वारी जनातली, जनांच्या मनातली : अभंग माऊलींचे - ११


आषाढ शुद्ध चतुर्थी, शालिवाहन शक १९४५, दिनांक २२ जून २०२३

 रंगा येई वो ये रंगा येई वो ये ।
विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई ॥१॥
 वैकुंठवासिनी विठाई जगत्रजननी ।
 तुझा वेधु माझे मनीं ॥२॥
 कटीं कर विराजित । मुगुटरत्नजडित ।
 पीतांबरु कासिया । तैसा येई कां धावत ॥३॥
 विश्वरुपविश्वंभरे । कमळनयनें कमळाकरे वो ।
 तुझे ध्यान लागो । बापरखुमादेविवरे वो ॥४॥

संतांनी आपल्या असामान्य प्रतिभेने अनेक अजरामर ‘गौळणी’, ‘विरहिणी’ निर्माण केल्या आहेत. बहुतांश मराठी संतवाङमय हे ओवीबद्ध किंवा अभंग या छंदात आहे. या संतवाङमयात बरीच विविधता आहे. अनेक निरनिराळ्या प्रकारच्या रचना संत संहित्यामध्ये दिसून येतात. संतांनी अभंगात वापरलेली रुपके, आंधळ्याचे, पांगळ्यांचे, काल्याचे अभंग, गवळणी, विराण्या एक ना अनेक प्रकारच्या विविधतेने नटलेले हे वाङमय आहे. विरहिणी किंवा विराणी यामधून प्रामुख्याने भगवंताचे प्रेम, त्याचा विरह, आर्तता याचे दर्शन होते. भक्तिरसाने भरलेल्या या विराण्यांतून भगवंताच्या भेटीची तीव्र भावना दिसून येते.

लौकिकार्थाने विरहिणी, म्हणजे प्रियकराच्या दर्शन सुखाला पारखी झालेली, झुरणारी प्रेमळ प्रिया. आपला सखा सोडून गेल्यानंतर या सख्या विरहिणी होतात. जणूकाही त्यांची जीवनाची आसक्ती नष्ट झालेली असते. त्यांना कशातच रस वाटेनासा होतो. भगवंताच्या भेटीसाठी आसुसलेला भक्तही असाच असतो. भगवंताच्या भेटीपर्यंत त्याची जीवनाची आस नष्ट झालेली असते, त्याचे जीवन नीरस झालेले असते. कधी एकदा भगवंताची भेट होते यासाठी तो तळमळत असतो. 
माऊली ज्ञानेश्वरांच्या विराण्या भावनांचा उत्कट आलेख रेखाटतात. मनाला ग्रासलेल्या विरहाने विरहात झुरणाऱ्याच्या सभोवतालचे आकलन बदलून जाते. एक प्रकारची उदासीनता त्यात दिसून येते. त्यामुळे या विराण्या फारच भावोत्कट होऊन जातात. 

एखाद्याने किती साधना केली यापेक्षा कशी साधना केली हे जास्त महत्वाचे आहे. मित्र जोडताना मित्रांकडून आपल्याला काय फायदा होईल हा विचार न करताच मित्र जोडले जातात. तशीच भावना भगवंताची भक्ति करताना असेल तर त्यातून निर्माण होणारी साधना निश्चितच फलदायी होते. साधकाच्या मनात भगवंताचे निर्मळ प्रेम निर्माण होणे ही खरी गुरुची कृपा आहे. 

 रंगा येई वो ये रंगा येई वो ये । विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई ॥१॥

भगवंताचे प्रेम निर्माण झाले की किती आर्त आळवणी निर्माण होते हे वरील ओळींमधून दिसून येते. भक्ताला भगवंताच्या भेटीची आस आहे. एखादे बालक ज्याप्रमाणे मातेसाठी आक्रोश करत असते त्याच उत्कटतेने भक्त भगवंताला आळवतो आहे. त्याला हाक मारताना तो एकापेक्षा अनेक नावाने बोलावतो आहे. पांडुरंगाच्या भक्तीत तो त्याच्या इतका जवळ गेला आहे. आणि त्याचा विरह त्याला सहन होत नाही म्हणून तो विठ्ठलाला आर्ततेने साद घालतो आहे. पांडुरंगा ये रे, रंगा आता तरी ये. मी तुझ्या दर्शनाला व्याकुळलो आहे. तुच माझी विठाई आहेस, तुच किठाई, कृष्णाई आणि कान्हाई आहेस. 

 वैकुंठवासिनी विठाई जगत्रजननी । तुझा वेधु ये मनीं  ॥२॥ 

कान्हाई तु वैकुंठ निवासिनी आहेस. तुच या तिन्ही जागांची जननी आहेस. माझ्या मनाला तुझे फारच वेध लागले आहेत. तु मला लवकर दर्शन दाखव.

 कटीं कर विराजित मुगुटरत्नजडित । पीतांबरु कासिया तैसा येई कां धावत ॥३॥

प्रिय व्यक्तीच्या दर्शनाची मनापासून आस लागली असते तेव्हा आपण त्याला असशील तसा ये, अशा शब्दांत आर्ततेने बोलावतो. इथे तर चक्क भगवंताला बोलावणे धाडायचे आहे. भगवंताचे यथोचित वर्णन करून आहे त्या रूपात तु ये अशी भक्त साद घालत आहे. तुझ्या डोक्यावर रत्नजडित मुकुट आहे, कंबरेला भरजरी पितांबर नेसले आहेस, आणि कटीवर हात ठेऊन तु उभा आहेस. मला तु असशील तसा थेटायला ये. 

 विश्वरुपविश्वंभरे कमळनयनें कमळाकरे वो । तुझे ध्यान लागो बापरखुमादेविवरे वो ॥४॥

अवघ्या विश्वाला व्यापून असलेल्या विश्वंभरा, सुलोचन कमळाकरा, मला केवळ तुझेच ध्यान लागू दे. तुच रखुमादेवीचा वरू अन् माझा पिता आहेस. 
जोपर्यंत आपल्याला या निखळ प्रेमाचे अस्तित्व जाणवत नाही. आपल्या या भगवंताचे अजून दर्शन होत नाही. दर्शन न झाल्यामुळे मनात उदासीनता भरून राहिली आहे. आपला सभोवताल अचानक शांत झाल्याचा भास होऊ लागतो. या शांततेची टोचणी मनाला होऊ लागते तेव्हा या विराहिणीतली आर्तता मनाला भिडते.

लेखक, संकलक- डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
(९८६९०६१८८९) 
 सुलेखन - डॉ. तेजस वसंत लोखंडे
(९७७३२६७००१) 

 या व वारीसंबंधी इतर अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी वाचा वारीवरील संकलित परिपूर्ण ग्रंथ “वारी जनातली, जनांच्या मनातली” आपली प्रत मिळवण्यासाठी दिलेल्या फोन क्रमांकावर संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.