‘मुंबै महोत्सवा’मध्ये होणार आगळीवेगळी ‘जोडी तुझी माझी’ मराठमोळी सौंदर्य स्पर्धा



       मुंबई - जीवनाधार फाऊण्डेशनच्या ‘मुंबै महोत्सवा’मध्ये ‘जोडी तुझी माझी’ या आगळ्यावेगळ्या मराठमोळ्या ‘मुंबै सौंदर्यवान स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेमध्ये नवरा-बायको, वडील-मुलगी, आई-मुलगा, भाऊ-बहीण, मित्र-मैत्रीण अशा कोणत्याही जोडीला सहभागी होता येणार आहे.

३१ डिसेंबर ते ४ जानेवारी या कालावधीत हा ‘मुंबै महोत्सव’ होत असून ‘मुंबै सौंदर्यवान २०२४’ स्पर्धा सोमवार १ जून २०२४ रोजी नववर्षाच्या आरंभीच कंट्री क्लब, अंधेरीच्या खुल्या मंचावर साजरी होणार आहे. ‘जोडी विशेष मराठमोळी सौदर्य स्पर्धा’ अशा वेगळ्या संकल्पनेवर आधारीत असलेल्या या स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी जोडीने सहभागी व्हायचे आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या पारंपरिक वेशभूषेसह स्पर्धकांना सहभागी होता येईल. सहभागी होण्यासाठी नाते किंवा वयाचे बंधन नाही. प्रथम प्रवेश घेणार्‍या ५० जोड्यांना स्पर्धेमध्ये सहभाग दिला जाईल.

प्रथम तीन सर्वोत्कृष्ट विजेत्या जोडयांसह सर्वोत्कृष्ट पुरुष, सर्वोत्कृष्ट स्त्री, सर्वात तरुण जोडी, सर्वाधिक वयाची जोडी, ब्रेन अँड द ब्युटी अशा गटामध्ये प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे रु. २५,०००, २०,००० व १५,००० रोख, नंतरच्या प्रत्येक गटात रु. ७,५०० रोख आणि क्राऊन व फेटा, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, गिफ्ट व्हाऊचर अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

स्पर्धेची निवड चाचणी २३ डिसेंबर रोजी तर अंतिम फेरीमध्ये निवड झालेल्यांसाठी २३ डिसेंबर रोजी सराव फेरी होणार आहे. मुख्य स्पर्धा कॉमन रॅम्प वॉक, ड्युओ रॅम्प वॉक, वैयक्तिक रॅम्प वॉक आणि प्रश्नोत्तर फेरी अशा एकूण चार फेर्‍यांमध्ये होईल. मूळ महाराष्ट्रीयन पारंपरिक वेशभूषा, फॅशन डिझाईनसहित सभ्यतादर्शक कोणतीही वेशभूषा या स्पर्धेत चालू शकेल.

‘मुंबै सौंदर्यवान’ स्पर्धेबद्दलची सविस्तर माहिती व नोंदणी अर्ज www.mumbaimahotsav.com या वेबसाईटवर असून स्पर्धेमध्ये नोंदणीची अंतिम तारीख २० डिसेंबर आहे. या स्पर्धेमध्ये अधिकाधिक मुंबईकरांनी सहभागी होण्याचे आवाहन जीवनाधार फाऊण्डेशनचे अध्यक्ष राजेश खाडे यांनी केले आहे.

व्हिजन आणि सुप्रिया प्रॉडक्शन यांच्या सहकार्याने हा अनोखा पाच दिवसांचा ‘मुंबै महोत्सव’ साजरा होत आहे. या महोत्सवाचे हे ७ वे वर्ष आहे. महोत्सवामध्ये पर्यावरणपूरक ‘मुंबै सायक्लोथॉन’ सायकल रॅली स्पर्धा, नाद अर्थात फोक मेश अप, ये लावणीचे बोल कौतुके आणि मराठी पाऊल पडते पुढे हे सांस्कृतिक कार्यक्रम आणि महोत्सवाचे वैशिष्ट्य असलेले मुंबईच्या नावलौकिकात भर टाकणार्‍या अनेक मान्यवरांचा सन्मान असे कार्यक्रम होणार आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.