राज्यात प्रो-कबड्डीच्या धर्तीवर ३१ ऑगस्टला प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन

राज्यात पहिल्यांदाच प्रो-कबड्डीच्या धर्तीवर वरळी येथील इन डोअर स्टेडियममध्ये 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी  ६ ते १० या वेळेत प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शन आणि सूचनेनुसार प्रो-गोविंदा स्पर्धा होणार असून गोविंदा पथकातील गोविंदांच्या सुरक्षेसाठी विमा कवच देण्यात आले आहे. यासाठी राज्यभरातील ५० हजार गोविंदांचा विमा उतरविण्यात आला असून मुंबईतील २० गोविंदा पथकांतील तीन हजार ५०० गोविंदांना विम्याचा लाभ होणार आहे.


अपघात होऊ नये यासाठी दहीहंडी समन्वय समितींना सूचना देण्यात आल्या असून त्यानुसार समिती नियमावली तयार करणार आहे. नियमावलीनुसार प्रत्येक स्पर्धकाची काळजी घेतली जाणार असून प्रत्येकाला हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. इनडोअर स्टेडियममध्ये ऑलिंपिकच्या धर्तीवर मॅटचा वापर करण्यात येणार असून गोविंदाचा मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास १० लाख रूपयांची मदत शासनातर्फे करण्यात येणार आहे. गोविंदा खेळाडूंचे कार्यक्रम, स्पर्धा वर्षभर घेण्यावर भर राहणार असून दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आला आहे.

प्रो-गोविंदा स्पर्धेमध्ये एकूण १६ संघ सहभागी होणार असून पहिले बक्षिस ११ लाख रूपये, दुसरे बक्षिस ७ लाख रूपये, तिसरे बक्षिस ५ लाख रूपये आणि चौथे बक्षिस ३ लाख रूपये ठेवण्यात आले आहे. याचबरोबर महिला संघ आणि अंध गोविंदा पथकांनाही सहभागाबद्दल एक लाखांचे बक्षिस देण्यात येणार आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.