वारी जनातली, जनांच्या मनातली : अभंग माऊलींचे -१३

आषाढ शुद्ध षष्ठी, शालिवाहन शक १९४५, दिनांक २४ जून २०२३

 देवाचिया द्वारीं उभा क्षणभरी ।
 तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥
 हरि मुखें म्हणा हरिमुखें म्हणा ।
 पुण्याची गणना कोण करि ॥२॥
 असोनि संसारी जिव्हे वेगु करी ।
 वेदशास्त्र उभारी बाह्या सदां ॥३॥ 
 ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणें । 
 द्वारकेचे राणे पांडवां घरीं ॥४॥

वारकरी संप्रदायात हरिपाठला विशेष महत्त्व आहे. दिंडीच्या रोजच्या मुक्कामापूर्वी प्रत्येक दिंडीत हरिपाठ गाऊन माऊलीच्या मार्गावरची धूळ मस्तकाला लावून दिंडी आपल्या मुक्कामाला जाते. 

सर्व संतांनी भक्तीचा सहजसोपा मार्ग आपल्या हरिपाठातून दाखवला आहे. या संतांनी लोकांचे प्रबोधन करण्यापूर्वी भक्तिमार्गात जाण्याच्या काही अवास्तव कल्पना समाजात घर करून होत्या. घर-दाराचा त्याग करणे, निरनिराळी कर्मकांड करणे अशा काही अवास्तव प्रतिमा लोकांच्या मनात घर करून होत्या. त्या सगळ्या मळलेल्या वाटा संतांनी मुजवून टाकल्या. ज्ञानेश्वर महाराजांसह सर्व संतांनी जो हरिपाठ लिहिला त्यातून त्यांनी भक्तीचा सहज सोपा मार्ग समाजाला दाखवला आहे. संत म्हणतात आपले कर्तव्य टाळून, दिवसभर देवळे धुंडाळत देवाला शोधण्याची काहीही गरज नाही. केवळ क्षणभर मनापासून देवाच्या द्वारात उभे राहिले तरी चारी मुक्तीचे समाधान आपल्याला मिळते.

माऊलींनी संपूर्ण हरिपाठातून जे सांगायचे आहे त्याचे सार या पहिल्याच अभंगात सांगितले आहे. या अभंगाच्या पूर्वार्धात नामस्मरण कसे, कधी, कुठे करावे याचे विवेचन करून उत्तरार्धात नामस्मरणाचे फळ सांगितले आहे.  

 देवाचिया द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥

आपल्या अभंगांची रचना माऊलींनी फार खुबीने केली आहे. या अभंगांच्या मोजक्या शब्दातून फार मोठा अर्थ ध्वनित होतो. देवाचिये द्वारी या ठिकाणी हा देव नेमका कोणता याचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. सगुण साकार, निर्गुण निराकार अशी देवाची रूपे आपल्याला माहिती आहेत. या ठिकाणी माऊलींना अपेक्षित देव नेमका कोणता? या गोष्टीचा विचार करणे महत्त्वाचे आहे. माऊलींना डोळ्यांना दिसणारा मंदिरात भेटणारा देव नक्कीच अपेक्षित नाही. या ओवीच्या अर्थाच्या खोलात गेल्यानंतर आपल्याला देव म्हणजे संपूर्ण चराचर व्यापून असलेला तो देव, याची जाणीव होते. या सृष्टीतील प्रत्येक गोष्टीत, संपूर्ण चरचरात देव भरून राहिलेला आहे. थोडक्यात माऊलींना अपेक्षित देवाची आराधना करायची असेल तर त्यासाठी पाषाणमुर्ती असलेल्या देवळात जायलाच हवे असे नाही. अवघ्या चराचरात व्यापून असलेल्या या देवाला, मिळालेल्या वेळात कुठेही बसून आळवणे हाच ‘देवाचिये द्वारी’चा गर्भितार्थ आहे.   

तुकाराम महाराज देवाचे अस्तित्व सांगताना म्हणतात,

 चाले हे शरीर कोणांचिये सत्ते | कोण बोलविते हरिविण ||

या अभंगात या जगात देव आहे का हे सांगताना तुकाराम महाराज पुढे म्हणतात. 

 तुका म्हणे विठो भरला सबाहीं । तयां उणे कांही चराचरी ।|

देव हा संपूर्ण चराचरात भरून राहिला आहे. सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत तो आंतरबाह्य भरून राहिला आहे. 

देवाच्या या सच्चिदानंद रुपाचा साक्षात्कार व्हावा ही प्रत्येकाच्या मनाची इच्छा असते. हा अनुभव घेण्यासाठी नेमके काय करायला हवे? हे संतकृपेशिवाय समजत नाही. त्याच्या द्वारात  क्षणभर उभे राहून मुखाने हरि म्हणा, असे म्हणताना या देवाला भेटण्याचे हे द्वार कोणते आहे? 

विमानात बसताना वैमानिकावर श्रद्धा (विश्वास) नसेल तर कोणी बसेल का? ही श्रद्धा असल्याशिवाय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कोणी पोहोचेल का? 

देवावर श्रद्धाच नसेल तर देव भेटेल का? मनातल्या श्रद्धेशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही. भगवंताच्या भेटीचे हे द्वार म्हणजे तुझ्या मनातली श्रद्धा आहे. श्रद्धेने त्याची पूजा कर, भगवंत नक्की भेटेल. 

देवाचे नाम घ्यायचे तर नक्की झाले. पण हे नाम किती वेळ घेतले पाहिजे? ‘क्षणभरी’ या शब्दात फार मोठा गर्भितार्थ दडलेला आहे. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी केवळ एक क्षण पुरेसा असतो. या एका क्षणाने सुरुवात कर आणि नंतर तुझ्याकडे जेवढे मोकळे क्षण आहेत त्या प्रत्येक क्षणात त्या देवाचे नाव घे. म्हणजेच जेव्हा जेव्हा शक्य होईल त्या प्रत्येक क्षणाला देवाचे नामस्मरण होऊ दे. त्यामुळे तुला हे नामस्मरणाचे फळ मिळेल. किती सोप्या शब्दात माउलींनी देवाचे नाव कसे घ्यावे हे सांगितले आहे.

या नामस्मरणाची चार फळे आहेत. 
१) चारी मुक्तींचा लाभ
२) अगणित पुण्याची प्राप्ती 
३) वेदशास्त्रे आशिर्वाद देतील आणि 
४) भगवंत साधकाचे घरी वास करेल

नामस्मरणाचे पहिले फळ "तेणे मुक्ती चारी साधियेल्या" नामधारकाला चारी मुक्ती प्राप्त होतात. सलोकता, समीपता, सरुपता व सायुज्यता या चारही मुक्ती साधकाला जीवंतपणीच मिळतात. 

हरि मुखें म्हणा हरिमुखें म्हणा ।
 पुण्याची गणना कोण करि ॥२॥

नामस्मरणाने अगणित पुण्य प्राप्त होते. पुण्य मिळावे म्हणून लोक यज्ञयाग, दानधर्म, तीर्थयात्रा, व्रतवैकल्ये, उपास अशी नाना कर्मकांडे करतात. हे सर्व करताना देवाची भक्ती प्रधान नसते, तर त्यात केवळ भोगाची आसक्ती असते. केलेल्या दानाच्या जोरावर देवतांना प्रसन्न करुन सर्व मनोरथ सिध्दिस नेणे व मृत्यूनंतर स्वर्गलोक प्राप्त करुन घेणे ही आसक्ती असते. या विपरीत नामस्मरणाने जे पुण्य प्राप्त होते, ते शुध्द पुण्य होय. नामस्मरणाने मिळणाऱ्या पुण्याची गणना होऊ शकत नाही.

 असोनि संसारी जिव्हे वेगु करी । 
 वेदशास्त्र उभारी बाह्या सदां ॥३॥ 

संसार सोडून नामस्मरण करा असे संत कधीही सांगत नाहीत. संसारात राहून अनंत अडचणींना तोंड देत मनाचा तोल ढळू न देता नित्य नामस्मरण करणे हे अतिउत्तम आहे. प्रपंच साधत असताना मिळालेल्या वेळात आपल्या जिव्हेला नामस्मरणासाठी वेग द्या. संसारात असताना जो नामस्मरण करत रहातो अशा नामधारकाला वेद-शास्त्रे हात वर करून भरभरून आशीर्वाद देतात. 

ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणें ।
 द्वारकेचे राणे पांडवां घरीं ॥४॥

व्यासांनी महाभारताची निर्मिती केली. स्वयं भगवान श्रीकृष्णाचे पांडवांवरचे प्रेम त्यात पदोपदी दिसून येते. पाचही भावात अर्जुनाचे भगवंताशी विशेष सख्य होते. तो भगवंताचा खरा नामधारक होता. अर्जुनाच्या या प्रेमाखातर जसे भगवंत पांडवाघरी राबले तसेच हरीचे नाम घेणाऱ्या नामधारकांच्या घरी भगवंत वास करतात. 

थोडक्यात, देवाच्या प्राप्तीचे दार म्हणजे हरिनाम ते क्षणभर घेतले तर आत्मसाक्षात्कार दाखवणाऱ्या चारी मुक्ती साध्य होतात. त्या हरिनामाचे सतत स्मरण करणाऱ्याचे येवढे पुण्य होते की त्या पुण्याची गणती होत नाही. संसारात सर्वात घात करणारी जीभ आहे पण तिला हरिनामाचे वळण लावले तर सुख प्राप्त होते असे वेद सांगतात. हरिनामाने देव अंकित होऊन भक्ताचे सर्व कार्य त्याच्या घरी येऊन करतो ह्याची साक्ष व्यासानी दिली आहे असे माऊली सांगतात.

लेखक, संकलक - डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
(९८६९०६१८८९) 
 सुलेखन- डॉ. तेजस वसंत लोखंडे
(९७७३२६७००१) 

 या व वारीसंबंधी इतर अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी वाचा वारीवरील संकलित परिपूर्ण ग्रंथ “वारी जनातली, जनांच्या मनातली”. आपली प्रत मिळवण्यासाठी दिलेल्या फोन क्रमांकावर संपर्क साधावा.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.