मालवण येथे नौदल दिन साजरा होत असून सिंधुदुर्ग किल्ला, राजकोट किल्ला व तारकर्ली येथे नौदलाचे विविध कार्यक्रम होणार आहेत. मालवण व तारकर्लीचा भाग हा दाटीवाटीचा असल्याने चोख सुरक्षा व्यवस्था, कार्यक्रम आणि कार्यक्रमांस येणारे नागरिक यां दृष्टीने वेगवेगळ्या पातळीवर मल्टी टास्क नियोजन प्रशासनाकडून सुरु आहे. तारकर्ली येथे होणारा नौसेना कार्यक्रम व युद्धनौका प्रात्यक्षिके सर्वसामान्य नागरिकांना पाहता यावे यासाठी दांडी ते तारकर्ली किनाऱ्यावर आवश्यक व्यवस्था करण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नौसेना दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ४ डिसेंबर रोजी मालवण, तारकर्ली दौऱ्यावर येत आहेत. राजकोट येथे उभारणी करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते केले जाणार आहे. तारकर्ली ते किल्ले सिंधुदुर्ग समुद्र परिसर याठिकाणी नौसेना दिन सोहळा संपन्न होणार आहे. यासाठी नौदल, शासन यांच्या माध्यमातून सर्व व्यवस्था उभारणी नियोजन सुरु आहे.
नौसेना दिनाच्या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजीत पवार यांच्यासह काही केंद्रीय मंत्री व राज्याचे मंत्री उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याविषयी २ डिसेंबरला माहिती देण्यात येईल. मालवण तारकर्लीचा भाग दाटीवाटीचा असल्याने त्यादृष्टीने सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहे.
नौसेना दिनाचा प्रमुख कार्यक्रम हा तारकर्ली एमटीडीसी पर्यटन केंद्राच्या किनारी होणार आहे. त्याठिकाणी सादर होणारी युद्धनौकांची प्रात्यक्षिके व नौसेनेचा कार्यक्रम सर्वसामान्यांना पाहता यावा यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी दांडी ते तारकर्ली याठिकाणी खास व्यवस्था करण्यात येत आहे.