वारी जनातली, जनांच्या मनातली : अभंग माऊलींचे - १४

आषाढ शुद्ध षष्ठी, शालिवाहन शक १९४५, दिनांक २५ जून २०२३
 
  
जाणीव नेणीव भगवंती नाहीं ।
हरि उच्चारणीं पाही मोक्ष सदां ॥१॥
नारायणहरी उच्चार नामाचा ।
 तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥२॥
 तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ।
 तें जीव जंतूंसी केंवि कळे ॥३॥
 ज्ञानदेवा फळ नारायण पाठ ।
सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥४॥

आपल्या अनेक अभंगातून संतांनी नामस्मरणाची महती सांगितली आहे. नामस्मरणाने अनेक गोष्टींचे लाभ साधकाला मिळत असतात. भगवंत नामाची आणि गुणांची महती इतकी थोर आहे की ती वेदांनाही सांगता आली नाही. वेदांनाही सांगता न आलेली ही महती सर्वसामान्यांना समजून येणे ही कठीणच गोष्ट आहे. भगवंताच्या नामाचे स्मरण करणे हे आपले परम कर्तव्य आहे. ज्याप्रमाणे मातेचा ओढा आपल्या तान्ह्या बाळाकडे असतो तद्वत भगवंताचा ओढा आपल्या अजाणत्या भक्तांकडे असतो. जाणिवेत असलेल्या आणि नसलेल्या दोघांसाठी हरिनामाचा उच्चार करणे हे फलप्रद आहे. हाच खरा मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे. हरिपाठ अभंग हे नाम साधनेला पुष्टी देणारे आहेत. त्यामुळे ते सर्व साधकांना मार्गदर्शक आहेत. 

जाणीव याचाच अर्थ समज, एखाद्या विषयाचे ज्ञान विषयाचे आकलन. या विरुद्ध नेणीव म्हणजे ज्ञानाचा अभाव, किंवा एखाद्या गोष्टीबद्दल अज्ञान. या अभंगाचा अभ्यास करताना आपल्याला काही कळत असले किंवा नसले तरी तुम्ही भगवंताला शरण गेला की मोक्ष प्राप्त होतो. ज्ञान असो वा नसो भगवंताच्या कृपेमुळे तुमचा उध्दार होतो. 

 जाणीव नेणीव भगवंती नाहीं ।
 हरि उच्चारणीं पाही मोक्ष सदां ॥१॥

भगवंताला आपलेसे करण्याची गरज जाणत्या आणि नेणत्या दोन्हीही भक्तांना असते. जाणता भक्त वेगवेगळ्या साधनांनी भगवंताला आपलेसे करण्याचा प्रयत्न करून स्वत:चा उद्धार करण्यासाठी सक्षम असतो. मात्र नेणत्या भक्ताला आपल्या उद्धाराचा मार्ग माहीत नसतो. 
नेणत्या तसेच जाणत्या भक्तांना या साधनांशिवाय मोक्षप्राप्तीचा जर कोणता मार्ग असेल तर हरिनामाचा मार्ग हा सगळ्यात सोपा मार्ग आहे, असे माऊली सांगतात. 

कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता आई आपल्या मुलांवर प्रेम करत असते. आईला नेहमीच आपल्या जाणत्या मुलांपेक्षा नेणत्या मुलांची जास्त काळजी असते. 

लेकुराचे हित वाहे माउलीचे चित्त |
ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती ||

संत हे नेहमी आईच्या भूमिकेत वावरताना दिसतात. म्हणूनच संत या अशा अज्ञानी लोकांची जास्त चिंता करत असतात. म्हणूनच ते अशा अज्ञानी लोकांना परमेश्वर प्राप्तीचा सोपा मार्ग दाखवत असतात.

 नारायणहरी उच्चार नामाचा । तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥२॥

दोन्ही भक्तांच्या उद्धाराचा मार्ग म्हणजे नामस्मरण आहे. हरि नामाच्या उच्चारणाने अनेक गोष्टी घडतात. मन:पूर्वक नामस्मरण करणाऱ्यांच्या मार्गात कळीकाळही आडवा येत नाही. शबरी, प्रल्हादाच्या गोष्टी आपण ऐकल्या आहेतच. खरे तर यांच्यासारखे अनेक जण भगवंतांकडे जाण्याच्या मार्गाबाबत अनभिज्ञ असतात. या भक्तांकडून नामस्मरण घडून आले आणि त्यांचा उद्धार झाला हे आपण सारे जाणतो.  

 तेथील प्रमाण नेणवे वेदांसी । तें जीव जंतूंसी केंवि कळे ॥३॥
 ज्ञानदेवा फळ नारायण पाठ ।  सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥४॥

या नामस्मरणाचा महिमा एवढा अफाट आहे की याचे आकलन वेदांनाही होत नाही. आपल्या सारख्या किंचित जीवांना ती कळण्याच्या पलिकडे आहे. पण या नामस्मरणाचे फळ म्हणजे सर्वत्र वैकुंठ केले जाते. म्हणजेच तुमच्या भोवतालची वैकुंठ निर्माण होते. आपल्या मनातले सगळे किंतु परंतु नाहीसे होऊन आपल्या जीवनाची शैली बदलून जाते. मनात इतरांबद्दल प्रीति भक्ति निर्माण होते, वैरभाव विरघळून जातो.

लेखक, संकलक - डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
(९८६९०६१८८९) 
 सुलेखन- डॉ. तेजस वसंत लोखंडे
(९७७३२६७००१) 

 या व वारीसंबंधी इतर अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी वाचा वारीवरील संकलित परिपूर्ण ग्रंथ “वारी जनातली, जनांच्या मनातली”.आपली प्रत मिळवण्यासाठी दिलेल्या फोन क्रमांकावर संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.