मुंबई - ३१ डिसेंबर ते ४ जानेवारी या कालावधीत होणार्या जीवनाधार ‘मुंबै महोत्सवा’मध्ये पर्यावरणपूरक ‘मुंबै सायक्लोथॉन’चे आयोजन करण्यात आले असून ही सायकल स्पर्धा रविवार ३१ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ६ ते ९ या वेळेत जुहू बिर्ला गार्डन ते शहाजीराजे क्रिडा संकुल, अंधेरी या मार्गावर होणार आहे.
जुहू बिर्ला गार्डनपासून सुरू होणारी ही सायकल रॅली स्पर्धा वैकुंठलाल मेहता मार्ग, एन. एस. रोड नं. १०, डी. एन. नगर रोड, जे. पी. रोड, या मार्गावरून शहाजी राजे क्रीडा संकुलापर्यंत आणि तेथून परत जुहू बिर्ला गार्डनपर्यंत या मार्गावर होणार आहे. हे एकूण ७.२० किमी.चे अंतर आहे. स्पर्धेमध्ये प्रथम तीन क्रमांकांबरोबरच प्रथम महिला, प्रथम पुरुष, सर्वाधिक तरुण सायकलपटू, सर्वाधिक वयाचा सायकलपटू, दिव्यांग गटातील विजेता सायकलपटू अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि गिफ्ट व्हाउचर्स असे या पारितोषिकांचे स्वरूप आहे. सर्व सहभागी सायकलपटूंना टी शर्ट, टोपी आणि सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
‘मुंबै सायक्लोथॉन’ स्पर्धेबद्दलची सविस्तर माहिती व नोंदणी अर्ज www.mumbaimahotsav.com या वेबसाईटवर असून स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची अंतिम तारीख २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत आहे. या स्पर्धेमध्ये अधिकअधिक सायकलपटूंनी सहभागी होण्याचे आवाहन जीवनाधार फाऊण्डेशनचे अध्यक्ष राजेश खाडे यांनी केले आहे.
व्हिजन आणि सुप्रिया प्रॉडक्शन यांच्या सहकार्याने हा अनोखा पाच दिवसांचा ‘मुंबै महोत्सव’ साजरा होत आहे. या महोत्सवाचे हे ७ वे वर्ष आहे. महोत्सवामध्ये ‘जोडी तुझी माझी’ हा आगळावेगळा मराठमोळा फॅशन शो, नाद अर्थात फोक मेश अप, ये लावणीचे बोल कौतुके आणि मराठी पाऊल पडते पुढे हे सांस्कृतिक कार्यक्रम आणि महोत्सवाचे वैशिष्ट्य असलेले मुंबईच्या नावलौकिकात भर टाकणार्या अनेक मान्यवरांचा सन्मान असे कार्यक्रम होणार आहेत.