वारी जनातली, जनांच्या मनातली : अभंग माऊलींचे - १८

देवशयनी आषाढी एकादशी, शालिवाहन शक १९४५, दिनांक २९ जून २०२३

 अवचिता परिमळु झुळकला अळुमाळु । मी म्हणे गोपाळु आला गे माये ।
 चांचरती चांचरती बाहेरी निघालें । ठकचि मी ठेलें काय करुं ॥१॥
 मज करा कां उपचारु अधिक ताप भारु । सखिये सारंगधरु भेटवा कां ॥ध्रु०॥
 तो सांवळा सुंदरु कासे पीतांबरु । लावण्य मनोहरु देखियेला ॥
 भरलिया दृष्टि जंव डोळां न्याहाळी । तव कोठें वनमाळी गेला गे माये ॥२॥
 बोधोनि ठेलें मन तंव जालें अने आन । सोकोनि घेतले प्राण माझे गे माये ।
बापरखुमादेविवरु विठ्ठल सुखाचा । तेणें कायामनेंवाचा वेधियेलें ॥३॥

संतांची कवने मुख्यत: पंढरी आणि पांडुरंग यांच्या भोवती फिरताना दिसतात. पांडुरंग आणि पंढरपूर हे या कवनांचे मुख्य विषय आहेत. त्यांनी या कवनांना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या काव्यामध्ये शब्दबद्ध केले आहे. अंबुला, आंधळे, पांगळे, वासुदेव, गौळणी, विराण्या इ. अनेक प्रकारांनी त्यांनी काव्ये लिहिली आहेत. शृंगार, भगवंताची आस अन् त्याचा विरह यातून निर्माण झालेल्या भक्तिरसाचा फारच भावोत्कट आविष्कार संतांच्या विराण्यांमधून पहायला मिळतो. 

विरहिणी म्हणजे अभंगांचा शृंगारात्मक तरीही भक्तिरस प्रधान आविष्कार. विराण्यांमध्ये विरहाच्या सोबतीने शृंगार रसाचे अप्रतिम मिश्रण करून सरतेशेवटी भक्तिरसाचा संगम आपल्याला पहायला मिळतो. आपल्या परमेश्वराला प्रियकर, प्रेयसी किंवा पति, भार्या यांच्या रुपात पाहून निर्माण केलेले काव्य प्रामुख्याने विरहिणी या प्रकारात येते. स्त्री स्वभावाच्या अत्यंत तरल भावविश्वाचे दर्शन या विराण्यांतून पहायला मिळते. त्यामुळेच स्त्री स्वभावाचे सारे विभ्रम त्या शब्दातून प्रामुख्याने दिसून येतात.  

 अवचिता परिमळु झुळकला अळुमाळु । मी म्हणे गोपाळु आलागे माये ।
 चांचरती चांचरती बाहेरी निघालें । ठकचि मी ठेलें काय करुं ॥१॥
 मज करा कां उपचारु अधिक ताप भारु । सखिये सारंगधरु भेटवा कां ॥ध्रु०॥

या चरणात माऊलींच्या अप्रतिम शब्द प्रतिभेचे दर्शन घडते. ‘झुळकला अळुमाळू’ मनाला भावणारा हा ‘अवचिता परिमळू’ हळूहळू पसरतो आहे. हळुवारपणे पसरणाऱ्या सुगंधासाठी यापेक्षा चपखल शब्द कुठे मिळणार? स्त्रियांचे भावविश्व आपल्या प्रियकराशी जोडलेले असते. त्याच्या प्रत्येक रोमरोमाचा तिला अनुभव असतो. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचा एक विशिष्ट गंध असतो. त्याच्या शरीराच्या या गंधाची तिला इतकी सवय झालेली असते की केवळ शरीराच्या या गंधावरून ती त्याला ओळखू शकते. अशीच एक विरही स्त्री आपल्या प्रियकराच्या आराधनेत आहे. अवचित कोणीतरी दारावर आल्याचा तिला भास झाला आहे. तिच्या प्रियकराच्या शरीराचा गंध तिला अस्पष्टपणे जाणवतो आहे. इतके दिवस ज्याची मी आतुरतेने वाट पहात होते तो माझा गोपाळ आलाय, होय नक्की माझा गोपाळ आला आहे.    

दारावर चाहूल लागलेली आहे. परिचित परिमळ पसरला आहे. ज्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे तिच व्यक्ति दारावर आली असणार, किती धांधल उडाली असेल तिची ? नीट सजून-सवरून जाण्याएवढाही काळ दवडण्याची तिच्या मनात इच्छा नाही. माझ्या प्रियाला भेटायला आहे तशीच मी ‘चांचरत’ बाहेर गेले, पण हाय रे दैवा, तो कुठेच दिसत नाही. माझ्या मनाने ही फसवी चाहूल देऊन माझीच फसगत केली की काय ? तो मला दिसत नाही आहे, आता मी काय करू? मला लवकर उपचार करा, माझ्या आजाराचे औषध एकच आहे ते म्हणजे, मला लवकरात लवकर त्या सारंगधराला भेटवा. 

 तो सांवळा सुंदरु कासे पीतांबरु । लावण्य मनोहरु देखियेला ॥
 भरलिया दृष्टि जंव डोळां न्याहाळी । तव कोठें वनमाळी गेला गे माये ॥२॥

या विराहिणीच्या मनातला सखा कसा आहे याचे वर्णन पुढच्या चरणात आले आहे. सावळा, सुंदर, पितांबर नेसलेला असा तो मनोहरी लावण्य लेऊन आलेला आहे. त्याचे रुप डोळ्यात साठवून ठेवत होते. त्याला पाहता पाहता माझे डोळे भरून आले आणि इतक्यात तो कुठे गेला ते कळलेच नाही.

 बोधोनि ठेलें मन तंव जालें अने आन । सोकोनि घेतले प्राण माझे गे माये ।
 बापरखुमादेविवरु विठ्ठल सुखाचा । तेणें कायामनेंवाचा वेधियेलें ॥३॥

त्याने माझ्या मनाचा इतका ठाव घेतला आहे, माझ्या मनाला बोधून घेतले आहे की माझी नजर आणि मन कायम त्याच्यावरच खिळून आहे. त्याच्या ध्यासाने माझा प्रत्येक श्वास अन् श्वास त्याचाच झाला आहे. या सगळ्यांचा परिणाम असा झाला आहे की त्याच्या भक्तीने माझे प्राण सोकून (शोषून) घेतले आहेत. हे सगळे घडवून आणणारा, कर्ता करविता कोण आहे तर तो आहे रखुमादेविवरु माझा सुखाचा विठ्ठल. त्यानेच माझे काया, वाचा अन् मन वेधले आहे.
   
साधक, गुरुने दिलेली नित्य साधना करीत असताना त्याने केलेल्या साधनेचे फलित म्हणून त्याला अचानक आत्मसाक्षात्काराचा भास झाला होतो. क्षणभरासाठी त्याला विश्वव्यापी शक्तीचे दर्शन झाले होते. या तेजाला कोणी गोविंद म्हणतो तर कोणी विठ्ठल म्हणतो. मात्र या अभंगात माऊली त्या तेजाला माझा गोपाळ आला असे संबोधतात. अजून साधना पूर्ण होणे बाकी आहे. अशा वेळी मनाच्या अवखळ वृत्तीने झालेल्या साक्षात्काराला डोळे भरून पहाण्याची इच्छा होणे सहाजिक आहे. त्यासाठी समाधि अवस्थेतून बाहेर यावे लागते. झालेला हा आत्मसाक्षात्कार लौकिकात होणे अशक्य आहे. दिसलेला तो गोपाळ म्हणून नुसतीच चमक दाखवून, साधकाला ठकवून जातो. आत्मप्रकाशाचा असा बिंदु साधकाला दिसतो तेव्हा त्याला पुन्हा त्या तेजाच्या भेटीची उत्सुकता लागते. सतत मन बेचैन होते, बेचैनीने शरीराचा दाह होतो. यातून सुटका होण्यासाठी साधक गुरूला विनवणी करतो. माझ्या देवाला मला एकदा भेटवा. 
अशा अवस्थेतून बाहेर येण्यासाठी सद्गुरू साधकाला फिरून पुन्हा साधनेत आणतात. साधनेने पुन्हा मन एकाग्र होऊ लागले की त्याला पुन्हा ते आत्मरूप दिसू लागते. दिसणारे हे रुप प्रत्येकाला वेगवेगळे दिसू शकते. मनात असलेल्या ईश्वराच्या भावनेप्रमाणे हे रुप दृष्टीस येते.  माऊलींचे गुरु निवृत्तीनाथ यांची त्यांच्यावर फार मोठी कृपा होती म्हणून माऊलींना हा साक्षात्कार झाला होता. त्यांच्या उपदेशाने आत्मा हाच विठ्ठल आहे यांची जाणीव त्यांना झाली होती आणि बापरखुमादेविवरु हे सर्व सुखांचे आगर आहे हे सत्य कळून आले होते. 
साधनेच्या अंगाने, भक्तिरसाची अनुभूती घेऊन संतांच्या विराण्यांचा अर्थ जाणण्याचा प्रयत्न केला तर एक वेगळाच विस्मयकारी अनुभूती देणारा, अंगावर शहारा आणणारा अर्थ या विराण्यांमधून प्रतित होतो. भगवंताच्या भेटीची पराकोटीची व्याकुळता आणि त्यातून निर्माण झालेला विरह, मनातल्या आर्ततेला खोल आयाम देऊन जातो. अन् त्यातून एकापेक्षा एक बहारदार अशी अजरामर कवने निर्माण होतात.

लेखक, संकलक - डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
(९८६९०६१८८९) 
 सुलेखन - डॉ. तेजस वसंत लोखंडे
(९७७३२६७००१) 

 *या व वारीसंबंधी इतर अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी वाचा वारीवरील संकलित परिपूर्ण ग्रंथ “वारी जनातली, जनांच्या मनातली”. आपली प्रत मिळवण्यासाठी दिलेल्या फोन क्रमांकावर संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.