वारी जनातली, जनांच्या मनातली : अभंग माऊलींचे -५ (कानोबा तुझी घोंगडी चांगली )


ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशी, शालिवाहन शक, दिनांक १६ जून २०२३

कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हांसी कां दिली वांगली ॥ध्रु०॥
स्वगत सच्चिदानंदें मिळोनी शुध्दसत्त्व गुण विणलीरे ।
षडगुण गोंडे रत्नजडित तुज श्याम सुंदरा शोभलीरे ॥१॥
काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभुतांनी विणलीरे ।
रक्त रेत दुर्गंधी जंतु नरक मुतानें भरलीरे ॥२॥
षडविकार षडवैरी मिळोनि तापत्रयानें विणलीरे ।
नवाठायीं फाटुनी गेली ती त्त्वां आम्हांसि दिधलीरे ॥३॥
ऋषि मुनि ध्यातां मुखि नाम गातां संदेह वृत्ती विरलीरे ।
बापरखुमादेविवर विठ्ठले त्त्वत्पादी वृत्ति मुरलीरे ॥४॥

संत मंडळीनी आपल्या रचना लिहिताना त्यात अनेक अभंगात त्यांचे भगवंतांशी संभाषण चालू आहे. ही मंडळी आपल्या भगवंताशी एवढी तादात्म्य पावतात की, जणू काही आपल्या सख्यासोबत गप्पा करत आहेत. अन् कधीकधी तर त्याच्याशी मित्रत्वाच्या नात्याने चक्क भांडणही करतात. आजच्या गवळणीमध्ये माऊली विठूरायाशी भांडण करीत आहेत. आयुष्यात सगळ्या गोष्टी चांगल्या मिळायला हव्यात अशी प्रत्येकाची धारणा असते. आपल्याकडे नसलेल्या एखाद्या गोष्टीचे वैषम्य प्रत्येकाला नक्कीच वाटत असते. 

कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हांसी कां दिली वांगली ॥ध्रु०॥

संतांनी ईश्वराशी संवाद साधताना अशा अनेक रुपकांचा उपयोग केला आहे. संत कबीरांनी आपल्या दोहयातून या नश्वर शरीराला *चदरिया झीनी रे झीनी* असे म्हणून चादरीची उपमा दिली आहे, तर माऊलींनी आपल्या शरीराला घोंगडी म्हटले आहे. या अभंगात रुपकात्मक वापरलेली शरीर रूपी घोंगडी आत्म्याला झाकायचे काम करते आहे.  

माऊली ज्ञानेश्वर तक्रारीच्या सुरात आपल्या भगवंताला म्हणतात हे कान्होबा, तुझ्या आत्म्यावर असलेली ही घोंगडी किती चांगली आहे. मात्र आम्हाला दिलेली घोंगडी वांगली आहे. या घोंगडीमध्ये अनेक दोष आहेत. 

स्वगत सच्चिदानंदें मिळोनी शुध्दसत्त्व गुण विणलीरे ।
षडगुण गोंडे रत्नजडित तुज श्याम सुंदरा शोभलीरे ॥१॥

तुझी स्वत:ची घोंगडी तु स्वत: जाणीवपूर्वक विणली आहेस. आत्मानंद, सत् - चित् आनंदाचा तिथे सुंदर मिलाप झाला आहे. शुद्ध आणि सात्विक गुण ही तुझी ओळख आहे. त्यामुळेच सदचिदानंद आपसुक मिळतो. षडगुणाची सहा सुंदर रत्ने तुझ्या घोंगडीला जडवली आहेत त्यामुळे ती तुझ्यावर फारच शोभून दिसते आहे.

षड्गुण ऐश्वर्य संपन्न, एक भगवंतची जाण । तोच माझा विठ्ठल,तोच माझा पांडुरंग ।

असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. 

काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभुतांनी विणलीरे ।
रक्त रेत दुर्गंधी जंतु नरक मुतानें भरलीरे ॥२॥

काम, क्रोध, अविद्या, त्रिगुण अन पंचभूतांनी माझी घोंगडी विणली आहे. तिला अत्यंत दुर्गंधी येत आहे.  
एखादी वस्तू जशी आहे, त्या स्वरूपात तिचे ज्ञान न होता त्याऐवजी ती जशी नाही त्याचे ज्ञान होते, यालाच अविद्या असे म्हणतात. शब्दाच्या आधी ‘अ’ जोडल्यास त्याचा अभाव सूचित होतो. अविद्या किंवा अज्ञान या शब्दामधील ‘अ’ हा विद्येचा किंवा ज्ञानाचा अभाव सूचित करत नाही, तर विपरीत ज्ञान सूचित करतो. आमच्या घोंगडीला काम, कर्म, अविद्या अशी ठिगळे तु जोडली आहेस त्यामुळे ती अत्यंत दुर्गंधीने भरून गेली आहे.  

इतकेच नाही तर आमच्या घोंगडीला षडविकारांना (अस्तित्व, जन्म, वाढ, तारुण्यावस्था, जर्जरता आणि मृत्यू) सामोरे जायचे आहे. षडरीपूंनी (काम, क्रोध, मद, मोह, मस्तर आणि लोभ) ग्रासले आहे. आमच्या घोंगडीला तापत्रयाचा (अध्यात्मिक, आधिदैविक व आधिभौतिक) ताप आहे. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून जाणारा मर्त्य मानवाला आपल्या विषयांवर काबू मिळवायला खूपच कष्ट करावे लागतात. हे षड्रिपू या जीवनात पदोपदी मानवाला सुकर्माकडून कुकर्माकडे ओढत असतात. जणू काही हे षडविकार आणि षडरीपू शरीररूपी घोंगडीला जीर्ण करायला टपुन बसले आहेत. अशी तापत्रयी या घोंगडीला ताप देणारच आहे. 

षडविकार षडवैरी मिळोनि तापत्रयानें विणलीरे ।
नवाठायीं फाटुनी गेली ती त्त्वां आम्हांसि दिधलीरे ॥३॥

अशी ही ‘नवाठायी’ म्हणजेच अनेक ठिकाणी फाटलेली घोंगडी तु आम्हाला आमच्या आत्म्याला पांघरायला दिली आहेस, या अशा फाटक्या घोंगडीमूळे आमची आत्मोन्नतीला कशी साधणार? अशा या घोंगडीने आमच्या आत्म्याची शुद्धी होईल का रे कान्होबा? 

या सगळ्यातून मुक्त होण्याचा काही तरी मार्ग असेलच ना ? या वांगल्या घोंगडीतून काही चांगले निघेलच ना ? सगळ्या प्रश्नांचे अत्यंत सोपे उत्तर आहे नामस्मरण करणे. 

ऋषि मुनि ध्यातां मुखि नाम गातां संदेह वृत्ती विरलीरे ।

जेव्हा तुझे नामस्मरण केले जाते तेव्हा मनात असलेले सगळे किंतु परंतु निराकरण होतात. मनात कसलाच संदेह रहात नाही. थोडक्यात जेव्हा नामस्मरणात रममाण होतो तेव्हा मनातले सगळे द्वेषभाव, अहंभाव नाहीसे होतात. अखेर हा नाम महिमाच असा आहे की तिथे कोणताही संदेह उरत नाही. 

बापरखुमादेविवर विठ्ठले त्त्वत्पादी वृत्ति मुरलीरे ॥४॥

अत्यंत सुंदर शब्दांत माऊलींनी अखेरच्या चरणात विठ्ठलाचे गुणगान केले आहे. हे विठ्ठला, रखुमादेविच्या वरा, तुझ्या चरणी मी स्वताला लीन केले आहे. तुझ्याच चरणी माझी सारी वृत्ती मुरली आहे, मी माझ्यातले सगळे दोष तुझ्या चरणी अर्पण केले आहेत. तुझ्या नामस्मरणात गुंग होऊन मी मलाही उत्तम बनवायचा प्रयत्न करेन. म्हणजेच माझीही घोंगडी चांगली होईल.

लेखक, संकलक - डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
(९८६९०६१८८९) 
 सुलेखन - डॉ. तेजस वसंत लोखंडे
(९७७३२६७००१) 

 या व वारीसंबंधी इतर अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी वाचा वारीवरील संकलित परिपूर्ण ग्रंथ “वारी जनातली, जनांच्या मनातली”.. आपली प्रत मिळवण्यासाठी दिलेल्या फोन क्रमांकावर संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.