मिठबाव येथील गजबादेवी मंदिर सुविधा प्रकल्पाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची चालना, आणि जाग्या झाल्या 'धर्मवीरांच्या' आठवणी !


राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत विविध पर्यटन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. राज्यात पर्यटनवाढीसाठी मोठा वाव असून प्रत्येक विभागातील पर्यटनस्थळांचा दर्जा वाढवितानाच पर्यटकांच्या सोयीसाठी त्याठिकाणी चांगले रस्ते, दळणवळणाची साधने, निवासाची दर्जेदार व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मिठबाव येथील गजबादेवी मंदिर सुविधा प्रकल्प यांना मंजुरी देण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिठबाव येथील गजबा देवी मंदिर परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याबाबत आराखडा सादर करण्यात आला. भाविकांसाठी चांगल्या सुविधा देतानाच बगीचे, रस्ते करून पर्यटनवाढीसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

बैठकीस महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय आदी उपस्थित होते. यावेळी नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी सादरीकरण केले.

आणि जाग्या झाल्या दिघे साहेबांच्या आठवणी..

बरोबर २५ वर्षापूर्वी आमदार रवींद्र फाटक साहेबांच्या आग्रहास्तव दिघे साहेब देवगडला आलेले तेव्हाची ही आठवण.

फाटक साहेबांची कुलदेवी श्री गजबादेवी मंदिराचे नूतनीकरण व बांधकाम त्यांनी पूर्ण केले होते.या मंदिराचे उदघाटन हे धर्मवीर व आपले गुरुवर्य आनंद दिघे साहेब यांच्याच हस्ते व्हावे अशी इच्छा फाटक साहेबांची होती.

दिघे साहेबांना त्यांनी हि ईच्छा बोलून दाखवली परंतु व्यस्त कार्यक्रमामुळे दिघे साहेब येणं टाळण्याचा प्रयत्न करत होते.परंतु देवीची भक्ती व फाटक साहेबांची ईच्छा होती म्हणून शेवटी दिघे साहेब विमानाने व्हाया गोवा देवगडला आले व मंदिराचे उदघाटन केले.


मंदिराचा परिसर व समोरील अथांग समुद्र पाहून "रवी तू हे खूप मोठे काम केले आहे व या देवीचा आशिर्वाद सदैव तुझ्यावर राहील" असे दिघे साहेबांनी त्यावेळी फाटक साहेबांना सांगितले. "मी आलो नसतो तर या मनमोहक क्षणाचा मी अनुभव घेऊ शकलो नसतो म्हणून रवी तू न बोलवता पण मी दरवर्षी देवीच्या दर्शनासाठी येणाचं प्रयत्न करेन" असे उद्गार धर्मवीरांनी काढले होते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या आई गजबादेवी मंदिराच्या विकास निर्णयामुळे पुन्हा एकदा कोकणात धर्मवीर आनंद दिघे यांच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.