ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सावंतवाडी राजघराण्याची राजकीय परंपराही थोर आहे, येथील जनतेच्या कल्याणासाठी झटत असतांना पहीले राजे शिवरामराजे सावंत भोसले यांनी राजकारणाच्या माध्यमातून अनेक हिताचे निर्णय घेतले. अलिकडे मात्र राजघराणे राजकारणापासून अलिप्त होते. पण आता या घराण्याचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी युवराज लखमराजे यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राजकारणात आपली घोडदौड सुरू केली आहे. युवा नेतृत्व, सर्वाना आपलेसे करणारा स्वभाव व आपला हक्काचा वाटणारा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहीले जाते.
राजकीय वारसा लाभला तरी सावंतवाडी राजघराण्याचे सध्याचे राजे खेमसावंत भोसले राजकारणापासून अलिप्त राहिले. मात्र, अनपेक्षितपणे त्याचे पुत्र युवराज लखमराजे यांनी भाजपाच्या माध्यमातून राजकारणात केलेली एंन्ट्री सर्वाना आश्चर्यकारक होती. घराण्याला राजकीय वारसा असला तरी राजकारणातील डावपेच माहीत नसलेले युवराज थेट राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपा नेत्यांच्या माध्यमातून मुंबई येथे भाजपवाशी झाले. त्यांच्या भाजपा प्रवेशाचे सिंधुदुर्ग भाजपकडून जोरदार स्वागत करण्यात आले. ते सावंतवाडीत येताच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.अर्थात हे सगळे अपाक्षितच होते कारण राजघराणे राजकारणात सक्रिय हवेत असे सर्वानाच वाटत होते आणि युवराजांच्या रुपाने ते झाल्याने सर्वाचा आनंद द्विगुणीत झाला. त्यानंतर मात्र मागे वळून न पाहता युवराजांनी सावंतवाडी मतदारसंघातील गावागावात भेटी देत सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने जनतेपर्यंत पोहोचून त्यांनी जनतेला आपलेसे केले.
युवराजांचा जन्म २ जून १९९१ मध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण बेळगाव मध्ये झाले. त्यानंतर काही काळ त्यांनी मुंबईमध्ये शिक्षण घेतले. उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेमध्ये गेले त्या ठिकाणी त्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून शिक्षण घेतले. उच्च शिक्षण घेऊन परतलेल्या युवराजांनी या ठिकाणी पूर्वजांनी केलेल्या कार्याचा वसा घेत त्यादृष्टीने पाऊल टाकले.
सावंतवाडी संस्थानचे शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठे योगदान आहे. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून त्यांचे कार्य आजही या ठिकाणी सुरु आहे. युवराजांनी वडील राजे खेमसावंत भोसले तसेच आई शुभदा देवी भोसले यांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये लक्ष घातला. शिक्षण संस्थेमध्ये बदल घडवून आणण्याबरोबरच संस्थेची प्रगती अधिकाधिक होण्यासाठी त्यांचे नेहमीच प्रयत्न राहिले आहेत.
सावंतवाडी राजघराण्याला येथील जनतेने भरभरून प्रेम दिले आहे. राजघराण्याने ही जनतेची सेवा करताना या शैक्षणिक सामाजिक आरोग्य सांस्कृतिक व कला क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली आहे. त्यामुळे आजही राजघराण्याकडे तितक्याच सन्मानाने आणि आदरपूर्वक पाहिले जाते.
राजघराण्याचा राजकीय वारसा पाहता शिवराम राजे १९५७ मध्ये पहिल्यांदा सावंतवाडी मतदार संघाचे आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी प्रदीर्घ काळ या ठिकाणी आमदार म्हणून काम पाहिले. राजमाता पार्वतीदेवी भोसले या आमदार म्हणून निवडून आल्या त्यानंतर श्रीमंत सत्वशिला देवी भोसले याही राजकारणात सक्रिय होत्या. आज युवराज लखम राजे भोसले हे राजकारणात उतरले आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा विचार करता त्यांचा प्रवेश भविष्यातील राजकीय समीकरणे बदलणारा ठरू शकतो. त्यादृष्टीने त्यांनी आपली वाटचाल सुरू केली आहे.
पूर्वजांनी केलेली समाजकार्य, घराण्याचे येथील जनतेशी असलेले नातेसंबंध युवराज लखम राजे तंतोतंत पाळत आहेत त्यांनी राजकीय दृष्टिकोन समोर ठेवून गावागावात आपल्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. जनतेकडूनही त्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच त्यांच्याकडे राजकारणातील एक युवा नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे.