सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा पानवळ गावच्या कन्या डॉ. चित्रा गोस्वामींना मुंबई विद्यापीठाकडून 'आदर्श शिक्षिका' पुरस्कार.



मुंबई विद्यापीठाकडून दरवर्षी सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार हा मानाचा पुरस्कार   महाविद्यालयात 15 वर्षे स्थायी सेवा (Permenant Basis) करणाऱ्या प्राध्यापिकेला दिला जातो. 2022- 23 या वर्षासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या डॉ चित्रा गोस्वामी यांना 5 सप्टेंबर , शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठाच्या फिरोजशहा मेहता भवन मध्ये कुलगुरूंच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ चित्रा गोस्वामी, यांची २० वर्षे स्थायी सेवा झाली असून, त्यांनी विवध टप्प्यांवर महत्वाच्या समित्यांवर काम पाहिलेले आहे. यातील पहिला टप्पा म्हणजे 'महिला विकास कक्ष' . त्या रत्नागिरी जिल्ह्याच्या ‘महिला व बाल कल्याण विभागाच्या’ 2006 पासून सदस्य असून, विविध शासकीय कार्यालयासाठी, महिलाश्रमातील महिलांसाठी त्या समुदेशक म्हणून काम पहात आहेत. त्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सभासद असून 2008 पासून ‘महिला विकास कक्षा’ अंतर्गत विविध उपक्रम त्यांनी राबविले आहेत. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) ही समिती सांभाळताना त्यांनी गावागावातून महिला जागृती, स्वसंरक्षण कार्यक्रम, महिलांवरील अत्याचार, हिंसा, हुंडा पद्धती यासाठी जागृतीचे कार्यक्रम केले असून, विविध पथनाट्ये, लेख लिहिले आहेत. आकाशवाणीवर 'लेक वाचवा, लेक शिकवा' , ' स्त्रियांचे अधिकार', 
' कोरोना काळातील स्त्रियांचे योगदान', 'समाजातील स्त्रियांचे स्थान',  आदी विषयातून जागृतीचे कार्यक्रम सादर केले आहेत. गरीब मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्यांना पायावर उभे करता येईल असा त्यांचा प्रयत्न असतो. शिवाय स्त्रियांच्या पुनर्वसनाच्या शासकीय कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. या व्यतिरिक्त या विषयावरील सेमिनार, कार्यशाळा आदींमध्ये त्या सक्रिय सहभागी असतात.

महाविद्यालयाच्या कला शाखेच्या त्या उपप्राचार्य असून , हिंदी विषयाचे अध्यापन करतात. आता पर्यंत त्यांनी  हिंदी विषयातील 65 संशोधन पेपर, 2 लघु शोधप्रबंध, 1बृहद शोधप्रबंध आदी संशोधनातील काम केले आहे. त्यांची हिंदी व मराठीतील कविता, लघुकथा, संदर्भ लेखनावरची 17 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी  6 पुस्तके संपादित केली आहेत.

त्यांना संस्था अंतर्गत विशेष कार्य पुरस्कार, रत्नागिरी जिल्ह्याचा पोलीस मित्र आणि विविध जिल्हा स्तरीय पुरस्कार, विद्यापीठ स्तरावरील उत्कृष्ठ कार्यक्रमाधिकारी पुरस्कार, राष्ट्रीय स्तरावरील हिंदी विषयातील सन्मान, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मॉरिशस आणि रोड्रिग्ज सन्मान प्राप्त झाले आहेत.

हा सन्मान स्वीकारत असताना डॉ चित्रा गोस्वामी म्हणाल्या की, हा व्यक्तिगत पुरस्कार किंवा व्यक्तिगत गौरव नसून महाविद्यालय आणि  संस्थेतील कर्मचारी ,सहकारी  शिक्षक, वरिष्ठ प्राध्यापक, परिवारातील सदस्य, समाजातील मार्गदर्शक या सर्वांचे प्रतिनिधी म्हणून मिळालेला सन्मान आहे. यामध्ये रत्नागिरी,जुवेचे रहिवासी फोटोग्राफर श्री समाधान पारकर यांचाही समावेश आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा डॉ सुहास पेडणेकर, वर्तमान कुलगुरू प्रा डॉ रविंद्र कुलकर्णी, प्रकुलगुरु प्रा डॉ अजय भामरे उपस्थित होते.

पुरस्कार मिळाल्या बद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, सचिव श्री सतिशजी शेवडे, कार्यवाह श्री श्रीकांत दुदगीकर, अन्य मान्यवर सदस्य,  महाविद्यालयाचे प्राचार्य , वरिष्ठ प्राध्यापक यांनी अभिनंदन आणि कौतुक केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.