वारी जनातली, जनांच्या मनातली : अभंग माऊलींचे - १७

आषाढ शुद्ध दशमी, दिनांक २८ जून २०२३

अरे अरे ज्ञाना झालासि पावन । तुझें तुज ध्यान कळों आलें ॥१॥
 तुझा तूंचि देव तुझा तूंचि भाव । फ़िटला संदेह अन्यतत्त्वीं ॥२॥
 मुरडूनियां मन उपजलासि चित्तें । कोठें तुज रितें न दिसे रया ॥३॥
 दीपकीं दीपक मावळल्या ज्योती । घरभरी वाती शून्य झाल्या ॥४॥
 वृत्तीची निवृत्ति आपणासकट । अवघेंची वैकुंठ चतुर्भुज ॥५॥
 निवृत्ति परमअनुभव नेमा । शांति पूर्ण क्षमा ज्ञानदेवो ॥६॥

माऊलींच्या या अभंगात माऊलींच्या समाधि अवस्थेचे वर्णन आलेले आहे. समाधि साधण्याची प्रक्रिया फार अवघड आहे. समाधि आपसूक लागते ती लावता येत नाही. समाधि हा माऊलींचा स्थायीभाव आहे. त्यांचे मन ध्यानात रमते. मनाला मुरड घालून षडरिपूंना आवर घालून नामस्मरणाच्या मार्गाने हे अलौकिक ज्ञान मिळते. माऊलींच्या प्रत्येक अभंगातील प्रत्येक ओवींचा अर्थ फार गहन आणि अनेकार्थी आहे. अनेक प्रकारच्या उपमांचा, रुपकाचा वापर करून माऊली सहज सोप्या भाषेत समाजाला संबोधित करतात. सकृतदर्शनी मनातील बदलांचा मागोवा घेताना माऊली या ओव्यांमधून दिसत असले तरी त्याचा गर्भितार्थ काही वेगळाच लागत असतो.  

साधक साधना करत असतो त्यांचे अंतिम ध्येय असते ते म्हणजे आत्मज्ञान करून घेणे. हे आत्मज्ञान होण्यासाठी सद्गुरूची कृपा होणे आवश्यक आहे. ज्यावेळेस ही आत्मज्ञानाचा प्रकाश साधकाला गवसतो तेव्हा त्याची काय अवस्था होते याची अनुभूती या अभंगातून आपल्याला येते. 

 अरे अरे ज्ञाना झालासि पावन । तुझें तुज ध्यान कळों आलें ॥१॥

अत्यंत जवळच्या माणसाला प्रेमाने आपण अरे म्हणून संबोधतो. अरे, तुझ्या जीवनात हा आनंदाचा क्षण आलेला आहे, तुला आत्मज्ञानाची अनुभूती प्राप्त झाली आहे. ही अनुभूती मिळाल्याने साहजिकच तुला परमानंद झालेला असणार आहे. आनंद ही मनाची बाह्य स्थिती आहे. मनाच्या अत:रंगातही या आत्मज्ञानाने पावन झाल्याचे समाधान प्राप्त झाले आहे. 

 तुझा तूंचि देव तुझा तूंचि भाव । फ़िटला संदेह अन्यतत्त्वीं ॥२॥

माऊलींना झालेल्या आत्मज्ञानाने त्यांच्या प्रत्यक्ष ‘अहं ब्रह्मास्मी’ याची जाणीव झालेली आहे. स्वत: कोण आहोत हे कळले की माणूस खऱ्या अर्थाने पावन होतो. द्वैत अद्वैताच्या पलिकडे जाऊन त्यांना खऱ्या देवाची ओळख झाली आहे. अद्वैतात परमेश्वर आणि भक्त एकरुप होतात असे म्हटले जाते. मनातले द्वैत निवळले आहे त्यामुळे अखंड चराचर व्यापून असलेल्या देवाची ओळख झाली आहे. त्यामुळे मनात असलेले सगळे संदेह निमले आहेत. 

 मुरडूनियां मन उपजलासि चित्तें । कोठें तुज रितें न दिसे रया ॥३॥

सर्व संतांनी सांगितले आहे की मनाची धाव ही नेहमी विषयांकडे असते. मनाला एका ठिकाणी स्थिर करणे अत्यंत कठीण असते. ते सतत एका विषयांकडून दुसऱ्या विषयाकडे आकृष्ट होत असते. विषयांकडे धावणाऱ्या या मनाला मुरड घातल्याने चित्तवृत्ति शांत होतात. या मनाला विषयांपासून दूर करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यातल्या त्यात सोपा मार्ग हा ‘नामस्मरणाचा’ आहे. नामस्मरणाने मनाचे चिंतन थांबते. मनाचा रितेपणा नाहीसा होतो. 

 दीपकीं दीपक मावळल्या ज्योती । घरभरी वाती शून्य झाल्या ॥४॥

आत्मसाक्षात्कार झाला की विषयासक्ती संपते. मनातल्या सगळ्या इच्छा निमून जातात. मनाच्या या इच्छा निमून जातात म्हणजे नेमके काय होते? इच्छा नसलेला माणूस सापडणे फारच कठीण आहे. मनातल्या इच्छा संपून जातात म्हणजे फक्त स्वत:साठी त्याची जगण्याची इच्छा शिल्लक रहात नाही. त्यामुळे केलेली प्रत्येक कृती ही समाजासाठी असते. ज्याप्रमाणे, 

 दीप दीपिका शशी तारा । होतु का कोटिवरी रे ।
 परी न सरे निशी नुगवे दिवसु । दिनकर नाथे जियोपरी रे ॥
 नद्धरिजे नुद्धरिजे नुद्धरिजे गोपाळवीण नुद्धरिजे ॥
 (ज्ञानेश्वर सार्थ गाथा, अभंग २६०)

हजारो लाखों दिवे, चांदण्या, चंद्र, प्रकाशले तरी त्यामुळे अंधकाराचा नाश होत नाही. तसेच सूर्य उगवल्या शिवाय उजेड होत नाही, तद्वत भगवंताचे नाम घेतल्याशिवाय उद्धार होणार नाही. ज्याप्रमाणे चंद्र, चांदण्या यांचे तेज सुर्योदयाने नाहीसे होते त्याप्रमाणे आत्मज्ञानाने शरीरातील सर्व वासनांचे शमन होते. चित्ताचा लय होतो. ते वासना रहित होते.   

 वृत्तीची निवृत्ति आपणासकट । अवघेंची वैकुंठ चतुर्भुज ॥५॥

मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे अंत:करण चतुष्टय आहेत. आत्मज्ञानाने मनातला हा अहंकारही गळून जातो. आत्मज्ञानाने वृत्तीची निवृत्ती आपणासाहित म्हणजे अहंकारांसहित होते. अहंकार गळून गेल्यानंतर काय होते? शरीरातील वैकुंठ म्हणजे सहस्त्रार चक्र, शरीरातल्या सर्व शक्ती एकत्र येऊन, मनाच्या सगळ्या चित्त वृत्ती गळून पडून मनाची परम अवस्था समाधि साध्य होते.   

 निवृत्ति परमअनुभव नेमा । शांति पूर्ण क्षमा ज्ञानदेवो ॥६॥

ही समाधि अवस्था प्राप्त होण्यासाठी काय केले पाहिजे ? ज्ञानदेवांनी येथे आपला अनुभव कथन केला आहे. गुरुबंधू निवृत्तिनाथांनी सांगितल्याप्रमाणे नेमाने म्हणजे नित्य नामस्मरण मी केले, त्यांनी सांगितलेली साधना मी नियमितपणे केली. म्हणून मला या अवस्थेत पोहोचता आले. सरते शेवटी दया, क्षमा, शांती देणारे हे आत्मज्ञान सर्वांना लाभो ही माऊलींची इच्छा आहे. म्हणजेच नामस्मरण करण्याची सुबुद्धी सगळ्यांना प्राप्त होवो ही अपेक्षा ज्ञानदेव व्यक्त करतात..

लेखक, संकलक - डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
(९८६९०६१८८९) 
 सुलेखन- डॉ. तेजस वसंत लोखंडे
(९७७३२६७००१) 

या व वारीसंबंधी इतर अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी वाचा वारीवरील संकलित परिपूर्ण ग्रंथ “वारी जनातली, जनांच्या मनातली”.आपली प्रत मिळवण्यासाठी दिलेल्या फोन क्रमांकावर संपर्क साधावा.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.