महाराष्ट्रात आता विद्यार्थी घडवणार क्रांती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता मॉनिटर्स उपक्रमाचा केला शुभारंभ


शालेय शिक्षण विभागांतर्गत ‘लेट्स चेंज’ म्हणजेच बदल घडवूया उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये स्वच्छता मॉनिटर्स बनलेले विद्यार्थी स्वच्छतेच्या बाबतीत क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केला. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत लेट्स चेंज उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर्स बनविले आहे. याचा शुभारंभ आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, सहसचिव इम्तियाज काझी, लेट्स चेंज उपक्रमाचे संचालक रोहित आर्या यांच्यासह स्वच्छता मॉनिटर विद्यार्थी उपस्थित होते.


मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, निश्चय केला की बदल घडतोच. त्यातही लहान मुले सांगतात ते मोठ्यांना ऐकावेच लागते. स्वच्छता हा आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय असून लेट्स चेंज या उपक्रमात ६४ हजार शाळांमधील ३८ लाख विद्यार्थी सहभागी होत असल्याने स्वच्छतेच्या बाबतीत आमूलाग्र बदल घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा स्वच्छ भारत हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. राज्यातील या उपक्रमामुळे आणि त्यात विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणावरील सहभागामुळे महाराष्ट्र स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर व्हायला वेळ लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

➡️ स्वच्छता मॉनिटर्स उपक्रमाविषयी

या उपक्रमांतर्गत विद्यार्थी स्वच्छता मॉनिटर्स बनणार असून स्वच्छता राखण्याबाबत नागरिकांची नकळत होणारी चूक दाखवून देणार आहेत. यावर्षी हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत असून राज्यातील सुमारे 64 हजारांहून अधिक शाळांची आणि 38 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. या अभियानात विद्यार्थ्यांकडून साफ सफाई करून घेणे अपेक्षित नाही. तर, विद्यार्थी ‘स्वच्छता मॉनिटर’ होण्याची जबाबदारी घेतील. कुठेही निष्काळजीपणे कचरा टाकताना किंवा थुंकताना दिसले, तिथे त्या व्यक्तीला थांबवून चूक दाखवून ती सुधारायला सांगतील. नंतर ह्या घटनेचे छोटे मजेशीर विवरण देतानाचे व्ह‍िडिओ सोशल मीडियावर शेअर करतील. ह्या अभियानात निवडलेल्या विद्यार्थ्यांना ‘महाराष्ट्र स्वच्छता मॉनिटर’ ओळखपत्र देऊन गौरविण्यात येईल. तसेच येत्या 2 ऑक्टोबर या गांधी जयंतीच्या दिवशी सर्वोत्तम पाच जिल्हे, 100 शाळा आणि 300 विद्यार्थ्यांना मुंबई येथे समारंभपूर्वक पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.