ज्येष्ठ कृष्ण द्वादशी, शालिवाहन शक १९४५, दिनांक १५ जून २०२३.
माझे जिवींची आवडी | पंढरपुरा नेईन गुढी ॥१॥ पांडुरंगी मन रंगले । गोविंदाचे गुणीं वेधलें ॥२॥ जागृति स्वप्न सुषुप्ति नाठवे । पाहतां रुप आनंदी आनंद साठवे ॥३॥ बापरखुमादेविवर सगुण निर्गुण । रुप विटेवरी दाविली खुण ॥४॥
अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर. पंढरीचे अस्तित्व फार पुरातन आहे. संत नामदेवांच्या या अभंगातून पंढरीचे पुराणत्व सिद्ध होते.
आधी रचिली पंढरी | मग वैकुंठ नगरी ||
जेव्हा नव्हते चराचर | तेव्हा होते पंढरपूर ||
जेव्हा नव्हती गोदा गंगा | तेव्हा होती चंद्रभागा ||
चंद्रभागे तटीं | धन्य पंढरी गोमटी ||
ईश्वराने आधी पंढरीची रचना केली नंतर वैकुंठाची निर्मिती झाली. पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्रांपैकी एक म्हणून पंढरीचा उल्लेख केला जातो. म्हणूनच प्रत्येक हिंदू आयुष्यात एकदा तरी पंढरपूरला जावे, अशी इच्छा बाळगून असतो.
अशा या पवित्र पंढरीच्या वारीचा इतिहास देखील फार जुना आहे. अनेक शतकांची परंपरा या वारीला लाभलेली आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या घराण्यातही पंढरपूरच्या वारीची परंपरा चालत आलेली होती. त्यांच्या आजी नीराबाई वारीला जात असत, असे उल्लेख आलेले आहेत.
दरसाल येणारा हा पंढरीचा उत्सव, येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांची वाट पहात असतो. पंढरीचा पांडुरंगही आपल्या येणाऱ्या भक्तांच्या प्रतीक्षेत असतो. भक्त पंढरीत पोहोचले की प्रत्यक्ष पांडुरंगालाही फार आनंद होतो. पंढरीच्या भक्तांचा असा दृढ विश्वास आहे की, एकदा वारी केली की पुढे दरवर्षी पांडुरंग आपसूक न चुकता वारी घडवून आणतो. तसे तर वर्षांच्या बाराही एकादशीला पंढरीकडचा वारकऱ्यांचा ओघ वाढलेला असतो. पण आषाढी एकादशीचा सोहळा अनुपम्य असतो.
ज्याप्रमाणे सागराच्या भेटीला निघालेली सरीता वाटेत येणाऱ्या सगळ्या जीवसृष्टीला जीवनदान देत जाते तद्वत अखंड चालणारी ही वारीही साऱ्या जीवांना संजीवनी देऊन जाते. इतर देवस्थानांवर दृष्टीस येणारे भक्तीतत्व हे स्थिर असते. वारीत वाहणारे हे भक्तीतत्व चल, प्रवाही व गतीमान आहे. भागवत धर्माने प्रवर्तित केलेले हे भक्तितत्त्व समूहप्रधान आहे तसेच ते गतिमानही आहे. पंढरपूरची वारी ही या भक्तिमार्गातील महत्त्वाची परंपरा आहे. वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. पंढरपूर हे भक्तीचे आद्य पीठ आहे. विटेवरचा श्री विठ्ठल या पीठाचा अधिपती आहे. हा भक्तीचा सोहळा अक्षय आहे.
माझे जिवींची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ॥१॥
आवड असली की सवड मिळते, हे सगळ्यांनाच माहिती आहे. याच आवडीतून आपण आपल्या ईप्सिताकडे वाटचाल करतो. माऊली म्हणतात, ‘‘पंढरपूरला वारीबरोबर जाणे ही माझ्या मनाची आत्यंतिक आवड आहे. पंढरीला जाण्याने माझ्या मनाला आत्यंतिक आनंद प्राप्त होतो. म्हणूनच माझे मन पांडुरंगाच्या भक्तिरंगात बुडून जाते.” पंढरपूरच्या आंतरिक ओढीने भक्तीची, ज्ञानाची, समतेची, आनंदाची, धन्यतेची गुढी घेऊन जाण्याचा आपला निर्धार संत ज्ञानेश्वर या अभंगातून व्यक्त करतात.
वारीतील सर्वात महत्वाची उल्लेखनिय गोष्ट म्हणजे वारीत अंगिकारले जाणारे समतेचे तत्व. वारीत सारेच समान असतात. उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, लहान-थोर हे सगळे भेदाभेद तिथे गळून जातात. ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ या तत्वाचे मन:पूर्वक आचरण केले जाते. माऊलींनी अभंगात वर्णन केलेली ही गुढी समतेची, विश्वबंधुत्वाची आहे. तसेच ही गुढी अत्याधिक आनंद प्रदान करणारी आहे. दिंडीत निर्माण होणारा मृदंग, टाळ, वीणेचा आवाज मनाला सुखावून जातो. नामसंकीर्तनाचा जयघोष मनाला गारुड घालतो. ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’ अशी अवस्था या वारीत मनात निर्माण होते. म्हणून मला पंढरपूरला जायचे आहे.
पांडुरंगी मन रंगले । गोविंदाचे गुणीं वेधलें ॥२॥
जागृति स्वप्न सुषुप्ति नाठवे । पाहतां रुप आनंदी आनंद साठवे ॥३॥ बापरखुमादेविवर सगुण निर्गुण । रुप विटेवरी दाविली खुण ॥४॥
पंढरीच्या पांडुरंगाच्या भक्तीत माझे मन रंगले आहे. या गोविंदाच्या अनेक गुणांनी माझ्या मनाचा वेध घेतला आहे. मला आता गोविंदा शिवाय इतर काहीही समोर दिसत नाही. इतकेच नव्हे तर या गोविंदाचे नामस्मरण करत असताना मला काळाचेही भान राहिले नाही. नामस्मरण करत असताना माझे जागृती, सुषुप्ती अन् स्वप्न या तीनही अवस्थांचे भान हरपले आहे. विठ्ठलाच्या या सावळ्या रुपाचे दर्शन होताच मनात आनंदाच्या लाटांची आवर्तने सुरू होतात. त्याचे हे निराकार निर्गुण रुप मनात आनंद निर्माण करून जाते. तर रखुमादेवीचा हा वर विटेवर उभा आहे, हीच त्याच्या साकार सगुणपणाची खूण आहे.
लेखक, संकलक - डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
(९८६९०६१८८९)
सुलेखन - डॉ. तेजस वसंत लोखंडे
(९७७३२६७००१)
या व वारीसंबंधी इतर अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी वाचा वारीवरील संकलित परिपूर्ण ग्रंथ “वारी जनातली, जनांच्या मनातली' .. आपली प्रत मिळवण्यासाठी दिलेल्या फोन क्रमांकावर संपर्क साधावा.