वारी जनातली, जनांच्या मनातली : अभंग माऊलींचे - ७


ज्येष्ठ कृष्ण अमावास्या, शालिवाहन शक १९४५, दिनांक १८ जून २०२३

पैल तो गे काऊ कोकताहे । शकून गे माये सांगताहे ॥१॥
उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ । पाहुणे पंढरीराऊ घरा कैं येती ॥२॥
दहिंभाताचीं उंडी लाविन तुझ्या तोंडी ॥ जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगीं ॥३॥
दुधें भरुनी वाटी लावीन तुझे वोंठी । सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥
आंबया डहाळीं फ़ळें चुंबी रसाळीं । आजिचे रे काळीं शकून सांगे ॥५॥
ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणें । भेटती पंढरीराये शकून सांगे ॥६॥


मनातील भावनांना कलात्मक रीत्या सादर करणे म्हणजे काव्य, काव्याचे अनेक प्रकार आहेत. संत साहित्यातही काव्याचे अनेक प्रकार दिसून येतात. शब्द, भावना आणि आशयाचे नेमकेपण हे संत साहित्याचे वैशिष्ठ्य आहे. माऊलींची भाषा इतकी मधाळ आहे, की त्या शब्दांची गोडी कायमच अंतःकरणात भिनत जाते. शब्दांचा नाद मनात रुंजी घालतो. कानावर पडणाऱ्या या शब्दांनी मन आपोआप शांत होते. ज्ञानदेवांच्या शब्दांचे सौंदर्य रूप, रंग, गंध घेऊनच जन्माला येते. 

‘पैल तो गे काऊ कोकताहे’ ही माऊलींची अजरामर विराणी आहे. संत दिनरात केवळ आपल्या देवाच्या नामाचा जप करत असतात. भगवंताच्या विरहाच्या अनुभूतीत जेव्हा भक्तिरसाच्या आर्ततेची भावना मिसळून जाते त्यातून निर्माण होणारी अलौकिकता या विराहिणीतून व्यक्त होते. विरहिणीचे माध्यम वापरुन संतांनी अनेक भावना व्यक्त केल्या आहेत. कधी आर्त भक्तीची भावना, तर कधी भक्तीचे रुपक, तर कधी भगवंताच्या भेटीचा आनंद आणि कधी त्याची भेट होत नाही म्हणून निर्माण होणारी अगतिकता या विराण्यांमधून दाखवून दिली जाते. 

भगवंताच्या दर्शनाला व्याकूळ झालेल्या एका भक्ताचे अंतरंग माऊली या विराणीतून मांडतात.   

पैल तो गे काऊ कोकताहे । शकून गे माये सांगताहे ॥१॥

आपल्या लहानपणी दारावर कावळ्याने काव-काव केले की घरातली मोठी स्त्री आज कोणीतरी पाहुणा येणार असे सहजच म्हणून जायची. येणाऱ्या पाहुण्यांचा निरोप घेऊन हा काऊ आपल्या दारी आलेला आहे, असे मानले जायचे. याच कल्पनेचा उपयोग माऊलींनी आपल्या या विराणीत अतिशय सुंदरपणे केला आहे.

माऊलींची शब्द प्रतिभा फारच अफाट आहे. कावळा हा शब्द काव्यात उच्चारताना थोडा जडच जाणार म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक ‘काऊ’ हा शब्द वापरला आहे. काऊ शब्द ऐकताना जिव्हाळ्याचे कोणीतरी जवळ आहे अशी भावना मनात येते. असाच एक ‘काऊ’ पलिकडे काव-काव करतो आहे. त्याच्या या ओरडण्यातली कर्कशता ही मनाला त्रासदायक नाही तर ती हवीहवीशी वाटणारी आहे म्हणून इथे ‘कोकताहे’ असा शब्दप्रयोग माऊलींनी केला आहे. 

चांगली गोष्ट घडण्यापूर्वी काही संकेत मिळतात, त्यालाच आपण शकून म्हणतो. या भक्ताला आस आहे ती त्याच्या भगवंताच्या दर्शनाची. तो सतत पंढरीरायांची आराधना करत आहे. कावळ्याचे हे ओरडणे हा फारच चांगला शकून आहे असे त्याच्या मनाला वाटते आहे. काऊ आपल्याला ओरडून पंढरीरायांच्या आगमनाची सुचना तर देत नाही ना ? पंढरीरायांच्या येण्याचा हा शकून तर नाही ना ? अशी दाट शंका त्याच्या मनात निर्माण झाली आहे. 

उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ । पाहुणे पंढरीराऊ घरा कैं येती ॥२॥

आतुरतेने वाट पहात असलेल्या पंढरीरायांच्या येण्याची खबर तु घेऊन आला आहेस, मला सांग की ‘ते कधी येणार आहेत?’ भगवंताच्या येण्याची खबर मिळाल्यामुळे भक्त इतका खुश झाला आहे की त्या काऊला कुठे ठेऊ असे त्याला झाले आहे. मनाला उत्साह देणारी बातमी घेऊन आला आहेस म्हणून मी तुझे पाय सोन्याने मढवायला तयार आहे.   

दहिंभाताचीं उंडी लाविन तुझ्या तोंडी ॥ जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगीं ॥३॥

घरी आलेल्या जिव्हाळ्याच्या माणसाला रस्त्यात लागलेली नजर उतरवण्यासाठी दहिभाताचे उंडे उतरवून टाकले जात होते. हा दहीभात कावळ्यांसाठीच असायचा. माझ्या आवडीच्या व्यक्तीची माझ्या मनाला भावेल अशी खबर तु मला सांग मी तुला दहिभाताची उंडी देईन. 

दुधें भरुनी वाटी लावीन तुझे वोंठी । सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥

मला माहिती आहे तु माझ्या विठूरायांचा निरोप घेऊन आला आहेस, तरी माझ्या मनाचे समाधान व्हावे म्हणून मला परत एकदा सांग ’माझा विठू येणार आहे’ तु आता दही भात खाऊन कंटाळला असशील मी तुझ्या ओठी दुधाची वाटी लावते. लवकर मला प्रिय असलेली विठ्ठलाच्या आगमनाची वार्ता सांग. 

आंबया डहाळीं फ़ळें चुंबी रसाळीं । आजिचे रे काळीं शकून सांगे ॥५॥

झाडाला लगडलेले आंबे पिकले आहेत, फारच रसाळ आहेत. तुला हवे असतील तर तु हे रसाळ आंबे खाऊन घे. अन् आंब्याचा रस पिऊन गोड झालेल्या तुझ्या रसाळ वाणीने आत्ताच तु मला माझ्या पंढरीरायांच्या आगमनाचा शुभ शकून दे. येत्या प्रत्येक दिवशी माणूस अत्यंत शुल्लक गोष्टींसाठी झुरतो आहे, तिथे माऊली किती उत्कटतेने आपल्या भगवंताची आराधना करत आहेत. किती विरोधाभास आहे. त्यांच्या मनात चाललेली खळबळ किती प्रभावीपणे अचूक शब्दांत व्यक्त केली आहे माऊलींनी.
 
ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणें । भेटती पंढरीराये शकून सांगे ॥६॥

श्रद्धेने तळमळीने ईश्वर आराधना करा. कोणतीही इच्छा मनात न ठेवता त्याचा धावा करा भगवंत तुम्हाला नक्की भेटणार. माऊली ज्ञानेश्वर सांगतात खऱ्या श्रद्धेने भक्ति केली तर नक्कीच तुम्हाला पंढरीचा राणा भेटणार आहे. नामस्मरणात मोठी ताकद आहे. खऱ्या श्रद्धेने तुम्ही नामस्मरण करा. तुम्हाला तुमचा भगवंत खरोखरच भेटेल. 

लेखक, संकलक - डॉ नरेंद्र भिकाजी कदम.
 सुलेखन - डॉ. तेजस वसंत लोखंडे
(९७७३२६७००१) 

 या व वारीसंबंधी इतर अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी वाचा वारीवरील संकलित परिपूर्ण ग्रंथ “वारी जनातली, जनांच्या मनातली”.. आपली प्रत मिळवण्यासाठी दिलेल्या फोन क्रमांकावर संपर्क साधावा.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.