लिगो बागच्या राजाच्या मिरवणुकीत तुम्ही का नव्हता ?



मुंबई आणि सार्वजनिक गणेशोत्सव यांचे एक वेगळंच नाते आहे. पाटपूजन सोहळ्यापासून ते अगदी विसर्जन सोहळ्यापर्यंत मुंबईचा गणेशोत्सवामधील दिमाख पाहण्यासारखा असतो. मुंबईत हजारो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असतील आणि या हजारो गणपतीचे दर्शन घेणारे तर लाखो असतील. विसर्जन सोहळ्यादिवशी सगळे गणपती एकत्र पाहायला मिळायला हवेत म्हणून आजही लोक दाटीवाटीने गर्दी करतात. यंदाच्या विसर्जन सोहळ्यानंतर आता मात्र चर्चा आहे ती लिगो बागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याची !



मुंबईत गणेश उत्सव हा भाविकाचा असतो तसाच तो कार्यकर्त्यांचा असतो. प्रत्येक मंडळातील कार्यकर्ता हा आपला बाप्पा सुंदर दिसावा, आपल्या मंडपात खूप कार्यकर्ते यावेत म्हणून धडपडत असतात. आणि या सगळ्यात ज्यावेळी भक्तभाविक रांगा लावून आपल्या मंडळाच्या बाप्पाला दर्शनासाठी येतात ना तेव्हा त्या मंडळाचे बाळगोपाळ कार्यकर्ते खऱ्या अर्थाने आनंदून जातात. आणि विसर्जनाच्या दिवशी तर दहा दिवस केलेली सेवा पावन करुन बाप्पा निघतो तेव्हा डोळे पाणवून जातात. या आनंदसोहळ्यात विसर्जनाची तर धमाल मस्ती सुरु असते.. आणि हे सगळं आज टिव्ही मिडीयामुळे लाईव्ह पाहिलं जातंय.. पण हा सोहळा झाल्यानंतर सोशल मिडीयावर जेव्हा लिगो बागच्या राजाची दृश्य दिसायला लागली तेव्हा मात्र सर्वच चक्रावून गेली.. एवढा भव्यपणा आपल्याला बघायचा राहून गेला याची रुखरुख लागून राहीली आहे.




बदलत्या काळानुसार आज सोशल मिडीया ही फार मोठी ताकद बनली आहे. टेक्नोल़़ॉजी आणि उत्सवाचे असलेले हे नाते भाविकांना  श्रद्धावान बनवतेय हे विशेष. आज फक्त गणपती म्हणून सर्च केलं तरी कोट्यवधी वॉलपेपर आणि डिझाईन अपलोड असलेले आपण पाहत असतो. आज या बदलत्या तंत्रज्ञानाच्या आभासी युगातही गणेशोत्सव आणि समुहाची एकत्रित आराधना करण्याची ताकद या उत्सवामुळे दिवसेंदिवस घट्ट बनत चालली आहे.



श्रीगणेशाचे महागणपती रुप असो वा श्री  या एकाक्षरी रुपातलं देखणेपण असो.. प्रत्येक रुप विलोभनीय असते. झपाट्याने बदलणाऱ्या काळात या गजरुपाची मोहमाया आजही आसमंताला भुरळ घालते. बदलत्या तंत्रज्ञानाचा आणि गणेशोत्सवाचा असाच सुरेख संगम सोशल मिडीयावर दिसून येत आहे. लिगो बागच्या राजाने सोशल मिडीयावर आपली कमाल दाखवली आहे..

चला तर मग आता सांगतो यातली गंमत, लिओ बागचा राजा हा कुठल्याही मंडळाचा बाप्पा नसुन त्या बुद्धीच्या देवतेची ही कमाल आहे. एआय या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन मुंबईच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर हा अनोखा गणेश विसर्जन सोहळ्यातला आविष्कार साकारण्यात आला आहे. वरुण गुप्ता या कलाकाराना गणपती बाप्पाचा हा एआय अवतार साकारला आहे. एआयच्या मदतीने आज सगळं काही साकारत येत असताना अशा पद्धतीने साकारलेला हा लिगो बाग चा राजा म्हणजे आपल्या गणेशोत्सवाची महती व्यापक बनवणारा आहे.. 

अर्थात एआयच्या मदतीने साकारलेल्या या बाप्पाचे रुप हे मनमोहक असले तरी रस्त्यावर आणि मंडपातल्या बाप्पाची शान काही औरच असते म्हणा.. एआय असो वा कितीही काळाच्या पुढे जाणारे तंत्रज्ञान असो गणेशोत्सवाच्या दहा दिवसात मंडपातला बाप्पा आणि त्याची मिरवणूक हेच खरे जगण्यातलं आधुनिकीकरण आणि तीच ज्ञानमयी परंपरा !



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.