‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमात तातडीने दाखले मिळू लागल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य..

मिळकत पत्रावर नाव, उत्पन्नाचा दाखला, निवृत्ती वेतन, रहिवासी दाखला, अशी महसूल विभागाशी संबंधित कागदपत्रे मुंबईतील नागरिकांना आता विहीत वेळेच्या आत मिळू लागली आहेत. ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून पालकमंत्री दीपक केसरकर स्वत: याची दखल घेत असून दाखले वेळेत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलू लागले आहे. नागरिकांची कामे प्रलंबित राहता कामा नये, असे निर्देश मंत्री श्री.केसरकर यांनी यंत्रणेला दिले आहेत.


            शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. केसरकर दर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जनतेशी सुसंवाद’ साधत आहेत. पालकमंत्री या नात्याने मुंबईच्या जनतेसाठी काम करण्याची, त्यांच्या समस्या प्रत्यक्षात जाणून घेण्याची संधी मिळत असल्याचे सांगून ते प्रश्न तातडीने सोडविण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमप्रसंगी जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अपर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड, उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे, जयकृष्ण फड, जिल्हा नियोजन अधिकारी जी.बी.सुपेकर आदी उपस्थित होते.



 मिळकत पत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, कलावंतांना निवृत्ती वेतनासाठी संबंधित दाखले, जागेचा नकाशा, आधार कार्डच्या नोंदीत बदल, मतदार यादीत नाव नोंदणी, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आदींसाठी अर्ज केलेल्या रहिवाश्यांनी आज पालकमंत्री श्री. केसरकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या हस्ते मागील आठवड्यात अर्ज केलेल्या 13 लाभार्थींना विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. प्रमाणपत्रांसाठी फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही तसेच प्रमाणपत्रे तयार झाल्याचे लाभार्थींना दूरध्वनीवरून कळविण्यात येत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर स्मित फुलले होते. लाभार्थींनी समाधानाच्या प्रतिक्रियेने संपूर्ण यंत्रणेला धन्यवाद दिले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.