अनधिकृत फेरीवाल्यांचा नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी – पालकमंत्री दीपक केसरकर‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात साधला 'जनतेशी सुसंवाद'


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दक्षिण मुंबई स्थित ‘ए’ आणि ‘बी वॉर्ड’ मध्ये अनेक ऐतिहासिक आणि वारसा इमारती आहेत. या परिसरात अधिकृत फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र झोन तयार करून अनधिकृत फेरीवाल्यांचा नागरिक, पर्यटकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

नागरिकांच्या विविध समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ आले आहे. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध वॉर्डमध्ये पालकमंत्री म्हणून आपण स्वतः रहिवाशांची भेट घेत असून त्यांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे श्री. केसरकर यांनी सांगितले. गुरूवारी सायंकाळी त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘ए’ आणि ‘बी’ वॉर्ड मधील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

मुंबईतील नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगून श्री. केसरकर म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविल्या जाणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांना दुकानावरून अन्नधान्य आणणे शक्य होत नाही. याकरिता अन्न धान्य वाटप करण्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

दक्षिण मुंबईतील अनधिकृत फेरीवाले, गुन्हेगारी रोखणे, पदपथावर राहणाऱ्यांना निवारा उपलब्ध करून देणे आदी समस्या पालकमंत्र्यांसमोर प्रामुख्याने मांडण्यात आल्या. गुन्हेगारी रोखण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.