ऑलिव्ह ग्रीन व्हेंचर्स फाउंडेशन पुणे यांच्यावतीने आणि भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबई यांच्या सहयोगाने मालवण येथील भंडारी ए सो हायस्कुल येथे दिनांक १६ डिसेंबर आणि १७ डिसेंबर या दोन दिवशी भारताने १९६२ पासून आजपर्यंत जी युद्ध लढली त्या युद्धाची यशोगाथा सांगणारे 'भारतीय सैन्यदलाची यशोगाथा' नावाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
पुणे येथील ऑलिव्ह ग्रीन व्हेंचर्स फाउंडेशनच्या वतीने मालवण येथे प्रथमच भंडारी हायस्कूल येथे हे प्रदर्शन होत आहे. भारतातील आणि भारता बाहेरील पर्यावरण, वारसा स्थळे विशेषतः युद्ध स्थळे आणि युद्ध स्मारके याबाबत जागृकता निर्माण करणे आणि त्यांचे संरक्षण करणे अशी उद्दिष्टे घेऊन ऑलिव्ह ग्रीन व्हेंचर्स फाउंडेशन काम करत आहे. या फाउंडेशनचे संचालक निवृत्त लष्कर अधिकारी लेफ्टनंट कर्नल अवधूत ढमढेरे हे असून १९८८-८९ मध्ये भारताने श्रीलंकेत जी शांती सेना पाठविली होती त्या शांती सेनेत अरुण ढमढेरे यांचा सहभाग होता तर उत्कट लष्करी इतिहासकार नितीन शास्त्री हे या संस्थेचे सल्लागार आहेत. या दोघांच्या पुढाकाराने मालवणात हे प्रदर्शन होत असून हे प्रदर्शन होण्यासाठी भंडारी हायस्कुलचे माजी विद्यार्थी जगदीश वेरणेकर यांचेही सहकार्य आहे. या प्रदर्शनात युद्धाची छायाचित्रे, डॉक्युमेंटरी, नकाशे यांची मांडणी केली जाणार आहे
भारतीय सैन्यदलाची यशोगाथा सांगणाऱ्या या प्रदर्शनात १९६२ पासून आजपर्यंत जी जी युद्धे भारत लढला त्या युद्धाची माहिती सांगणारे प्रदर्शन भरविले जात असून या प्रदर्शनाच्या वेळी लेफ्टनंट कर्नल श्री अवधूत ढमढेरे हे मार्गदर्शनही करणार आहेत. या छायाचित्र प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन भंडारी ए. सो. हायस्कुल मालवणचे मुख्याध्यापक श्री. एच. बी. तिवले आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वामन खोत यांनी केले आहे.