सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत सर्वसमावेशक पॅनलची बाजी


सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी मर्यादित सिंधुदुर्गनगरी च्या संचालक पदाच्या निवडणुकीत सर्व समावेशक शिक्षण सहकार पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. या निवडणुकीत सर्वसमावेशक शिक्षण सहकार पॅनलने ११ जागांवर विजय मिळविला. तर आदर्श सहकार पॅनलला ४ जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत नव्यानेच उतरलेल्या शिवशाही सहकार परिवर्तन पॅनल आणि विद्या सहकार परिवर्तन पॅनलला दारुण पराभव पत्करावा लागला. या दोन्ही पॅनलला एकही जागा मिळाली नाही. तर पतपेढीचे विद्यमान अध्यक्ष संदीप कदम (आदर्श सहकार पॅनल) आणि संचालक समीर परब (सर्वसमावेशक पॅनल) यांना मतदारांनी पुन्हा संधी दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक /उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढीची निवडणूक काल अत्यंत शांततेत पार पडली होती. या निवडणुकीत चार पॅनल सह चार अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. 

आज सकाळी नऊ वाजता सिंधुदुर्गनगरी येथील पतपेढीच्या सभागृहात या निवडणुकीच्या मतमोजणीस प्रारंभ झाला. दुपारी दीड वाजता मतमोजणी संपली. यातील आठ तालुका मतदार संघाच्या मतमोजणीस प्रथम सुरुवात झाली. यात पाच तालुका मतदार संघात सर्वसमावेशक पॅनलने तर तीन मतदार संघात आदर्श सहकार पॅनल ने विजय मिळविला. तालुका मतदार संघात सर्वसमावेशक पॅनलचे दोडामार्ग मधून शरद बाजीराव देसाई, सावंतवाडी मधून प्रदीप मारुती सावंत, कुडाळ मधून रमाकांत सखाराम नाईक, मालवण मधून सुमित गजानन मसुरकर, देवगड मधून सत्यपाल सीताराम लाडगावकर यांनी विजय संपादन केला. तर आदर्श सहकार पॅनलचे वेंगुर्ला मधून आशिष दिगंबर शिरोडकर, कणकवली मधून मारुती हल्लाप्पा पुजारी आणि वैभववाडी मधून जयवंत केशव पाटील हे विजयो झाले. तालुका मतदार संघात कुडाळ मतदार संघातून गोपाळ तातोबा हरमलकर या आदर्श सहकार पॅनलच्या विद्यमान संचालकांना अवघ्या तीन मतांनी पराभव पत्कारावा लागला. तर कणकवली मतदार संघातून आदर्श सहकार पॅनलचे मारुती पुजारी आणि वैभववाडी मतदार संघातून विजयी झालेले जयवंत पाटील या आदर्श सहकार पॅनलच्या उमेदवारांनी अनुक्रमे ६ आणि ७ मतांच्या फरकाने विजय मिळविला. जिल्हा मतदार संघात ७ पैकी ६ मतदार संघांवर सर्व समावेशक पॅनलने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. तर अनुसूचित जाती जमाती मतदार संघात आदर्श सहकार पॅनलच्या विद्यमान अध्यक्ष संदीप कदम यांच्या रूपाने विजय मिळविला. आदर्श सहकार पॅनलचे संदीप कदम हे अवघ्या दोन मतांनी विजयी झाले. कदम यांना सर्व समावेशक पॅनलचे उमेदवार सुनील जाधव यांनी निकराची झुंज दिली. या निवडणुकीत सुनील जाधव यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. मात्र फेर मतमोजणीत नाईक यांच्या पदरी निराशाच पडली.


जिल्हा मतदार संघातून खुल्या गटात समीर रमाकांत परब, स्वप्नील श्रीकांत पाटील, महिला प्रतिनिधी राखीव मतदारं संघात सुमेधा तुकाराम नाईक, विद्या  हेमंत शिरसाठ, इतर मागास प्रवर्ग मतदार संघात संजय रामचंद्र वेतुरेकर, भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गात सुरेंद्र गंगाराम लांबोरे या सर्वसमावेशक पॅनलच्या उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ घातली.

ही निवडणूक प्रक्रिया सहकार खात्याच्या कार्यालय अधीक्षक व निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी एस. एम. मयेकर, एम. एस. धुमाळ, पी. यू. पई, पी. पी. साळगावकर, रुपेश मोरे, अजय हिर्लेकर, राधिका हळदणकर, अतुल मालंडकर व इतरांनी मत मोजणीचे काम पाहिले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.