वारी जनातली, जनांच्या मनातली : अभंग माऊलींचे - १५

आषाढ शुद्ध अष्टमी, दिनांक २६ जून २०२३

 पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती । रत्नकीळा फांकती प्रभा ।
 अगणित लावण्य तेजः पुंजाळले । न वर्णवे तेथीची शोभा 
 कानडा हो विठ्ठलु कर्नाटकू । येणें मज लाविलें वेधीं ॥
 खोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी । आळविल्या साधु नेदी ॥२ ||
 शब्देंवीण संवादु दुजेविण अनुवादु । हें तंव कैसेंनि गमे ।
 परेहि परतें बोलणें खुंटलें । वैखरी कैसेंनि सांगे ॥३॥*
 पाया पडुं गेलें तंव पाउलचि न दिसे । उभाचि स्वयंभु असे ।
 समोर कीं पाठीमोरा न कळे । ठकचि पडिलें कैसें ॥४॥
 क्षेमालागीं जीव उतावीळ माझा । म्हणवूनि स्फुरताती बाहो ।
 क्षेम देऊं गेले तंव मीची मी एकली । आसावला जीव राहो ॥५॥
 बाप रखुमादेविवरू ह्रदयींचा जाणुनि । अनुभवु सौरसु केला ।
 दृष्टीचा डोळा पाहों मी गेलीये । तंव भीतरीं पालटु झाला ॥६॥

सगुण साकार, निर्गुण निराकार ही एकाच ईश्वराची रुपे आहेत. चराचरात भरून राहिलेल्या या ईशतत्वाची जाणीव करून देण्याचे कार्य संतांनी आपल्या अभंगातून करून दिले आहे. भक्तांना देवाची फारच आवड आहे. आपल्या आवडत्या व्यक्तिचे वर्णन करताना कोणीही व्यक्ति फारच भावनात्मक होते. त्याच्या रंगात रंगून जाते. त्याच्याबद्दल काय सांगू अन् किती सांगू असे होऊन जाते. त्या व्यक्तिचे व्यक्तिविशेष सांगतानाही एक वेग असतो. सांगताना कोणतीही गोष्ट आपल्याकडून राहून जाऊ नये, ही मनाची आंतरिक इच्छा असते. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाच्या भक्तित फारच रंगून जाते. जेव्हा माऊली विठ्ठल भक्तिच्या रंगात रंगून जाते तेव्हा त्यांची शब्दप्रतिभा फारच उच्च कोटीला पोहोचते. आपल्या या लाडक्या विठ्ठलाचे वर्णन ज्ञानेश्वर माऊली पांडुरंगाच्या रुपाच्या वर्णनाच्या या अभंगात करून देत आहेत. सगुण साकार ईशतत्वापासून त्याच्या निर्गुण निराकार रुपापर्यंतचा हा काव्यात्मक प्रवास अतिशय सुंदर आहे. 

 पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती । रत्नकीळा फांकती प्रभा । अगणित लावण्य तेजः पुंजाळले । न वर्णवे तेथीची शोभा ॥१॥

रत्नांचे सौंदर्य वर्णन करण्याची काही आवश्यकताच नाही. त्या रत्नावर प्रकाश किरण पडल्यानंतर त्यातून बाहेर पडणारे तेज, त्या प्रकाशाने निर्माण होणारी प्रभावळ केवळ अप्रतिम असते. माझ्या पांडुरंगाच्या कांतीतूनही अशीच दिव्य तेजाची अनुभूती दिसून येते. पांडुरंगाच्या कांतीतून बाहेर पडणारे तेज जणू काही रत्नातून बाहेर पडणाऱ्या तेजासम आहे. या तेजाने माझे डोळे दिपुन गेले आहेत. हे तेजपुंज लावण्य अक्षरश: अगणित रत्नांच्या तेजापेक्षाही अधिक तेजोमय आहे. या तेजाचे वर्णन मी कसे करू ? हे तेज इतके अलौकिक आहे याला शब्दांत मांडणे अशक्य आहे. 

 कानडा हो विठ्ठलु कर्नाटकू । येणें मज लाविलें वेधीं ॥ 

कानडा हो विठ्ठलु कर्नाटकू या चरणाचा अनेकदा कर्नाटकातून आलेला तो कानडा विठ्ठल असा अर्थ लावला जातो. मुघलांच्या आक्रमणाच्या काळात विठ्ठलाची मूर्ती कर्नाटकात स्थलांतरित केली होती अशी एक आख्यायिका आहे. तसेच विजयनगरच्या सम्राटाला कृष्णदेवरायाला विठ्ठलाच्या या रुपाची मोहिनी पडली म्हणून त्याने त्याला कर्नाटकात हम्पीला नेले अशीही एक वंदता आहे. कोणत्याही कारणाने असेना पण कर्नाटकात गेलेली ही विठ्ठलाची मूर्ती एकनाथ महाराजांच्या पणजोबांनी भानुदास महाराजांनी पंढरीला परत आणली अशी आख्यायिका आहे. म्हणून कानडा हो विठ्ठलु म्हटले की लोकांना कर्नाटकातून आलेला विठ्ठल असा संभ्रम निर्माण होतो. 

 कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा |
 वेदांनाही नाही कळला, अंतपार याचा ||

(ग. दि. माडगूळकर) गदीमांनी आपल्या या प्रसिद्ध गीतात विठ्ठलाच्या अनेक अगम्य रुपांची तसेच त्याच्या अनेक लीलांचे वर्णन केले आहे. माऊली म्हणतात हा विठ्ठल कानडा आहे म्हणजेच कळण्यास फारच कठीण आहे. कधी नाम्याची गुरे राखणारा हा विठ्ठल कधी चोखोबाची खीर चाखतो. भक्तांसाठी अनेक गोष्टी करणाऱ्या या विठ्ठलाच्या अनेक लीला आहेत त्यामुळे तो अगम्य आहे. तो अत्यंत दुर्बोध आहे, सहजासहजी कोणालाही कळत नाही. भक्तांसाठी तो निरनिराळी रुपे घेऊन येतो. भक्तांसाठी तो नाटक करतो म्हणून तो कर-नाटकु म्हणजेच कर्नाटकू आहे. त्याच्या या गुणांमुळेच त्याच्या रुपाचे मला वेध लागले आहेत. माझ्या मनाला त्याचा सतत ध्यास लागला आहे.

 खोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी । आळविल्या साधु नेदी ॥२॥

हा मायेची खोळ घेऊन मला खुणावतो आहे. माझा पदर पसरून मी त्याला आळवतो आहे. खोळ, बुंथी पांघरुन बसला आहे तो माझा पांडुरंग आहे, अंगावरची ही खोळ माझ्या ओळखीचाच पदर आहे. हा माझा जिवलग आळवणी करूनही मला साद का देत नाही ? त्याच्याशी माझा संवाद केवळ जाणिवेतच नाही तर नेणीवेतही होतो आहे. हा हृदयाचा संवाद त्याच्याशी सतत चालू आहे.   

 शब्देंवीण संवादु दुजेविण अनुवादु । हें तंव कैसेंनि गमे ।
 परेहि परतें बोलणें खुंटलें । वैखरी कैसेंनि सांगे ॥३॥

पांडुरंगा तुझ्या भेटीसाठी माझे मन फारच व्याकूळ झाले आहे. तुला माझ्या मनीचे गुज सांगायचे आहे. पण माझी स्थिती अशी झाली आहे की, माझ्या मनातल्या भावना मी तुझ्यापर्यंत पोहचवू शकत नाही. तुझे रुप समोर आल्यानंतर मला शब्दांची गरजच उरत नाही. संवाद हा दोघांमधला असतो. पण तुला भक्तांच्या मनातले सारे काही कळते. त्यामुळे तुला काही सांगायची गरजच उरत नाही. 

वाणीचे चार स्तर (चत्वार वाचा) आहेत. विचाराचं बीज नेणिवेत रुजणं ही परा-वाणी, त्यालाच आपण अव्यक्त ज्ञान असेही म्हणू शकतो. ते जाणिवेला दिसणं अथवा जाणवणे ही पश्यंति-वाणी, वाणीचे विचार रुप म्हणजेच मध्यमा-वाणी, आणि त्याचं प्रकट उच्चारण म्हणजे वैखरी. तुझ्याशी माझे संवाद हे शब्दावाचून घडत आहेत. नेणीवेतून चालू असलेल्या या प्रकटीकरणाला मध्यमा अन् वैखरीची काहीच गरज नाही आहे. 

 पाया पडुं गेलें तंव पाउलचि न दिसे । उभाचि स्वयंभु असे । 
 समोर कीं पाठीमोरा न कळे । ठकचि पडिलें कैसें ॥४॥
 क्षेमालागीं जीव उतावीळ माझा । म्हणवूनि स्फुरताती बाहो ।
 क्षेम देऊं गेले तंव मीची मी एकली । आसावला जीव राहो ॥५॥

सगुण साकार, निर्गुण निराकार ही दोन्ही त्याचीच रुपे आहेत. मी करत असलेली भक्ति नेणीवेतून चालू आहे अन् मी जाणि‍वेतून तुला पाहण्याचा प्रयत्न करत आहे. मला मुढाला कसे बरे तुझे रुप दिसेल. भक्तीभावाने मी पाय पडत आहे तर माझ्या आवडीची ती पावलंच सापडत नाहीत. मला जाणीव आहे तु स्वयंभू आहेस, तु भूतलावर कसा दिसशील ? मुळात जो सार्‍या चराचरात भरून राहिला आहे, त्याला चेहरामोहरा, पाठपोट असणार आहे का ? 

तुझ्यावरच्या प्रेमामुळे तुझे क्षेम करावे (आलिंगन द्यावे) अशी मनीची फार इच्छा आहे. तुला मिठी मारण्यासाठी माझे बाहू स्फुरण पावत आहेत. तुला मिठी मारली तरी मी मला तिथेही एकटीच दिसते. तु माझ्या मिठीत आहेस तरीही मी एकटीच आहे हे पाहून मी ठक (थक्क/स्तंभित) होऊन जाते. तुला कितीही भेटले तरी जीव व्याकुळच राहतो. 

 बाप रखुमादेविवरू ह्रदयींचा जाणुनि । अनुभवु सौरसु केला ।
 दृष्टीचा डोळा पाहों मी गेलीये । तंव भीतरीं पालटु झाला ॥६॥

हे सगळे घडत असताना मला एक गोष्ट जाणवते आहे. हा रखुमादेवीवरु या विटेवर नसून तो माझ्या हृदयातच आहे. विटेवरच्या मूर्तीला सोयरा समजण्यापासून निर्गुण निराकार ब्रह्माचा साक्षात्कार आपल्याच अंतरात होण्याचा हा अनुभव फारच सौरस (गोड) आहे. दृष्टीस जाणवणारे रूप, ते रूप पाहणारे डोळे, दृष्टीची अनुभूती जाणणारी बुद्धी ही सगळीच माया आहे. तु माझ्या हृदयातच आहेस हे मला जाणवले अन् माझ्या मनात पालट झाला. मला निजरूपाचा साक्षात्कार झाला.

लेखक, संकलक - डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
(९८६९०६१८८९) 
 सुलेखन- डॉ. तेजस वसंत लोखंडे
(९७७३२६७००१) 

 *या व वारीसंबंधी इतर अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी वाचा वारीवरील संकलित परिपूर्ण ग्रंथ “वारी जनातली, जनांच्या मनातली”. आपली प्रत मिळवण्यासाठी दिलेल्या फोन क्रमांकावर संपर्क साधावा.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.