वारी जनातली, जनांच्या मनातली : अभंग माऊलींचे - १०


आषाढ शुद्ध तृतीया, शालिवाहन शक १९४५, दिनांक २१ जून २०२३

 समाधिसाधनसंजीवन नाम । शांति दया सम सर्वांभूतीं ॥१॥
 शांतीची पै शांति निवृत्तिदातारु । हरिनाम उच्चारु दिधला तेणें ॥२॥
 शम दम कळा विज्ञान सज्ञान । परतोनि अज्ञान नये घरा ॥३॥
 ज्ञानदेवा सिध्दि साधन अवीट । भक्तिमार्ग नीट हरिपंथी ॥४॥

विठ्ठलाला जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे असे माऊली म्हणतात. या विठ्ठलाला जाणून घेण्यासाठी नामस्मरण फार महत्त्वाचे आहे. इतर काहीही न जाणता एक विठ्ठल जाणला तर ते पुरे, हीच भक्ति अन् हेच ज्ञान असे माऊलींनी म्हटले आहे. माऊली ज्ञानेश्वर आपले वडील बंधु निवृत्तीनाथांना गुरु मानत होते. माऊलींना झालेल्या साक्षात्काराचा मूळ पाया निवृत्तीनाथांनीच घातला होता. त्यांनी माऊलींना परमार्थाचे दर्शन घडवून आणल्यानंतर त्यांना या संसाराकडे पाहण्याची नवीन दृष्टी प्राप्त झाली, असे माऊली म्हणतात. 

समाधि हे शरीराची तसेच बुद्धीचीही अवस्था आहे. 

 तदेवार्थ मात्र निर्भासं स्वरूप शून्यमिव समाधि।।

ध्यानावस्थेत असलेली व्यक्ति सर्व संवेदना विसरून जाते त्याला समाधी अवस्था लाभली असे म्हणतात. अष्टांग योगात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान या अवस्था पार केल्यानंतर साधक समाधी अवस्थेत जातो. समाधी ही एक वेगळीच अनुभूती असते.  

‘धी’, ‘धृति’ आणि ‘स्मृति’ या तीन मानसशक्ती आहेत. यातील ‘धी’ म्हणजेच बुद्धी किंवा एखाद्या गोष्टीचे आकलन करून घेण्याची शक्ती. आयुर्वेदानुसार ‘धी’ हे मुख्यता वाताचे कार्य मानले आहे. वात हा अत्यंत चंचल आहे. आणि म्हणूनच याला ताब्यात ठेवणे फार कठीण असते. ‘समाधी = सम + धी, सम बुध्दी. भगवदगीतेतल्या दुसऱ्या अध्यायात भगवंत मुनीं व्याख्या करताना म्हणतात,

 दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषुविगतस्पृहः | वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ||२.५६||

भौतिक जगतात माणूस जेव्हा सुख-दु:ख या संवेदनांच्या पलिकडे जातो तेव्हा त्याला ज्ञानप्राप्ती झाली असे समजले जाते. दैनंदिन जीवनात मनाला अनेक प्रलोभने भुरळ घालत असतात. मनाला भुरळ घालणाऱ्या या प्रलोभनांमूळे जो विचलित होत नाही तो समाधी अवस्थेत आहे, असे म्हणता येईल. 

माऊलींची शब्द प्रतिभा फारच अफाट आहे. एकीकडे मनात किंतु निर्माण करून लगेचच त्याचे समाधान करणारे उत्तर द्यायचे किती पराकोटीची प्रतिभा शक्ती आहे. पहिल्या चरणात समाधीचे साधन काय आहे ? हा प्रश्न उपस्थित करून लगेचच त्याचे उत्तर देताना माऊली म्हणतात, अशी अवस्था प्राप्त करण्यासाठी नामस्मरणा सारखे दुसरे साधन नाही. ‘नामस्मरण, शांती, दयाबुद्धी आणि सर्वांप्रति समभाव ही समाधी अवस्था प्राप्त करण्याची साधने आहेत. नाम घेण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे अन् त्याच्या उच्चारण्याने मोक्ष मिळतो. एकतत्व नामाच्या उच्चारण्याने द्वैताची भावना कधीच निर्माण होत नाही. 

 शांतीची पै शांति निवृत्तिदातारु । हरिनाम उच्चारु दिधला तेणें ॥२॥

माऊली म्हणतात अशी ‘शांतीची पै शांती’ मला माझ्या गुरूंच्यामुळे, निवृत्तीनाथांच्यामुळे प्राप्त झाली आहे. गुरुच्या कृपेशिवाय ही अवस्था प्राप्त होणे कठीण आहे. हे हरिनाम मला माझ्या गुरुने दिले आहे. या नामाचा जप करून आंतरीक समाधानाचा मी पुरेपूर आनंद घेत आहे. नामस्मरणानेच माझ्या मनात समाधी अवस्था निर्माण झाली आहे.        

 शम दम कळा विज्ञान सज्ञान । परतोनि अज्ञान नये घरा ॥३॥

मन हे विषयांकडे सतत आकृष्ट होत असते. विषय लोलुप मनाला आवर घातला नाही तर नामस्मरण होणार नाही. शम म्हणजे अंत:करणाची उपरती, दम म्हणजे मनाचे आकलन. मनात निर्माण होणाऱ्या या विषयांच्या वासनांचे शमन आणि दमन करायला हवे. या ठिकाणी विज्ञान याचा अर्थ शास्त्र असा नसून विशेष ज्ञान असा आहे. नामस्मरणाचे हे विशेष ज्ञान प्राप्त होईल. विशेष ज्ञान प्राप्त झाल्यानंतर अज्ञान काय आहे हे आपसूकच लक्षात येईल. आणि या अज्ञानाचे ज्ञान झाले की ते पुन्हा परतोनी येणार नाही. म्हणजेच पुन्हा प्रज्ञापराध घडणार नाहीत. 

 ज्ञानदेवा सिध्दि साधन अवीट । भक्तिमार्ग नीट हरिपंथी ॥४॥

ज्ञानदेव म्हणतात, हीच साधना अवीटपणे करत रहाणे हीच सिद्धी आहे. याच भ‍क्तिमार्गाने हरीच्या जवळ जाता येते. हीच ती देहातीत अवस्था आहे. हेच अनुभवण्यासाठी असलेला मानव जन्म आहे आणि सद्गुरू कृपेने हा साधन मार्ग सुकर करून घेणे हे आपले कर्तव्य आहे. 

लेखक, संकलक - डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
(९८६९०६१८८९) 
 सुलेखन - डॉ. तेजस वसंत लोखंडे
(९७७३२६७००१) 

 या व वारीसंबंधी इतर अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी वाचा वारीवरील संकलित परिपूर्ण ग्रंथ “वारी जनातली, जनांच्या मनातली”.आपली प्रत मिळवण्यासाठी दिलेल्या फोन क्रमांकावर संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.