वारी जनातली, जनांच्या मनातली : अभंग माऊलींचे - १२


आषाढ शुद्ध पंचमी, शालिवाहन शक १९४५, दिनांक २३ जून २०२३

 रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा । सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा ॥१॥
 चरणकमळदळ रे भ्रमरा । भोगी तूं निश्चळ रे भ्रमरा ॥२॥
 सुमनसुगंधु रे भ्रमरा । परिमळ विद्वदुरें भ्रमरा ॥३॥
 सौभाग्य सुंदरु रे भ्रमरा । बापरखुमादेविवरु रे भ्रमरा ॥४॥

माऊलींची प्रतिभाशक्ती अफाट होती. आपल्या काव्यात त्यांनी काव्य रचनेतले अनेक अलंकार वापरुन आपले काव्य सजवले आहे. रुपकाचा वापर करून त्यांनी अनेक कवने केली. ‘रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा’ या अभंगात त्यांनी ‘उपमा’ अलंकाराचा सुरेख प्रयोग केला आहे. ज्या वस्तूविषयी बोलायचे असते ती आणि तिच्या भिन्न गोष्टीची एकमेकांसोबत तुलना करून त्या दोन गोष्टीत साम्य पाहिले जाते व ते सुंदर रीतीने दर्शविले जाते, त्यास 'उपमा अलंकार' असे म्हटले जाते. ज्या वयात मुलांना चांगल्या वाईटाची अजून पुरेशी ओळखही झालेली नसते त्या वयात सातशे वर्षांपूर्वी माऊलींनी केलेले लेखन फारच अफाट आहे. हे उच्चकोटीचे तत्वज्ञान मांडण्यासाठी अफाट प्रतिभा असायलाच हवी.

माऊली ज्ञानेश्वर या अभंगातून नामस्मरण करत असताना मनोनिग्रह असणे आवश्यक आहे असे सांगत आहेत. जगात मनाएवढी चंचल गोष्ट कोणतीही नाही. क्षणापूर्वी भुईवर असलेले मन क्षणार्धात आकाशात पोहोचते हे बहिणाबाईंच्या कवितेतून आपण अनेकदा वाचले आहे.   

 रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा । सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा ॥१॥

मन हे किती चंचल आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. ‘क्षणात भुईवर तर क्षणात आभायात’ जाणाऱ्या या चंचल मनाला माऊलींनी भ्रमराची उपमा दिली आहे. भ्रमर जवळ येत असताना प्रत्यक्ष चक्षूने त्याचे दर्शन झाले नाही तरी त्याच्या पंखांच्या रवाने त्याचे अस्तित्व आपणास समजून येते. मनाचेही काहीसे तसेच आहे. मानवी दृष्टीस न दिसणाऱ्या मनाला म्हणूनच माऊलींनी ‘रुणुझुणु’ करणाऱ्या भ्रमराची उपमा दिली आहे. जोवर मनाची एकाग्रता साधली जात नाही तोवर नामस्मरण होणे अशक्य आहे. या अचपळ मनाची चंचलता हा जो मोठा अवगुण आहे, त्याचा त्याग करायला हवा असे माऊली सांगत आहेत. 

 चरणकमळदळ रे भ्रमरा । भोगी तूं निश्चळ रे भ्रमरा ॥२॥

ज्याप्रमाणे कमलदलात गेल्यानंतर भ्रमर शांत होतो तद्वत संतांच्या चरणांशी लीन झाल्यानंतर मनाची ही भ्रमंती थांबणार आहे. सतत चंचल असणे हे मनाचे लक्षण आहे. विषयासक्ती हा चंचलतेचा परिणाम आहे. या भ्रमररूपी मनाला विषय सतत आपल्याकडे आकृष्ट करत आहेत. या आकर्षणांपासून तुला दूर व्हायचे असेल तर तु स्वत:ला संतांच्या चरणी समर्पण कर. संतांच्या संगतीचा परिणाम सांगताना तुकाराम महाराज म्हणतात. 

 “संतचरणरज लागता सहज । वासनेचं बीज जळूनी जाय ।।“ (तुकाराम गाथा, ४३६४)

संतांच्या चरणाचा धुलीकण अंगाला लागताच वासनेचं बीज गळून जाते. मनात रामनामाची आवड निर्माण होते. आंतरिक समाधान प्राप्त होते. जेव्हा कंठात भगवंताचे नाम येते, मनात प्रेमभाव निर्माण होतो, तेव्हा हृदयात राम प्रकट होतो. अशा संतांच्या संगतीत स्वत:ला रमव, म्हणजे तुला आंतरिक समाधानाची अनुभूती होईल. 

 सुमनसुगंधु रे भ्रमरा । परिमळ विद्गदु रें भ्रमरा ॥३॥

वरच्या चरणात माऊलींच्या शब्दप्रतिभेचे पुन्हा प्रत्यंतर येते. ‘सुमन’ म्हणजे फुल आणि ‘सुमन’ म्हणजे चांगले मन. ज्याप्रमाणे कमळाचा सुगंध संगतीने भ्रमराला प्राप्त होतो, तद्वत संतांच्या संगतीने मानवाला नामस्मरणाचा सुगंध प्राप्त होतो. तो सुगंध साधकाला परमानंदाचा अधिकारी बनवतो. ‘विद्गदु’ या शब्दाने पसरवणे हा अर्थ प्रतित होतो. भ्रमरला प्राप्त झालेला सुगंध इतरांना मिळणे आणि साधकाला मिळालेला परमानंद त्याने इतरांना देणे यासाठी माऊलींनी किती चपखलपणे 'परिमळु विद्गदु' या शब्दांची योजना केली आहे.  

 सौभाग्य सुंदरु रे भ्रमरा । बापरखुमादेविवरु रे भ्रमरा ॥४॥ 

जो ईश्वरभक्तीचा परिमळ मला या संतांच्या सहवासानें लाभला आहे हे माझे सौभाग्य आहे. या संतांच्या सहवासाने हे भ्रमररुपी चंचल मन भक्तीचा झरा बनते आणि ते ईश्वरभक्तीचा परिमळ आसमंतात पसरवते. हे रखुमादेवीवरा, माझ्या या भ्रमररुपी मनाला संतसंगती जेव्हा प्राप्त होईल ते माझे सौभाग्य असेल.

लेखक, संकलक - डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
(९८६९०६१८८९) 
 सुलेखन - डॉ. तेजस वसंत लोखंडे
(९७७३२६७००१) 

 या व वारी संबंधी इतर अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी वाचा वारी वरील संकलित परिपूर्ण ग्रंथ “वारी जनातली, जनांच्या मनातली”.आपली प्रत मिळवण्यासाठी दिलेल्या फोन क्रमांकावर संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.