण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना तणाव मुक्त करण्यासाठी शासनाचा उपक्रम असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या विद्यार्थी आणि तरुण मोबाईलमध्ये गुंतले आहेत. यामधून विद्यार्थ्यांना बाहेर काढत मैदानाकडे नेण्याचा यामागचा उद्देश आहे.