गुणवत्तापूर्ण कामाला प्राधान्य द्यावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

गुणवत्तापूर्ण कामाला सर्वांनी प्राधान्य द्यावे

● राष्ट्रीय सेवेच्या वृत्तीने काम करण्याची भावना असल्यास प्रत्येक काम दर्जेदार होईल

● सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र  चव्हाण यांच्या हस्ते
बांधकाम विभागातील १६५ गुणवंत कर्मचाऱ्यांच्या गौरव

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून होत असलेला प्रत्येक प्रकल्प, प्रत्येक काम राष्ट्राला समर्पित महत्त्वाचे काम असते. त्यामुळे  जोपर्यंत राष्ट्रीय सेवेच्या वृत्तीने काम करण्याची भावना प्रत्येकात असेल, तोपर्यंत आपल्या हातून निश्चित दर्जेदार काम होईल. कोणत्याही यंत्रणेत अधिकारी, कर्मचारी यांना काम करण्याची व्यापक संधी उपलब्ध असते. त्याचा सुयोग्य वापर करून योगदान देणाऱ्यांचा पुरस्काराने गौरव झाला पाहिजे, त्यातून चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते.  कर्मचाऱ्यांनीही  गुणवत्तापूर्ण काम करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. आपल्या कामातून प्रत्येकजण वेगळा ठसा उमटवू शकतो असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.


सार्वजनिक बांधकाम भवन येथे आयोजित  बांधकाम विभागातील १६५ गुणवंत कर्मचाऱ्यांच्या गौरव सोहळयात मंत्री श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विभागाच्या  अपर मुख्य सचिव मनिषा पाटणकर- म्हैसकर,  सचिव (रस्ते) स.शं. साळुंखे , सचिव (बांधकाम)सं. द. दशपुते, सा.बां. प्रादेशिक विभाग, मुंबईचे मुख्य अभियंता र. रा. हांडे, सहसचिव रोहिणी भालेकर, प्रादेशिक कार्यालय पुणेचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


मंत्री चव्हाण यांनी सांगितले की, जनतेला  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून  अधिक व्यापक  सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत  आहेत. त्यामध्ये सर्व अधिकारी कर्मचारी यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. अशाच पद्धतीने गुणवत्तापूर्ण कामाला सर्वांनी प्राधान्य दयावे. यापुढे सर्वांच्या सहकार्याने विभागाचा व्यापक विस्तार करत  विभागाचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्राला वेगळं वैभव प्राप्त करून देण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. विभागाची प्रतिमा आणि प्रतिष्ठा वाढवण्यासाठीची क्षमता आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे आहे . त्यादृष्टीने सर्वांनी अ़धिक जोमाने काम करावे. यापुढे  वार्षिक पुरस्कार वितरण वेळेत  करण्याकडेही लक्ष देणार असल्याचे मंत्री श्री चव्हाण यांनी सांगितले.

राज्यातील सर्व पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांना संबंधित विभागीय स्तरावर पुरस्कार वितरण करण्याच्या सूचना मंत्री श्री चव्हाण यांनी विभागाला दिल्या होत्या त्यानुसार मुंबई, पुणे विभागातील पुरस्कार प्राप्त सर्व कर्मचाऱ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.