ज्येष्ठ कृष्ण एकादशी, शालिवाहन शक १९४५, दिनांक १४ जून २०२३.
अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्हीं लोक ॥१॥ जाईन गे माय तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥ सर्व सुकृताचें फ़ळ मी लाहीन । क्षेम मीं देईन पांडुरंगी ॥३॥ बापरखुमादेवीवरु विठ्ठलेंसी भेटी । आपुले संवसाटी करुनि ठेला ॥४॥
ज्ञानाचा सागर आणि योगियांची माऊली असलेल्या ज्ञानेश्वर माऊली चराचर संसाराबद्दल या अभंगात विवेचन करीत आहेत. संसारात प्रत्येकाला अनेक विवंचना आहेत. अवघा संसार, आपल्या आजूबाजूचा हा जनसमुदाय अनेक दु:खांनी ग्रासलेला आहे. संसारातील विवंचनांमुळे जीवनाचा आनंद घ्यायला तो विसरला आहे. या विवंचनेतून बाहेर पडले तरच जगण्याचा अन् जगाचा आनंद घेणे सगळ्यांना शक्य होईल. कोणत्याही गोष्टीचा आनंद घ्यायचा असेल तर सर्वप्रथम सर्व दुखांचे जे कारण आहे ते मन आनंदी व्हायला हवे. जगाचा आनंद घ्यायचा असेल तर सर्वप्रथम मनुष्य मनातून आनंदी व्हायला हवा.
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुखी संसाराची वाट दाखवली. याच्या आचरणाने त्तिन्ही लोक आनंदाने भरून जातील हा विश्वास दिला आहे. संसारात आनंदी रहाण्यासाठी आवश्यक असेलेल्या मनाचे महत्त्व माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात सांगितले आहे. ४१२ ते ४१७ या ओव्या चंचल मनाबद्दल आहेत.
अर्जुनालादेखील प्रश्न पडला होता. जीवनात आनंदी रहाण्यासाठी मन हे फार महत्वाचे आहे. हे मन म्हणजे नेमके काय आहे? त्याचे स्वरूप काय आहे? न कसे आहे? केवढे आहे? हे शोधायचा कितीही प्रयत्न केला तरी ते मन सापडतच नाही. आत्ता सापडले असे वाटत असताना क्षणात ते कुठेतरी दूर जाते. या मनाच्या भटकण्याला त्रैलोक्यही कमी पडते. ते बुद्धीला सतत विषयांकडे ओढत असते. अन हेच सर्व दुखांचे कारण आहे.
मन पाखरू, पाखरू, त्याची काय सांगू मात | आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात || मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।
मनाच्या चंचलतेचे वर्णन करताना बहिणाबाईंनी अत्यंत समर्पक उपमेने मनाची चंचलता दाखवून दिली आहे. माणसाचे मन ही फार चंचल गोष्ट आहे. क्षणात इथे असलेले मन क्षणात दुसरीकडे जाते हा अनुभव आपल्या सगळ्यांनाच येत असतो. मनातून आनंदी असणे ही तशी फार शुल्लक गोष्ट भासली तरी ती तेवढी सहजसाध्य नाही याची जाणीव पदोपदी होत असते. मनात योजलेले कोणतेही कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी इंद्रियांची गरज लागते. केवळ मनोनिग्रह करून कार्य होत नाही. संसारातल्या प्रत्येक दु:खाचे कारण म्हणजे विषयाच्या मागे धावणारे मन आहे. कितीही आवरायचा प्रयत्न केला तरी मन विषयाच्या मागे जातेच. आयुष्यात सुख प्राप्त करायचे असेल तरी इंद्रियनिग्रह फार महत्वाचा आहे. मन विषयांच्या मागे गेले तरी आपली इंद्रिय त्याच्या मागे जाऊ देणे टाळायला हवे.
असंशयं महाबाहो मनो दुरनिग्रहं चलम् | अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गुह्यते ||
श्रीकृष्ण म्हणतात ‘हे अर्जुना, मन हे नि:संशय चंचल असून निग्रह करण्यासाठी अत्यंत कठीण आहे. परंतु हे पार्थ, अभ्यासाने आणि वैराग्याने याचा निग्रह करता येतो.’
अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्हीं लोक ॥१॥
हा अवघा संसार दुःखरूप आहे असे माऊली म्हणतात. हा अवघा संसार ब्रह्मस्वरूपी मिथ्या आहे. आणि सर्व मिथ्या गोष्टी अधिष्ठान रूपी आहेत. विषयाने भरलेल्या आहेत. हा संसार सुखाचा करण्यासाठी मी आवश्यक असे ज्ञान संपादन करून ते इतरांना देऊन हा संसार सुखरूप म्हणजे सुखाचा करेन. हा संसार सुखाचा झाला की तीनही लोक आनंदाने भरून जातील. जगात सगळे सुखी आनंदी होतील.
जाईन गे माय तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥
सर्व सुकृताचें फ़ळ मी लाहीन । क्षेम मीं देईन पांडुरंगी ॥३॥
बापरखुमादेवीवरु विठ्ठलेंसी भेटी । आपुले संवसाटी करुनि ठेला ॥४॥
हे ज्ञान मिळवण्यासाठी मी पंढरीच्या वारीची कास धरेन. पंढरपूर हे माझ्या माहेरासारखे आहे. माहेरात सगळेच हट्ट पुरवले जातात. आजवर मी केलेल्या सर्व सुकृतांचे फळ पांडुरंगांकडून मागून घेताना, मी विठूमाऊलीला आलिंगन देईन. अशा प्रकारे मागितलेली कोणतीही गोष्ट नाकारली जात नाही ही मला खात्री आहे. पंढरीत जाऊन रखुमादेवीवर विठ्ठलाला भेटलेला कोणताही भक्त आजवर रिकाम्या हाताने आलेला नाही. त्याच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण झालेली आहे. माझी ही अवघा संसार सुखाचा करण्याची इच्छाही माझा पांडुरंग पार पाडणार याची मला खात्री आहे.
लेखक, संकलक - डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
(९८६९०६१८८९)
सुलेखन - डॉ. तेजस वसंत लोखंडे
(९७७३२६७००१)
या व वारीसंबंधी इतर अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी वाचा वारीवरील संकलित परिपूर्ण ग्रंथ “वारी जनातली, जनांच्या मनातली”..आपली प्रत मिळवण्यासाठी दिलेल्या फोन क्रमांकावर संपर्क साधावा.*