वारी जनातली, जनांच्या मनातली : अभंग माऊलींचे - ८




आषाढ शुद्ध प्रतिपदा, शालिवाहन शक १९४५, दिनांक १९ जून २०२३

 आजी सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु ॥१॥
 हरि पाहिला रे हरि पाहिला रे। सबाह्यभ्यंतरीं अवघा व्यापक मुरारी ॥२॥
 *दृढ विटे मन मुळीं । विराजीत वनमाळी ॥३॥
 *बरवा संत समागमु । प्रगटला आत्मरामु ॥४॥
 *कृपासिंधु करुणा कर । बापरखुमादेविवर ॥५॥

माऊली ज्ञानदेवांच्या अभंगामध्ये भक्तिरस आणि स्वानुभवाचे मिश्रण पहायला मिळते. माऊलींचे म्हणणे असे आहे की ‘बहुता सुकृतांची जोडी, म्हणूनी विठ्ठल आवडी’ सुकृतांची जोडी यामध्ये ‘दुक्कल’ असा अर्थ अभिप्रेत नसून ‘जोडणे’ किंवा ‘सुकृत वाढवणे’ या अर्थी तो शब्द वापरला आहे. सुकृत म्हणजे चांगले कर्म, चांगल्या माणसांचा सहवास हे जेव्हा जोडले जाते तेव्हाच विठ्ठलाची आवड निर्माण होते. चंदनाच्या सुगंधापेक्षा या हरिची कथा गोड आहे. याची गोडी लागली की इतर कशाचीही गोडी वाटत नाही. 

 चंदनाचें परिमळें वाड | त्याहूनि कथा गोड विठ्ठलाची ||
 परिमळु सुमनीं जाई जुई मोगरे | त्याहूनि साजिरे हरि आम्हा ||

देव ही गोष्ट विज्ञानाने दाखविता येणारी नाही. ती केवळ अनुभवण्याची गोष्ट आहे. मनातला द्वैत भाव संपला की त्या परमात्म्याशी संवाद सुरू होतो. त्याच्याशी तादात्म्य पावता येते. त्याच्याशी तादात्म्य पावल्यानंतर त्याची अनुभूती यायला सुरुवात होते. हीच अनुभूती म्हणजे ईश्वराचे दर्शन होणे. चराचरात भरून राहिलेला ईश्वर दिसू लागतो. एखाद्या गोष्टीचा अनुभव येणे हे एक प्रकारचे ज्ञानार्जनच आहे. अनुभवाची 'स्मृतिभिन्नंज्ञानम्' अशी व्याख्या करता येऊ शकेल. अनुभूती ही इंद्रियांनी मिळणाऱ्या ज्ञानापेक्षा भिन्न आहे. स्मृतीपेक्षा वेगळे जे ज्ञान आहे त्याला अनुभव म्हणता येईल. ज्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा आहे त्या गोष्टीशी एकरूप झाले की मिळतो तो अनुभव. देव ही अशीच गोष्ट आहे जी विज्ञानाने दाखवता येणार नाही त्याची केवळ अनुभूती घेणे शक्य आहे. यालाच कदाचित साक्षात्कार म्हणत  असावेत. ईश्वरात लीन होणे, त्याची अनुभूती येणे म्हणजेच साक्षात्कार. म्हणूनच माऊली ज्ञानेश्वर म्हणतात,       

आजी सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु ॥१॥
हरि पाहिला रे हरि पाहिलारे । सबाह्यभ्यंतरीं अवघा व्यापक मुरारी ॥२॥
 दृढ विटे मन मुळीं । विराजीत वनमाळी ॥३॥
 बरवा संत समागमु प्रगटला आत्मरामु ॥४॥

माऊलींना देवाच्या रुपाचे दर्शन झाले आहे, भगवंताच्या रूपाची अनुभूती आली त्यामुळे त्यांना परमानंद झाला आहे. त्यांना झालेल्या आनंदामुळे त्यांचे मन शांत झाले आहेत. झालेल्या अत्यानंदाने काय बोलावे हेच त्यांना सुचेनासे झाले आहे. आज मला देवांच्या या देवाचे दर्शन झाले आहे. आज माझ्यावर अमृताच्या घनाने वर्षाव केला आहे. झालेल्या आनंदाने माऊली अमृताच्या वर्षावाने न्हाऊन निघाले आहेत. माझ्या देवाला मी अनंत रूपाने पाहिले, त्याच्या दर्शनाने माझ्या मनातले सगळे संदेह नाहीसे झाले आहेत. विटेवर उभे ठाकलेले रुप घेऊन असलेला तो वनमाळी, संपूर्ण चराचर व्यापून आहे. सगळ्या विश्वात भरून असलेल्या त्या विश्वनियंत्याचे मला दर्शन झाले आहे. आज मला त्याची अनुभूती आलेली आहे. मुक्याला जसा आपला आनंद व्यक्त करता येत नाही तशीच काहीशी माझी अवस्था झाली आहे. पंढरीरायाच्या दर्शनाने माझी जागृती, सुषुप्ती, स्वप्नावस्था नाहीशी झाली आहे. त्या रूपाकडे मी एकटक पहातच राहिलो आहे. बहुत सुकृतांची जोडी केल्यामुळे प्राप्त झालेल्या संत समागमामुळे आज माझ्या पदरी हे भाग्य पडले आहे. संतांच्या सहवासात राहिल्यामुळे माझे संचित फळाला आले आहे.

 कृपासिंधु करुणा कर । बापरखुमादेविवर ॥५॥

धन्य आहे तो संतसमागम कि ज्या संताच्या संगतीमुळे तो आत्माराम हृदयामध्ये प्रगट झाला आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते दयेचा समुद्र असून भक्तावर कृपा करणारे आहेत. त्या रखुमादेवीवरास आज मी चक्षूविण पाहिले आहे. देहाविण आलिंगन दिले आहे. तुम्हीही सुकृतांची जोडी करा म्हणजे तुम्हालाही विठ्ठलाच्या भेटीचा आनंद सापडेल. 

लेखक, संकलक - डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
(९८६९०६१८८९) 
 सुलेखन - डॉ. तेजस वसंत लोखंडे
(९७७३२६७००१) 


या आणि वारीसंबंधी इतर अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी वाचा वारीवरील संकलित परिपूर्ण ग्रंथ “वारी जनातली, जनांच्या मनातली”. आपली प्रत मिळवण्यासाठी दिलेल्या फोन क्रमांकावर संपर्क साधावा.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.