राज्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग येथे तंत्रज्ञान केंद्राला जागा देणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांच्या विविध विषयांचा आढावा

● सिंधुदुर्ग येथे तंत्रज्ञान केंद्रासाठी, तर राज्यात १५ ठिकाणी विस्तारित केंद्रांसाठी जागा

महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांचे महत्त्वाचे योगदान असून यासंदर्भात विविध योजनांची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग येथे तंत्रज्ञान केंद्राला जागा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.  विस्तारित केंद्रांसाठी १५ विविध ठिकाणी जागा निश्चित केल्या असून काथ्या (कॉयर) उद्योग केंद्रासाठी कुडाळ येथे इमारत आणि खादी ग्रामोद्योगच्या वस्तू विक्रीसाठी मोठ्या शहरांमध्ये पालिकेच्या जागा देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.


सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची क्षमता मोठी असून ते प्रत्येक क्षेत्रासाठी फायदेशीर आहे. उद्यम नोंदणीत महाराष्ट्र देशात आघाडीवर असून २९ लाखांहून अधिक उद्योगांनी एमएसएमई पोर्टलवर नोंदणी केली आहे असे सांगून एमएसएमई क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी राज्यात करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र हे पायाभूत सुविधांमध्ये देशात प्रथम क्रमांकाचे राज्य असून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूला १८ नोड उभारण्यात येत आहेत, त्यात एमएसएमई उद्योग सुरू करुन मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याचे सांगून एमटीएचएल, मुंबई-पुणे महामार्ग विकासाचे राजमार्ग ठरणार आहेत. यामुळे उद्योग त्यातून उत्पादने आणि त्यांची निर्यात वाढण्यास मदत होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये महाराष्ट्र राज्याने एक ट्रिलियनचा सहभाग देण्याचा निश्चय केला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात जास्तीत-जास्त तरुणांना प्रशिक्षणाचा लाभ व्हावा म्हणून तंत्रज्ञान केंद्र (टेक्नॉलॉजी सेंटर्स) उभारण्यात येणार आहेत. मुंबई आणि औरंगाबादमध्ये तंत्रज्ञान केंद्रे यापूर्वीच कार्यरत झाली असून नागपूर, पुणे येथे या केंद्रांसाठी एमआयडीसीची जागा उपलब्ध होणार आहे. सिंधुदुर्ग येथील केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.