ज्येष्ठ कृष्ण नवमी, शालिवाहन शक १९४५ दिनांक, १२ जून २०२३.
रुप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥१॥
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥ध्रु०॥
बहुता सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥२॥
सर्व सुखाचें आगरु । बापरखुमादेविवरु ॥३॥
दिंडीचा रोजचा दिनक्रम अगदी आखीव रेखीव असतो. दिंडी चालत असताना गायले जाणारे अभंगही विशिष्ठ क्रमाने गायले जातात. अगदी पहिल्या दिंडीपासून ते शेवटच्या दिंडीपर्यंत या क्रमात कुठेही बदल घडत नाही. सर्वप्रथम मंगलाचरणाचे अभंग गायले जातात. त्यातही पहिला रुपाचा अभंग गायला जातो. दिवसाच्या प्रत्येक वेळी दिंडीची सुरुवात होताना या अभंगाने होते. या अभंगात माऊलींनी आपल्या लाडक्या देवतेचे दर्शन झाल्यानंतर अत्यंत हर्षोत्साहाने भगवंताचे वर्णन केले आहे. श्री हरीचे अत्यंत सुरेख वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी या अभंगात केले आहे.
पंढरीची वारी म्हणजे मोठा अनुपम्य सोहळा असतो. आषाढी वारीला देशाच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला येत असतात. प्रत्येकाच्या मनात पंढरीरायांच्या दर्शनाची आस असते. या आसेपोटी अनेक दिवस पायी वाटचाल करत ते पंढरीच्या दिशेने वाटचाल करत असतात. विठ्ठलाच्या दर्शनाने वारकऱ्यांना परमानंद होतो.
पंढरीच्या वारीची ही परंपरा फारच जुनी आहे. अनेक शतकांचा इतिहास वारीला आहे. ज्ञानदेवांच्या घरातही वारीला जाण्याची परंपरा होती. भागवत संप्रदायाचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले होते. वारीची त्यांना माहिती होती. पंढरीच्या विठूरायाच्या मूर्तीच्या रुपाची स्तुती त्यांनी अनेकदा ऐकली होती. अशा विठूरायाच्या दर्शनासाठी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान अन् मुक्ताई प्रथमच पंढरीत पोहोचले. माऊलींना जेव्हा विठूरायाच्या मूर्तीचे दर्शन झाले तेव्हा त्यांना झालेला परमानंद त्यांनी या अभंगातून व्यक्त केला आहे. आजवर विठ्ठलाच्या मूर्तीचे जे काही गुणगान ऐकले होते, भगवंताचे ते रुप साक्षात त्यांच्या चक्षुसमोर दिसत होते. आजवर ऐकलेल्या मूर्तीच्या स्तुतीपेक्षा कित्येक पट सुंदर विठ्ठलाचे हे रुप आहे, साजिरे आहे असे त्यांना जाणवले. मनाला आवडणारी गोष्ट प्राप्त झाली की आपसूकच मन सुखावते. परमानंदाची एक अनुभूती मनात निर्माण होते. असाच आनंद माऊलींना विठ्ठलाच्या दर्शनाने झालेला आहे. अन् त्यांच्या मुखातून शब्द बाहेर आले,
‘रुप पहातां लोचनी | सुख जालें वो साजणी' ||
चारही भावंडांचे एकमेकांवरचे खूपच प्रेम होते. विशेषत: मुक्ताई सगळ्यांच्या गळ्यातला ताईतच होती. सगळीकडेच लहान भावंडाचे कोडकौतुक काहीसे जास्तच होत असते. मुक्ताई सगळ्यात धाकटी असल्यामुळे सगळ्यांची लाडकी होती. माऊलींना तर ती आपल्या बहिणीपेक्षा आपली सखीच वाटत होती. आनंदीत झालेला माणूस उल्हासाने अनेक सुंदर शब्दप्रयोजन करून जातो. पांडुरंगाच्या दर्शनाने उल्हासित झालेल्या माऊलींनी सहजच आपल्या मुक्ताईला मोठ्या वात्सल्यभावाने ‘साजणी’ असे म्हणून संबोधले आहे. भगवंताच्या दर्शनात दंग असलेल्या आपल्या लाडक्या बहिणीसाठी साजणी हे संबोधन फार चपखल वाटते.
‘तो हा विठ्ठल बरवा | तो हा माधव बरवा ||’
माझ्यासाठी विठ्ठलही तोच आहे अन माधवही तोच आहे. अर्थात या दोघांत काही फरक नाही. विठ्ठल आणि कृष्ण ही दोन्ही भगवान विष्णूचीच रुपे आहेत असा एक विचारप्रवाह आहेच. म्हणून माऊलींनी तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा असे म्हटले असावे. अजून व्यापकतेने विचार करायचा झाला तर देव ही संकल्पना म्हणजे सर्व चराचराला व्यापून असणारी एक शक्ती आहे. प्रत्येक जण या शक्तीला आपल्या आकलन शक्तीप्रमाणे नाव देतो. विठ्ठल म्हणा किंवा माधव म्हणा, जे काही रुप आहे ते एवढे मनभावक आहे की त्याला पाहून माझे मन अतिशय प्रसन्न झाले आहे असे माऊली म्हणत आहेत.
धाकटी मुक्ताई फारच जिज्ञासु होती. तिला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या थोरल्या भावांकडून मिळेपर्यंत तिच्या मनाचे समाधान होत नसे. आपल्या दादाला विठ्ठलाच्या दर्शनाने फारच आनंद झाला आहे. तो त्याने सुरेख शब्दांत वर्णन केलेला आहे. असे असताना ‘विठ्ठलाच्या दर्शनाने सगळ्यांनाच का आनंद होत नाही?’ असा प्रश्न तिने आपल्या दादाला विचारला आहे. या प्रश्नाचे उत्तर माऊली फारच भावुकतेने देताना म्हणतात.
‘बहुता सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ||’
‘सर्व सुखाचें आगरु | बाप रखुमादेविवरू ||’
सुकृतांची जोडी या शब्द प्रयोगात द्वित्व प्रतीत झाल्याचा भास होतो. परंतु इथे जोडी हा शब्द द्वित्व दर्शवणारा नसून, जोडणे या अर्थाने ‘बहुता सुकृतांची जोडी’ हा शब्द प्रयोग केलेला आहे. भक्तिमार्गाचे खरे गमक आहे ते म्हणजे या मार्गावर मार्गक्रमण करणाऱ्याने आपले आचरण अत्यंत सात्विक ठेवले पाहिजे. सत्कृत्ये करून सुकर्मे जोडीत राहिले पाहिजे. ईश्वराची भक्ति हे ईश्वराला भेटण्याचे साधन आहे. त्यासाठी सत्कृत्यांचा संचय असणे आवश्यक आहे. मुक्ताबाई, देवाची आवड निर्माण होण्यासाठी पूर्वजन्माची पुण्याई, नीती धर्माचे आचरण, सदमार्गाची वाटचाल या सगळ्या गोष्टी करावयाला पाहिजेत. या सगळ्या गोष्टी केल्या की विठ्ठलाची म्हणजेच देवाची आवड निर्माण होते. अन् यानंतरच विठ्ठलाच्या दर्शनाने मनाला आनंद प्राप्त होतो.
जेव्हा असा परमानंद मनाला मिळतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे भगवंताचे हे साजिरे रुप केवळ या मूर्तीत नाही तर ते समस्त चराचरात भरून राहिले आहे, व्यापून राहिले आहे. या सर्व चराचरात व्यापून असलेला हा भगवंत सर्व सुखांचे आगर आहे. त्याच्या भक्तीने तुम्हाला सुखाची प्राप्ती होणार आहे. हाच माझा देव म्हणजेच रखुमाईवर पांडुरंग आहे.
या परमेश्वराची प्राप्ती करायची असली तर आपणही सुकर्माची कास धरली पाहिजे. अशी सुकर्मे जोडत गेल्याने भगवंताची आवड निर्माण होते. या भगवंताची मनाला आवड निर्माण झाली की सर्व चराचरात व्यापून असलेल्या भगवंताचे दर्शन घडते. त्याच्या या दिव्य दर्शनाने, रूपाने मनाला केवळ सुख आणि सुखच प्राप्त होते.
लेखक, संकलक - डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
(९८६९०६१८८९)
सुलेखन- डॉ. तेजस वसंत लोखंडे
(९७७३२६७००१)
या आणि वारीसंबंधी इतर अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी वाचा वारीवरील संकलित परिपूर्ण ग्रंथ “वारी जनातली, जनांच्या मनातली”.. आपली प्रत मिळवण्यासाठी दिलेल्या फोन क्रमांकावर संपर्क साधावा.