सावरवाड येथील शिव मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यानिमित्त शुक्रवारी रात्री संपन्न झालेल्या महाशिवरात्री रागोत्सव कार्यक्रमात बनारस घराण्याचे हिंदुस्थानी शास्त्रीय गायक डॉ. आशिष मिश्रा यांच्या गायनाने शिवरात्र मंत्रमुग्ध केले तर रुद्रनाद फाउंडेशन ट्रस्टचे सर्वेसर्वा श्री रुद्रराज यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यरात्री भस्माभिषेक, शिवमंत्र जप आदी कार्यक्रम होऊन पहाटे या उत्सवाची सांगता झाली.
मालवण तालुक्यातील सावरवाड येथे रुद्रनाद फाउंडेशन ट्रस्टतर्फे नव्याने बांधण्यात आलेल्या शिव मंदिरात गेले दोन दिवस महाशिवरात्री उत्सवानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. या उत्सवात काल रुद्रनाद फाउंडेशन ट्रस्ट तर्फे महाशिवरात्री रागोत्सव हा गायन कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये बनारस घराण्याचे हिंदुस्थानी शास्त्रीय गायक डॉ. आशिष मिश्रा यांनी आपल्या सुमधुर सुरांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्यांना सारंगी - वसीम खान, तबला - पंडित ऋषिकेश फडके, हार्मोनियम - प्रसाद पांडुरंग गावस यांची संगीत साथ लाभली. बनारस घराण्याचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच अशाप्रकारचा गायन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास संदेश पारकर, अवधूत मालंनकर, संतोष राणे यांच्यासह बहुसंख्य संगीतप्रेमी उपस्थित होते.
यानंतर रात्री १२ वाजता महाशिवरात्रीचा लक्षणीय ठरलेला भस्मभिषेक करण्यात आला. तसेच १०८ वेळा शिवमंत्र जप आणि ध्यानधारणा करण्यात आली. हा कार्यक्रम सुमारे अडीज तास सिरप होता. यानंतर पहाटेच्या सुमारास या महाशिवरात्री उत्सवाची सांगता झाली. दोन दिवस चाललेल्या या उत्सवाचे नियोजन रुद्रनाद फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते