वारी जनातली, जनांच्या मनातली : अभंग माऊलींचे - ९


आषाढ शुद्ध द्वितीया, शालिवाहन शक १९४५, दिनांक २० जून २०२३

 इवलेंसें रोप लाविलें द्वारीं । त्याचा वेल गेला गगनावरी ॥१॥
 मोगरा फ़ुलला मोगरा फ़ुलला । फ़ुलें वेंचिता अतिभारुकळियांसि आला ॥२॥
 मनाचिये गुंती गुंफ़ियेला शेला । बापरखुमादेविवर विठ्ठलीं अर्पिला ॥३॥

आपल्या अभंगात निरनिराळ्या रुपकांचा वापर करुन संतांनी अनेक अजरामर रचना करून ठेवल्या आहेत. नेहमीच्या आयुष्यात दिसणाऱ्या या छोट्या छोट्या गोष्टींची उदाहरणे पटकन हृदयाशी संलग्न होतात. ही रुपके शोधून काढणे ही संतांची वाङमय प्रतिभा होती. माऊलींनी आपल्या अभंगात मोगऱ्याच्या वेलाचे रुपक वापरले आहे. मोगरा हा शब्द उच्चारताच त्याचा सुगंध आपसुकच जाणवायला लागतो. कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी मोगऱ्याचा सुगंध लपत नाही. पांढरी शुभ्र फुले असणारा हा मोगरा मंद पण चिरकाल आनंद देणारा सुगंध पारीत करत असतो. भारदार फुले असलेला बट मोगरा, वाढीला जागा मिळेल तसा उंचच ऊंच वाढत जाणारा वेली मोगरा. प्रकार कोणताही असला तरी त्याचा सुगंध हा परिणाम स्वरूप जाणवतो. वाढीला जागा असेल अशा ठिकाणी वेली मोगऱ्याचे रोपण केले असतां त्याचा विस्तार पाहता पाहता पार गगनाला भिडायला गेल्याची जाणीव होते. 

 इवलेंसें रोप लाविलें द्वारीं । त्याचा वेल गेला गगनावरी ॥१॥

अंगणात मोगऱ्याचे रोप लावावे, तसे निवृत्तीनाथांनी माऊलींच्या हृदयात वात्सल्याचे, भक्तीचे ज्ञानरूपी रोप लावले आहे. या ज्ञानवृक्षाची वाढ हळूहळू सुरू झाली. मिळालेल्या ज्ञानाने मनातले संदेह नष्ट झाले. द्वैत - अद्वैत भावनांचा मनातला कल्लोळ शमून गेला, त्यामुळे मनाचे आत्मिक समाधान वाढीस लागले. गुरूच्या आदेशाच्या नित्य पालनाने हे दारी लावलेले इवलेसे रोप आता फार मोठे झाले आहे. ते इतके मोठे झाले आहे की त्याचा वेलू पार गगनात गेल्याचा आभास निर्माण होतो आहे. गुरुच्या कृपाशीर्वादाने मला दिव्यज्ञानाची अनुभूती होते आहे. मिळालेल्या या ज्ञानाने मला आत्मिक समाधान प्राप्त झाले आहे. मी भरून पावलो आहे.     

 मोगरा फुलला मोगरा फुलला ।
फुले वेचितां अतिभारू कळियांसी आला ॥२॥

मनात रुजलेले हे ज्ञानरूपी रोपही आता फुलून गेले आहे, बहरायला लागले आहे. गुरुकृपेने झालेल्या ज्ञानाच्या प्राप्तीने आत्मिक समाधानाची फुले वेलीला लगडली आहेत. फुललेल्या मोगऱ्याच्या सुगंधाने जसे सगळ्यांना समाधान मिळते तसे मला मिळालेल्या ज्ञानामुळे माझ्यासह इतरांचाही उद्धार होईल अशी आशा माऊलींना आहे. ‘फुले वेचिता अतिभारू कळियांसी आला’ माऊलींच्या शब्द प्रतिभेचे हे एक आणखी जीवंत उदाहरण इथे दिसून येते. मोगऱ्याला आलेला बहर तोडला तरी लगेचच पुन्हा त्या झाडाला नव्या कळ्या लगडलेल्या दिसू लागतात. मला दिसणारे हे ज्ञानाचे कण मी टिपतो आहे. माझे ज्ञान इतरांसोबत वाटून घेण्याची माझी इच्छा आहे. माझ्या गुरुंची माझ्यावर इतकी कृपा आहे की हे ज्ञानकण मी जेव्हा जेव्हा इतरांना देतो, तेव्हा अजून नवनवीन ज्ञान माझ्या पदरात पडते आहे. 

 मनाचिये गुंती गुंफियेला शेला । बापरखुमादेवीवरू विठ्ठलीं अर्पिला ॥३॥

माणसाचे मन फार विचित्र आणि गुंतागुंतीचे आहे, फारच विषयलोलुप आहे. गुरुने दिलेल्या ज्ञानाचा उपयोग करताना मनाला विषयांपासून दूर ठेवले पाहिजे. या ज्ञानाच्या सहाय्याने ईश्वराची सेवा करून, नामस्मरणात मला मनाला गुंतवून ठेवायचे आहे. मनातले सगळे ‘विषय’ बाजूला सारून प्रेमाच्या धाग्याने मी हा विठ्ठल भक्तीचा शेला विणला आहे. तो मी रखुमादेवीच्या वराला अर्पण केला आहे. गुरूच्या कृपेने जे काही ज्ञान मला प्राप्त झाले आहे, ते मी विठ्ठलाच्या चरणांचे अमृत आहे असे समजतो आणि ते त्यालाच अर्पण करतो.  

आपल्याच बागेत आपणच वाढवलेल्या रोपाला आलेली फुले देवाला अर्पण करताना जे आत्मिक समाधान मिळते ते इतर कोणत्याही गोष्टीने मिळत नाही. फुललेल्या मोगऱ्याचे रुपक घेऊन माऊलींनी आत्मबोधाच्या प्रवासाचे केलेले विवेचन किती निर्मळ, पवित्र आणि निरागस आहे. हा प्रेमभाव, निर्मळता आणि निरागसपणा माऊलींच्या शब्दांचे सामर्थ्य आहे.

लेखक, संकलक - डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
(९८६९०६१८८९) 
 सुलेखन - डॉ. तेजस वसंत लोखंडे
(९७७३२६७००१) 


 या व वारीसंबंधी इतर अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी वाचा वारीवरील संकलित परिपूर्ण ग्रंथ “वारी जनातली, जनांच्या मनातली”. आपली प्रत मिळवण्यासाठी दिलेल्या फोन क्रमांकावर संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.