राजधानी मुंबईसह राज्यातील अनेक शहरांतील हवेची गुणवत्ता कमालीची खालावली आहे. यामुळे होणारी हानी टाळण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पनवेल, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, वसई-विरार या महापालिकांनी कठोर उपाययोजना योजण्यास सुरुवात केली आहे. यासह राज्याच्या आरोग्य खात्यानेही पुढाकार घेऊन नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
यात एन-९५ व एन ९९ मास्क, कापडी मास्क, रुमाल वापरण्यासह माॅर्निंग वाॅक, संध्याकाळचे फिरणे, व्यायाम, धावणे टाळावे, सकाळ-संध्याकाळ घराची दारे खिडक्या बंद ठेवा, असे आवाहन केले आहे. ज्येष्ठांसह गरोदर माता, लहान मुले, पोलिस, रिक्षाचालकांना धोका असून राज्यातील सध्याचे हवामान ज्येष्ठ नागरिक, पाच वर्षांखालील लहान मुले, गरोदर महिला, व्याधींनी त्रस्त व्यक्ती, वाहतूक पोलिस, सफाई कामगार, रिक्षाचालक, फेरीवाले यांना हानिकारक असून, योग्य खबरदारी न घेतल्यास मृत्यू ओढवू शकतो, असे आरोग्य खात्याचे पुणे येथील संचालक डॉ. प्रतापसिंह सारणीकर यांनी बजावले आहे. याशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे.
या आहेत सूचना -
१ - प्रदूषणापासून होणारे दुष्परिरणाम टाळण्यासाठी वाहतूक कोंडीची ठिकाणे, दगडखाणी, कोळशावर आधारित उद्योग, वीटभट्टी, उच्च प्रदूषण असलेले उद्योग, वीज प्रकल्प येथे जाणे टाळावे.
२ - फटाके जाळणे टाळावे
३ - सिगारेट, विडी आणि संबंधित तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळावे
४ : बंद आवारात डासांच्या कॉईल जाळू नये
५ - घरामध्ये झाडू मारण्याऐवजी व्हॅक्युक क्लिनरचा वापर करा
६ - वाहत्या पाण्याने डोळे धुवा
७ - उघड्यावर कचरा, गोवऱ्या जाळू नका
८ - एअर प्युरिफायरचा वापर टाळा