कोकणाला मिळणार नवी समृद्धी, चार टप्प्यात होणार ग्रीनफील्ड महामार्ग

कोकणच्या दळणवळण समृद्धीसाठी राज्य सरकारने ग्रीनफील्ड महामार्ग प्रस्तावित केला आहे. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर ३८८.४५ किलोमीटर लांबीचा ग्रीनफिल्ड महामार्ग कोकणच्या किनारपट्टीवर अस्तित्वात येणार आहे. 'एमएसआरडीसी'ने महामार्गासाठी विविध पर्यायांचा अभ्यास करून चार टप्प्यातील अंतिम प्रस्ताव सादर केला आहे. प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली असून सहापदरी ग्रीनफिल्ड महामार्गाच्या भूसंपादनाही मान्यता देण्यात आली आहे. 

ठाकरे सरकारच्या काळातच झाली होती घोषणा

मुंबई ते सिंधुदुर्ग असा ग्रीनफिल्ड कोकण द्रुतगती उभारण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला होता. तत्कालीन नगरविकासमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १४ मार्च २०२२ रोजी विधिमंडळात यासंदर्भातील घोषणा केली होती. हा महामार्ग आंतरराष्ट्रीय विमानतळास जोडला जाणार असल्याने कोकणातून आंतरराष्ट्रीय प्रवास सोयीचा होणार आहे. तसेच या मार्गाची आखणी कोकण किनारपट्टीवरून करण्यात येणार असल्याने प्रवाशांना निसर्गसौंदर्य अनुभवता येईल, असा दावा ग्रीनफिल्ड महामार्गाची घोषणा करताना करण्यात आला होता.

कोकण ग्रीनफिल्ड महामार्ग प्रस्तावित झाल्याने दक्षिणेकडील राज्यांतील प्रवास गतिमान होईल. महामार्ग नवी मुंबई येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळास जोडला जाणार असल्याने कोकणातून आंतरराष्ट्रीय प्रवास करणे सोईस्कर होईल. त्याअनुषंगाने हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर कोकण विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी द्रुतगती महामार्गकरिता दोन्ही सभागृहात निवेदन करून यापूर्वीच घोषणा करण्यात आहे.

असा जाईल प्रस्तावित महामार्ग

या तालुक्यातून महामार्ग जाणार ग्रीनफिल्ड महामार्ग रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात सुरू होऊन पुढे अलिबाग, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील, मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, इ. तालुक्यातून प्रस्तावित आहे. यासाठी नव्याने जमीन संपादित केली जाणार असून किती हेक्टर जागा संपादित करावी लागेल, याचा आराखडा केला जात आहे.



कोकणातील मालाची वेगवान वाहतूक

शिवडी ते न्हावा शेवा पोर्ट जिथे संपतो, त्या रायगड जिल्ह्यातील चिर्ले गावापासून महाराष्ट्र-गोवा सीमेवरील पात्रादेवीपर्यंत सुमारे ३८८.४५ किमीचा हा महामार्ग असेल. त्यामुळे पर्यटन विकासाबरोबरच कृषी उद्योगालाही चालना मिळेल. महामार्गामुळे कोकणातील हापूस, काजू, सुपारी, नारळ इत्यादी उत्पादनांसाठी थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.