नव्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात 'एक राज्य, एक गणवेश' धोरण




पुढील शैक्षणिक वर्ष म्हणजेच २०२४-२५ पासून 'एक राज्य, एक गणवेश' या लागू होणार आहे. सरकारच्या समग्र शिक्षण कार्यक्रमांतर्गत तसेच, राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेतंर्गत सरकारी शाळांमधील इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना समान रंगाच्या दोन गणवेशांचे वितरण महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून करण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून  जारी  करण्यात आला आहे.

सरकारकडून जारी अध्यादेशानुसार नवा गणवेश स्काऊट व गाईड विषयास अनुरूप असणार आहे. मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पँट तसेच मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा ज्या शाळांमध्ये सलवार कमीज असेल तर सलवार गडद निळ्या रंगाची व कमीज आकाशी रंगाची अशा स्वरूपात गणवेशाचा रंग असणार आहे. त्यापैकी एका गणवेशाला विद्यार्थ्याच्या शर्टवरती शोल्डर स्ट्रिप व दोन खिसे असणे आवश्यक करण्यात आले आहे.

गणवेशाच्या शिलाईचे काम स्थानिक महिला बचत गटामार्फत करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत राज्यातील पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एक रंग, एक दर्जा असलेला सारख्याच गणवेशाचा लाभ देण्याच्या दृष्टीने कापड खरेदीसाठी ई-निविदा प्रक्रियेचा मसुदा तयार करून त्यासाठी आवश्यक त्या विभागांचे मार्गदर्शन घेऊन ई-निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.                    

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.