महिला दिनानिमित्त मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात महाविद्यालयातील महिला विकास कक्ष आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने 'महिलांविषयी कायदे' या मूल्यवर्धित अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याचा उदघाटन सोहळा संपन्न झाला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि महिलांना रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या वेगवेगळ्या कायद्यांची माहिती व्हावी या उद्देशाने दि. ११ ते १८ मार्च या कालावधीत हा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे.
या उद्घाटन समारंभासाठी कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे संचालक आणि महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ॲड. समीर गवाणकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी ॲड. गवाणकर यांनी प्राचीन भारतीय संस्कृतीमधील आणि इतिहासातील महिलांच्या योगदानाचा व कार्याचा गौरवपर उल्लेख करत विविध विदुषी आणि कर्तृत्ववान महिलांची उदाहरणे दिली. बॅ.नाथ पै सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी सेवांगणच्यावतीने या अभ्यासक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या अभ्यासक्रमाच्या समन्वयक डॉ. उज्वला सामंत यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचा परिचय करून देत अभ्यासक्रमाचे स्वरूप व वैशिष्ट्ये स्पष्ट केली. ॲड. सोनल पालव यांनी या अभ्यासक्रमासाठी शुभेच्छा देत अधिकाधिक विद्यार्थिनींनी व महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी महिला विकास कक्षाच्या या संकल्पनेचे कौतुक करत या कार्यक्रमासाठी सेवांगणच्या सहकार्याबद्दल आभार मानले. तसेच दि. ११ ते १८ मार्च या कालावधीत दररोज सकाळी ११ वाजता होणाऱ्या या कायदेविषयक उपक्रमाचा लाभ मालवण आणि परिसरातील महिलांनी घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव चंद्रशेखर कुशे, ॲड. उर्मिला आचरेकर, ॲड. प्राची कुलकर्णी, ॲड. पूजा शेडगे, ॲड. काजल झाड, ॲड. मानसी चव्हाण, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर उज्वला सामंत यांनी केले. प्रा. प्रमोद खरात यांनी सूत्रसंचालन केले. महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉक्टर सुमेधा नाईक यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी डॉ. उज्वला सामंत, डॉ. सुमेधा नाईक, डॉ. उर्मिला मेस्त्री, प्रा. नमिता राणे, प्रा. रश्मी राऊळ, ललिता कांदळगावकर, निकिता शर्मा यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.