हे तुमच्या गावातले काय ओ ?



"दहावी बारावी झाली की मग गावाकडची मुलं मुंबईला जातात आणि मग गाव विसरतात' सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम राजकिय यंत्रणेने पसरवलेला हा गैरसमज खऱ्या गाववाल्या मुंबईकर नोकरदार मुलांच्या खऱ्या गोष्टी कुणापर्यंत पोहोचवत नाही. राजकारणी शब्द लिहिला म्हणून वाईट वाटलं असइ तर,होय मनीऑर्डर जगणारा जिल्हा अशी प्रत्येक राजकीय कार्यक्रमात आवर्जून भाषणबाजी करणारी माणसे फक्त स्टेजवरच असायची ना ? आणि म्हणून त्याच प्रभावात कोकणासाठी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्रामाणिकपणे  निस्वार्थी काम करणाऱ्या माणसाची गोष्ट समोर येत नाही. 24 तास आणि 365 दिवस राजकारण भिनत चाललेल्या समाजमनात काही गोष्ट आता माणुसकी म्हणून समजून घ्यायची गरज आहे. अशीच एक चळवळ म्हणजे 'माझा सिंधुदुर्ग विकास संस्था'

माझा सिंधुदुर्ग विकास संस्था' ही एक चळवळ आहे. कुठलेही राजकीय नेतृत्व नसताना मागची तब्बल 13 वर्ष ही संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणाईसाठी आणि गावखेड्यासाठी काम करतेय. आता ही संघटना म्हणजे कोण आणि चळवळ म्हणजे काय ते समजून घेतलं तर तुम्हाला सुखद धक्का बसेल.

अनेकांना वाटेल अनेक ग्रामविकास संस्था किंवा तरुण मुलांची क्रेझ म्हणून ही चळवळ असेल. पण जरा थांबा ! हा शंभर दोनशे किंवा पाचशे जणांचा हा समूह असेल.. पण तुम्हाला म्हणून सांगतो शंभर पाचशे नाही तर इथे फेसबुकच्या माध्यमातून तब्बल एक लाख वीस हजार सिंधुदुर्गप्रेमींचा इथे समूह फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल बोलत असतो. विकास पालव नावाचा एक अध्यक्ष नावाचा लाख दीड लाख कार्यकर्ता पाठबळ असणारा माणूस या सगळ्या गर्दीत दिसतो. 

दहावी बारावी पदव्युत्तर शिक्षण घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुले मुली मुंबईमध्ये येतात. नोकरीला लागतात आणि मिळालेल्या पगारातील काही भाग जिल्ह्यासाठी वेगळा काढतात. पूर, मदत , आपत्कालीन मदत यासाठी ही सगळी मंडळी एकवटतात. मुंबईला जाऊन गाव विसरतात ही गावी बसून सोशल मिडियावरच्या प्रवक्त्याना मोबाईलवर लिहायला फार सोपे आहे कारण जिल्ह्यात घडणाऱ्या खऱ्या गोष्टी त्यांनी लोकांनी सांगितल्या तर त्यांचे राजकारण कसे चालणार म्हणा ? असो, पण या खऱ्या गोष्टी लोकांना सांगणे त्यांचे नसले तरी आपले काम आहे ना ! म्हणून हे उपक्रम सांगणे गरजेचे आहे.

माझा सिंधुदुर्ग विकास संस्थेच्या माध्यमातून मागची तीन वर्षे एक उपक्रम राबवला जातोय. शालेय शिष्यवृत्ती वितरण सोहळा २०२३ हा उपक्रम कुडाळमध्ये शनिवारी 10 जून रोजी पार पडतोय. माझा सिंधुदुर्ग तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निराधार, अती गरीब परिस्थितीत शिकणाऱ्या १०० शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणास आधार देण्याच्या उद्देशाने संपूर्ण वर्षासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य शिष्यवृत्ती च्या स्वरूपात बहाल करण्यासाठी आयोजित केलेल्या हा सामाजिक उपक्रम माझा सिंधुदुर्गची नाही तर नोकरीसाठी गाव सोडलेल्या चाकरमानी मुलांची गोष्ट आहे. 


मित्रानो, मुंबईकर चाकरमानी 24 तास डोक्यात कोकण घेऊन जगतो. कोकण म्हणजे गणेशोत्सव आणि शिमगा नव्हे तर कोकणातील माणूस आणि गावखेड्याचे जगणे संपन्न होईल म्हणून आपला सहभाग असणे. याच आपल्या सहभागातून हा उपक्रम पार पडतोय. काही मुलांना छत्र नाही तर काहींची परिस्थिती नाहीय, पण तरीही ही मुलं माझ्या गावची आहेत हे नातं आज खूप मोठं आहे. सगळीच मुलं आपल्या गावची आहे.  आणि आपल्या अखंड गावाचं नाव आहे, 'माझा सिंधुदुर्ग' !


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.