"आमकां सातजन्म हीच बायको होई": इथे चक्क पुरुषच घालतात वडाला फेऱ्या!

➡️जन्मोजन्मी हिच पत्नी मिळावी यासाठी कुडाळ येथे पुरुष करतात वटपौर्णिमा
➡️२००९ पासून गवळदेव येथे होते पुरुषांकडून वडाची पूजा. वृक्ष संवर्धनाचाही देतात संदेश


वटपौर्णिमा म्हटली कि महिलांचा सण. जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी महिला वर्षातून एकदा वटपौर्णिमा सणाला वटवृक्षाचे मनोभावे पूजन करून वटवृक्षाला दोरा गुंडाळून सात फेऱ्या मारतात आणि पतीच्या दिर्घायुष्यासाठी देवाकडे साकडे घालतात. 


महिला आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी वडाची पूजा करतात मग पुरुषांनीही आपल्या पत्नीच्या दिर्घायुष्यासाठी वटपौर्णिमा का करु नये अशा विचारधारेने प्रेरित होऊन सन २००९ साली कुडाळ येथील डॉ. संजय निगुडकर, उमेश गाळवणकर आणि मित्रमंडळींनी कुडाळ गवळदेव येथे आपापल्या पत्नींच्या दिर्घायुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी वटपौर्णिमा साजरी करण्यास सुरुवात केली. 

ही परंपरा आजही कायम राखत आजच्या वटपौर्णिमे दिवशीही कुडाळमधील प्रतिष्ठित पुरूष मंडळी डॉ संजय निगुडकर , श्री. अरुण मर्गज , श्री. राजू कलिंगण , श्री. नितीन बांबर्डेकर , श्री. परेश धावडे , श्री. प्रथमेश हरमलकर , श्री. बळिराम जांभळे , श्री. सुरेश वरक आणि मित्रमंडळींनी यांनी कुडाळ वडगणेश येथे सकाळी उपस्थित राहत वडाचे पूजन करून वडाच्या झाडाला दोरा गुंडाळत प्रदक्षिणा घातल्या आणि आपापल्या पत्नींच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करून जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी यासाठी परमेश्वराकडे साकडे घातले. 

यावेळी बोलताना डॉ. निगुडकर यांनी सांगितले कि , गेली १४ वर्षे हे व्रत आम्ही करत असून जशा स्त्रिया आपल्या नवऱ्याविषयी असणारं प्रेम आणि त्याच्या दिर्घायुष्यासाठी हे व्रत करतात तसं आपणही आपल्या पत्नींच्या दिर्घायुष्यासाठी आम्हीही हे व्रत करतो आणि त्यांच्याप्रती प्रेमभावना व्यक्त करून आम्हालाही जन्मोजन्मी त्याच पत्नी म्हणून लाभाव्यात या भावनेने आम्ही वटपौर्णिमेचे व्रत करत आहोत. आमची ही चळवळ महाराष्ट्र , गुजरात , दक्षिण भारत या भागातही पसरावी असे आमचे प्रयत्न आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.