वारी जनातली, जनांच्या मनातली : अभंग माऊलींचे - १६


आषाढ शुद्ध नवमी, शालिवाहन शक १९४५, दिनांक २७ जून २०२३

 घनु वाजे घुणघुणा । वारा वाहे रुणझुणा ।
 भवतारकु हा कान्हा । वेगीं भेटवा कां ॥१॥
 चांद वो चांदणें । चांपे वो चंदनु ।
देवकी नंदनु विण ।  नावडे वो ॥२॥
 चंदनाची चोळी । माझें सर्व अंग पोळी ।
 कान्हो वनमाळी । वेगीं भेटवा कां ॥३॥
 सुमनाची सेज । सीतळ वो निकी ।
 पोळे आगिसारिखी । वेगीं विझवा कां ॥४॥
 तुम्हीं गातसां सुस्वरें । ऐकोनि द्यावीं उत्तरें ।
 कोकिळें वर्जावें । तुम्हीं बाईयांनो ॥५॥
 दर्पणीं पाहातां । रुप न दिसे वो आपुलें ।
 बापरखुमादेविवर विठ्ठलें । मज ऐसें केलें ॥६॥

संतांनी लिहिलेल्या विराण्या, भक्तांच्या मनातली भगवंताच्या भेटीची उत्कटता दाखवून जातात. माऊलींनी अत्यंत तरल शब्दांची योजना करून लिहिलेल्या या विराण्या भक्तांच्या मनातल्या भावनांच्या प्रवासाचे टप्पे दाखवतात. भगवंताच्या विरहाच्या जाणि‍वेने मनात निर्माण होणारे भावतरंग आणि मनातल्या भावनांचा सभोवतालच्या जीवनावर होणारा परिणाम माऊली फारच अचूक शब्दांत मांडतात. म्हणूनच माऊलींच्या या विराण्या केवळ एका व्यक्ति विशेषा पुरत्या मर्यादित न रहाता, प्रत्येकाच्या हृदयाला भिडतात. मानवाच्या बाबतीत जगण्याची प्रेरणा निर्माण करण्याची शक्ती प्रेम भावनेत आहे. विरहातून निर्माण होणाऱ्या प्रेम भावनेचे उत्तम उदाहरण म्हणजे या विराण्या आहेत. लिहिलेल्या प्रत्येक शब्दाशब्दातून विराहिणीच्या आर्ततेचा आविष्कार दिसून येतो. घनु वाजे घुणू घुणू या विराहिणीत माऊलींच्या कल्पकतेचा वेगळाच अंदाज नजरेस येतो.

 घनु वाजे घुणघुणा । वारा वाहे रुणझुणा ।
 भवतारकु हा कान्हा । वेगीं भेटवा कां ॥१॥
 
पावसाच्या आगमनाची चाहुल मेघांच्या गडगडाटाने होते. पावसाचे आगमन होताच प्रत्येक प्रेमी जीवाला आपल्या जिवलगाची आठवण नक्कीच होते. माऊलींच्या या विराहिणीतल्या भक्तिरसाच्या वर्षावात न्हात असलेल्या भक्ताला जिवलग कान्हाच्या भेटीची आस लागली आहे. ही आस किती उत्कट आहे हे सांगताना माऊली चक्क पडणाऱ्या पावसाचा दाखला देत आहेत. आकाशात मेघांचा आवाज होतो आहे. माऊलींनी मेघांच्या या आवाजाला गडगडाट असा जीव दडपून टाकणारा शब्द न योजता घुणघुणा असा अत्यंत तरल शब्द वापरला आहे. मेघांचे अन् वाऱ्याचे साहचर्य सर्वश्रुतच आहे. वाऱ्याचे गुणविशेष गती हे आहे. या विराहिणीला तिच्या कान्ह्याची त्वरेने भेट घ्यायची इच्छा आहे. वाऱ्याच्या वेगाने या कान्ह्याची आणि माझी भेट कोणी घालून देईल का ? असे तिचे सांगणे आहे. 

 चांद वो चांदणें । चांपे वो चंदनु ।
देवकी नंदनु विण ।  नावडे वो ॥२॥

वाङमयातील शितलतेचे सर्वोच्च परिमाण म्हणजे चांदणे अथवा चंदन. चंदनाच्या लेपानाने अंगाचा दाह शांत होतो हे आपण सारे जाणतो. पण हरिच्या विरहाने पिडीत असलेल्या या सखीला देवकीनंदानाच्या शिवाय चांदण्याची, चंदनाची शितलता नकोशी झाली आहे. भगवंताच्या विरहाने होणारा शरीराचा दाह या चांदण्याने तसेच चंदनानेही कमी होत नाही आहे.  

 चंदनाची चोळी । माझें सर्व अंग पोळी ।
 कान्हो वनमाळी । वेगीं भेटवा कां ॥३॥
 सुमनाची सेज । सीतळ वो निकी ।
 पोळे आगिसारिखी । वेगीं विझवा कां ॥४॥

एकदा श्री रामकृष्ण परामहंसाना एक दुर्धर आजार झाला होता. त्यांचे सर्वांग आगीने पोळल्यासारखे होत असे. गंगेच्या पाण्यात बसले, संगमरवराच्या फरशीवर झोपले तरी हा दाह कमी होत नव्हता. अनेक वैद्यांचे उपाय झाले पण उपशम झाला नाही. तेथून जाणाऱ्या एका संन्यासाने ‘ही अवस्था कोणत्याही व्याधीने झाली नसून भगवंताच्या विरहाने झाली आहे’ असे सांगितले. त्यांनी सांगितलेल्या उपाया बर हुकूम स्वामींना सुमनांच्या माळा परिधान करण्यात आल्या, अंगाला चंदनाचा लेप लावला आणि भगवंताचे नामस्मरण करण्यास सांगितले. या उपायाने त्यांच्या दाहाचे तीन दिवसात शमन झाले. भगवंताच्या विरहाने भक्ताची काय अवस्था होते हे दाखवण्यासाठी वानगीदाखल एक उदाहरण पुरेसे आहे.
माऊलींच्या अभंगातील विराहिणीला कृष्णाचा असह्य विरह झाला आहे. त्याची अन् माझी लवकर भेट घडवा. मी चंदनाची चोळी परिधान केली तरी चंदनाच्या शीतल गुणविशेषाच्या विरुद्ध तिचे सर्व अंग पोळून निघते आहे. सुमनांची शेज किती शीतल असते, या शेजेवर झोपले तरी ती शेज मला आगीसारखी भासते आहे. कृष्णाच्या विरहाने शरीरात निर्माण झालेला हा दाह लवकर शमवा. लवकरात लवकर माझी अन् त्याची भेट घडवून द्या आपसुक माझ्या जिवाची होणारी काहिली शमून जाईल.   

 तुम्हीं गातसां सुस्वरें । ऐकोनि द्यावीं उत्तरें ।
 कोकिळें वर्जावें । तुम्हीं बाईयांनो ॥५॥

कोकिळेगत फार सुरेख गाता. तुम्ही आपल्या जीवनात दंग आहात. माझे करुण स्वर ऐकून माझ्यासाठी काहीतरी करा. सख्यांनो, आता माझ्यासाठी तुम्ही त्या कृष्णाची आळवणी करा. भगवंत नेहमी भक्तांच्या हाकेला धाऊन येतो. तुम्ही तुमच्या सुस्वर स्वरांनी त्याची आळवणी केली की तो तुमच्याकडे येईल अन् पर्यायाने माझाही वियोग संपून जाईल. 

 दर्पणीं पाहातां । रुप न दिसे वो आपुलें 
 बापरखुमादेविवर विठ्ठलें । मज ऐसें केलें ॥६॥

स्थूळाकडून सूक्ष्माकडे घेऊन जाणारा हा भक्तीचा मार्ग, श्रुती संवेदानांपासून सुरू होऊन अंतरंगांकडे जाऊ लागतो. या भावनेने मी तुला पहाण्याचा प्रयत्न करते आहे. माझ्या मनाच्या आरशात पाहिले तरी मला आता प्रत्यक्ष भगवंताचेच दर्शन होते आहे. इतकी मी त्या भगवंताशी एकरुप झाले आहे. अन् मला असे विरहात टाकणारा आणि सतत माझ्या जवळ असणारा तो दुसरा कोणी नसून रखुमादेवीवरु माझा विठ्ठलच आहे.  
किती उत्कटतेने अन् रसिकतेने माऊली विराहिणीच्या मनातल्या प्रेमभावना व्यक्त करतात. बाह्य जगातील सौंदर्य, आनंद यांचा सुरेख मिलाफ भक्तीशी घडवून आणतात. सुमनांची शेज, चंदनाची चोळी, घुणघुणा वाजणारा घणु, रूणझुणा वाहणारा वारा या रसिकतेने वर्णन केलेल्या गोष्टी हरिच्या नामाविना माझ्या मनाला बिलकुल भावत नाहीत. माझ्या हरिशिवाय मला कोणत्याही गोष्टीत स्वारस्य नाही.

लेखक, संकलक - डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
(९८६९०६१८८९) 
 सुलेखन- डॉ. तेजस वसंत लोखंडे
(९७७३२६७००१) 

 या व वारीसंबंधी इतर अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी वाचा वारीवरील संकलित परिपूर्ण ग्रंथ “वारी जनातली, जनांच्या मनातली”.आपली प्रत मिळवण्यासाठी दिलेल्या फोन क्रमांकावर संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.