तब्बल १३ वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्ग सप्टेंबर प्रवाशांसाठी खुला होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या लोकार्पणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे गणपतीला कोकणात जाणार्या चाकरमान्यांसाठी ही बातमी दिलासादायक ठरु शकते.
ग्रीनफिल्ड कोकण एक्स्प्रेस वे नावाने ओळखला जाणारा हा रस्ता मुंबईला रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील सागरी किनार्यांवरील शहरांशी जोडतो. हा महामार्ग मुंबईला कोकणासह गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांशी जोडणार्या एनएच ६६ या मार्गाचा भाग असून पनवेलपासून सुरू होणारा हा रस्ता गोव्याच्या पणजीमधून पुढे कन्याकुमारीपर्यंत जातो. गेले दशकभर या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे.
हा प्रकल्प कधी पूण होणार? याची अंतिम तारीख न्यायालयाने सरकारला विचारली असता राज्य सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल, असे ओशासन दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२४ पर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार आहे.
त्याचबरोबर सिंधुदुर्गाकडे जाणारा दुसरा रस्ता आणि पुढे गोव्याकडे जाणार्या ग्रीनफिल्ड कॉरिडॉरचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. यामुळे कोकणातील प्रवाशांना थेट रस्ता उपलब्ध होणार आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण आणि दुरुस्तीच्या इतर कामांसह इतर सर्व गोष्टीची कामे ३१ डिसेंबर २०२४ च्या आत पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरुन उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. दरम्यान, ७ सप्टेंबर २०२४ रोजी गणेश चतुर्थी असून १६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असणार आहे. त्यामुळं यंदा तरी चाकरमान्यांना मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करता येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.