वारी जनातली, जनांच्या मनातली : अभंग माऊलींचे - २ (तुज सगुण म्हणों कीं निर्गुण रे । )


 ज्येष्ठ कृष्ण दशमी, शालिवाहन शक १९४५, दिनांक १३ जून २०२३.

तुज सगुण म्हणों कीं निर्गुण रे । सगुण निर्गुण एकु गोविंदुरे ॥१॥ अनुमाने ना अनुमाने ना । श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥ध्रु०॥ तुज स्थूळ म्हणों कीं सूक्ष्म रे । स्थूळसूक्ष्म एकु गोविंदुरे ॥२॥ तुज आकारु म्हणों की निराकारु रे । आकारु निरुकारु एकु गोविंदुरे ॥३॥ तुज दृश्य म्हणों कीं अदृश्य रे । दृश्यअदृश्य एकु गोविंदुरे ॥४॥ निवृत्त्ती प्रसादे ज्ञानदेव बोले । बाप रखुमादेविवरु विठ्ठलु रे ॥५॥


माऊली ज्ञानेश्वरांची प्रतिभा अफाट होती हे आपण सर्व जाणतो. एवढ्या लहान वयात ज्ञानेश्वरी लिहिणे हे असामान्य प्रतिभेचे लक्षण आहे. अत्यंत कमी शब्दांत मोठा आशय व्यक्त करणे हे फारच कठीण काम असते. काव्यात्मक लेखानातून हा हेतु नक्कीच साध्य होतो. चार ओळींची कविता एखाद्या पानभर गद्य लेखनाचे काम करून जाते हे आजवर आपण पाहिले आहे. अत्यंत कमी शब्दांत मोठा आशय व्यक्त करण्याची अद्भुत शक्ती माऊलींच्या अनेक रचनांमधून दिसून येते.


ज्याच्यावर आपण श्रद्धा ठेवतो त्या देवाची सगुण साकार, निर्गुण निराकार ही रुपे. मनात निर्माण झालेल्या सगुण-निर्गुण, द्वैत-अद्वैताचे निराकरण करताना माऊलींनी प्रत्यक्ष परमात्म्याशी साधलेल्या संवाद किती अद्भुत आहे. मनात येणाऱ्या शंका स्वत:च विचारायच्या  अन् त्याचे उत्तरही स्वत:च शोधायचा प्रयत्न या अभंगातून दिसून येतो. 


तुज सगुण म्हणों की निर्गुण रे | सगुण निर्गुण एक गोविंदुरे ||

हे देवा, तुला मी सगुण म्हणू की निर्गुण? माऊलींना ईश्वराची दोन्ही रुपे दिसत आहेत त्यामुळे ते म्हणतात, सगुण आणि निर्गुण ही रुपे दिसताना जरी दोन भिन्न रुपे दिसत असली तरी ती दोन वेगवेगळी रुपे नसून ती एकाच गोविंदाची रुपे आहेत.    

अनुमाने ना अनुमाने ना । श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥

मी तुला अनुमानाने आणि अनुमानाशिवाय जाणून घ्यायचा पुष्कळ प्रयत्न करतो आहे. या गोविंदाला जाणून घ्यायला अनुमानाचा फारसा उपयोग होत नाही. (कोणत्याही गोष्टीचे ज्ञान आपल्याला अनुमान प्रमाणाने होत असते.) मात्र वेदांनी, वेदांतल्या श्रुतींनीही नेति नेति (न इति न इति, Method of Emission करून ज्ञान प्राप्त होणे) असे म्हणत शेवटी गोविंदाचे अस्तित्व मान्य केले आहे, हे सर्व गोविंद आहे असे म्हटले आहे. 

तुज स्थूळ म्हणों कीं सूक्ष्म रे । स्थूळसूक्ष्म एकु गोविंदुरे ॥२॥

माझ्या स्थूळ आणि सूक्ष्म चक्षूंनी मी तुला जाणून घ्यायचा प्रयत्न करीत आहे. पंच ज्ञानेंद्रियांनी अनुभूति होणारे ज्ञान म्हणजे स्थूळ ज्ञान, आणि स्थूळाच्या पलिकडे असणारे सारे हे सूक्ष्म ज्ञान होय. गोविंदा तुझी अनुभूति स्थूळानेही होते अन् सूक्ष्मानेही. स्थूळ आणि सूक्ष्म ही दोन्ही तुझीच रुपे आहेत अन् हे दोन्ही गोविंदच आहेत.   

तुज आकारु म्हणों की निराकारु रे । आकारु निरुकारु एकु गोविंदुरे ॥३॥ तुज दृश्य म्हणों कीं अदृश्य रे । दृश्यअदृश्य एकु गोविंदुरे ॥४॥

चक्षूंनी दिसणारे ते दृश्य रुप म्हणजेच स-आकार (साकार) आणि चक्षूंनी न दिसणारे, म्हणजेच डोळे बंद असतानाही दिसणारे ते अदृश्य म्हणजेच कोणत्याही आकारा शिवाय असणारे ते निर-आकार, ही दोन्ही गोविंदाचीच रुपे आहेत. 

निवृत्त्ती प्रसादे ज्ञानदेव बोले । बाप रखुमादेविवरु विठ्ठलु रे ॥५॥

गुरुच्या अनुग्रहाशिवाय ज्ञान मिळणे कठीण आहे. गुरुची कृपा झाल्यानंतर भक्ताला प्रसादरुपी ज्ञान प्राप्त होते. निवृत्तीनाथांना माऊलीने आपले गुरु मानले होते. निवृत्ती माऊलींच्या प्रसादाने अनुग्रहाने ज्ञानदेव रखुमादेवीवर असलेल्या विठ्ठलातच त्या गोविंदाला पहातात. सगुण साकार अन् निर्गुण निराकार ही परमेश्वराची रुपे समजावून घेणे हा एक मोठा कठीण प्रश्न आहे. एकाच परमेश्वराची ही रुपे समजावून घेताना ज्ञानाची कसोटी लागते. त्यासाठी ब्रह्म जाणून घ्यावे लागते. ब्रह्म जाणून घ्यायचे अर्थात ज्ञानप्राप्तीचे ईश्वर भक्ति व्यतिरिक्त इतरही काही मार्ग आहेत. वेदात वर्णन केलेला मार्ग म्हणजे, 

तत्त्वमस्यादिवाक्येन स्वात्मा हि प्रतिपादितः।
नेति नेति श्रुतिर्ब्रूयादनृतं पाञ्चभौतिकम् ॥

सत्य जाणून घ्यायचे असेल तर त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या एकेका गोष्टीचा अस्विकार करणे. सरते शेवटी जे शिल्लक राहील तेच ब्रह्म आहे.  

हाच अर्थ स्पष्ट करताना संत तुलसीदास म्हणतात.  

ग्यान कहै अग्यान बिनु, तम बिनु कहै प्रकास |
निरगुन कहै जो सुगन बिनु, सो गुरु तुलसीदास ||

या दोहयाचा भावार्थ सांगताना संत तुलसीदास अभावाचा म्हणजेच ‘नेति नेति’ या ज्ञान देणाऱ्या मार्गाचा अवलंब करतात. न इति म्हणजे हे नव्हे, ज्ञानाची महती समजायची असेल तर अज्ञान म्हणजे काय हे समजणे गरजेचे आहे. उजेडाचे ज्ञान होण्यासाठी अंधकार म्हणजे काय हे समजणे आवश्यक आहे. म्हणून निर्गण निराकार समजण्यासाठी आधी सगुण साकार समजणे आवश्यक आहे. 


प्रत्यक्ष अनुभूति घेतल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचे अस्तित्व मानणे विज्ञानालाही अमान्य आहे. भक्ति मार्गावरून चालत असताना प्रारंभीच्या अवस्थेत सर्वसामान्य भक्त सगुण साकाराची अनुभूति मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणूनच या अवस्थेत त्यांना केवळ सगुण साकाराची भक्ति करावीशी वाटते. पंच-ज्ञानेंद्रियांच्या अनुभूतीशिवाय ईश्वराचे अस्तित्व मान्य करणे त्यांना अवघड जाते. कर्म, ज्ञान आणि भक्ति या ज्ञानप्राप्तीच्या तिन्ही मार्गात, भक्ति ही जास्त प्रभावशाली आहे. भक्ति मार्गावरून चालत असताना द्वैत नाहीसे होते. संतांना या अद्वैताचा साक्षात्कार होतो. या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तींना आत्मज्ञानाची अनुभूती येते. सगुण साकार अन् निर्गुण निराकार ही एकाच परमेश्वराची रुपे आहेत याची अनुभूति होते. 

लेखक, संकलक - डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
(९८६९०६१८८९) 
 सुलेखन - डॉ. तेजस वसंत लोखंडे
(९७७३२६७००१) 

 या व वारिसंबंधी इतर अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी वाचा वारीवरील संकलित परिपूर्ण ग्रंथ “वारी जनातली, जनांच्या मनातली.. आपली प्रत मिळवण्यासाठी दिलेल्या फोन क्रमांकावर संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.