यंदाच्या मान्सून साठी कोकण रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. कोकण रेल्वेने पावसाळा सुरू होण्यापूर्वीची तयारी सुरू केली आहे. रेल्वे मार्गाशेजारील पाणी वाहून जाणार्या गटारांची साफसफाई, मार्गावरील विशेष तपासणी याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.
यंदाही 10 जुनपासून मान्सून वेळापत्रकानुसार गाड्या धावणार आहेत. मान्सूनचे वेळापत्रक 10 जून 2023 पासून 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत लागू होणार असल्याची माहिती कोकण रेल्वेने दिली आहे.पावसाळ्यात 673 कर्मचारी चोविस तास पेट्रोलिंग करणार आहेत. अतिवृष्टीवेळी रेल्वे ताशी 40 किलोमीटर वेगाने चालवण्याच्या सुचना लोको पायलटना देण्यात आल्या आहेत, असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात भू-सुरक्षा उपाययोजना केल्यामुळे दगड पडणे, माती घसरण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. गेल्या 10 वर्षांत रेल्वे सेवेत कोणताही मोठा व्यत्यय आलेला नाही. रेल्वे गाड्या सुरक्षित चालवण्यासाठी मान्सून पेट्रोलिंग केले जाणार आहे.पावसाळ्यासाठी 673 कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे. कटिंग्जच्या ठीकाणी चोवीस तास गस्त आणि वॉचमन तैनात केला जाणार आहेत. तेथे गाड्यांच्या वेगावर निर्बंध ठेवले जातील. आपत्कालीन परिस्थितीत जलद हालचाल करण्यासाठी आवश्यक साहित्य सज्ज ठेवले आहे. अतिवृष्टी होत असेल तर ताशी 40 किमीच्या कमी वेगाने गाड्या चालवण्याच्या सूचना लोको पायलटसना दिल्या आहेत. सुरक्षा कर्मचार्यांना आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी मोबाईल फोन, दोन्ही लोको पायलट आणि गार्ड्स ऑफ ट्रेन्सना वॉकी-टॉकी सेट दिले आहेत.
कोकण रेल्वेवरील प्रत्येक स्थानकावर 25 वॅटचे व्हीएचएफ स्टेशन उभाले असून ते प्रत्येक ट्रेनच्या कर्मचार्यांकडील वायरलेसशी जोडले आहेत. कोकण रेल्वे मार्गावर इमर्जन्सी कम्युनिकेशन सॉकेट्स सरासरी 1 किमी अंतरावर आहेत. त्याचा उपयोग पेट्रोलमन, वॉचमन, लोको पायलट, गार्ड आणि इतर फील्ड मेंटेनन्स कर्मचार्यांना आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यास उपयुक्त ठरतात. अॅक्सिडेंट रिलीफ मेडिकल व्हॅनमध्येही सॅटेलाईट फोन ठेवलेले आहेत. सिग्नल पावसातही व्यवस्थित दिसावेत म्हणून त्यातील दिवे एलईडीयुक्त बसवण्यात आले आहेत.
9 स्थानकांवर सेल्फ रेकॉर्डिंग पर्जन्यमापक बसवण्यात आले आहेत. माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ आणि उडुपी या प्रदेशातील पावसाची नोंद करतील आणि पावसाचा जोर वाढल्यास अधिकारी सतर्क करतील. तीन ठिकाणी पुलांसाठी पूर चेतावणी प्रणाली प्रदान करण्यात आली आहे. काली नदी (माणगाव आणि वीर दरम्यान), सावित्री नदी (वीर आणि सापे वामणे दरम्यान), वाशिष्ठी नदी (चिपळूण आणि कामठे दरम्यान) आणि पाण्याचा प्रवाह धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त झाल्यास अधिकाऱ्यांना सतर्क करेल. चारठिकाणी ॲनिमोमीटर बसवण्यात आले आहेत. वाऱ्याच्या वेगाचे निरीक्षण करण्यासाठी पानवल मार्ग (रत्नागिरी आणि निवासर दरम्यान), मांडवी पूल (थिविम आणि करमाळी दरम्यान), झुआरी पूल (करमाळी आणि वेर्णा) आणि शरावती पूल (होन्नावर आणि मानकी दरम्यान) ॲनिमोमीटर बसविण्यात आले आहेत.