मुंबई - गेली ६ वर्षे मुंबईच्या सांस्कृतिक इतिहासात महत्वाचे स्थान निर्माण केलेल्या जीवनाधार फाऊण्डेशनचा ‘मुंबै महोत्सव’ ३१ डिसेंबर ते ४ जानेवारी या कालावधीत मुंबईतील ५ ठिकाणी साजरा होत असल्याची घोषणा जीवनाधार फाऊण्डेशनचे अध्यक्ष राजेश खाडे यांनी केली आहे.
२०१७ पासून सुरु झालेल्या ‘मुंबै महोत्सवा’चे हे ७ वे वर्ष आहे. मुंबईच्या नावलौकिकात भर टाकणार्या व्यक्ती, समाजाला स्फूर्तीदायी असे वेगळे काम करणार्या व्यक्ती यांना या महोत्सवामध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येतात. १६ विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना ‘मुंबै गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते, तर ‘मुंबै भूषण’, जीवनाधार जावनगौरव पुरस्कार, मुलखावेगळी माणसं आणि सामाजिक कृतज्ञता सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येतात. क्रिडा, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, उद्योग, नाटक, चित्रपट, मालिका, साहित्य, शिल्प, चित्र, पत्रकारिता, संगीत, विज्ञान, राजकारण, आध्यात्म अशा क्षेत्रांचा यामध्ये सामावेश आहे.
आजवर डॉ. अमोल कोल्हे, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, ऋतुजा बागवे, पत्रकार सचिन परब, पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश, ऍडगुरु भरत दाभोळकर, अभिनेते अरुण नलावडे, डॉ. शैलेश नाडकर्णी, वृत्तनिवेदक मंदार फणसे, अलका कुबल, सयाजी शिंदे, महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, अभिनेत्री आयेशा झुल्का, प्रख्यात कायदेतज्ज्ञ ऍड. उज्वल निकम, ज्येष्ठ दिग्दर्शक व संकलक विवेक देशपांडे, कुहू भोसले आदींसह अनेक मान्यवरांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
या वर्षीचा ‘मुंबै महोत्सव’ ३१ डिसेंबर २०२३ ते ४ जानेवारी २०२४ या कालावधीत जुहू, अंधेरी, दादर, विले पार्ले आणि बोरीवली या ठिकाणी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. पर्यावरणपूरक सायकल रॅली, मराठमोळा फॅशन शो यासह हिंदी-मराठी गाण्यांचा वाद्यवृंद, शाहीरी, महाराष्ट्राची पारंपरिक लावणी, लोककलांचा आविष्कार, खाद्यजत्रा अशा अनेक कार्यक्रमांचा महोत्सवामध्ये सामावेश आहे.
व्हिजन व्हॉईस एन ऍक्ट आणि सुप्रिया प्रॉडक्शन यांच्या सहकार्याने होणार्या मुंबै महोत्सवातील या फॅशन शो आणि सायकल रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी सविस्तर माहितीसाठी www.mumbaimahotsav.com या वेबसाईटच्या संपर्कात राहावे आणि या महोत्सवामध्ये मुंबईकरांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.