छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य हे रयतेचे राज्य होते. सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी जगभरात असलेले शिवकालीन साहित्य आणि वस्तूंचे सांस्कृतिक कार्य विभागातर्फे संकलन करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचा प्रारंभ गेट वे ऑफ इंडिया येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवकालिन शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, सौ. सपना मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, उपसचिव विलास थोरात, श्रीनिवास वीरकर, विनीत कुबेर आदी उपस्थित होते. आज पहिल्या दिवशी महानाट्य : ‘जाणता राजा’चे सादरीकरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे, मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शस्त्र प्रदर्शनाची पाहणी करून सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच कलाकारांनी सादर केलेल्या युद्धकला प्रात्यक्षिकांनाही दाद दिली.
यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज अतिशय कुशल संघटक आणि प्रशासक होते. याची साक्ष शिवाजी महाराजांनी बांधलेले गड, किल्ले पाहिल्यावर येते. शिवाजी महाराजांनी रयतेची काळजी घेतली. त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त किल्ले रायगडावर शुक्रवार २ जून रोजी कार्यक्रम होत आहे. हा क्षण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सुरू असलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आणि या विभागाचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांचे कौतुक केले.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, शिवराज्याभिषेक सोहळ्यास २ जून रोजी किल्ले रायगडावर प्रारंभ होईल. या सोहळ्यात राज्यातील १ हजार १०८ नद्या आणि जलाशयातील पाण्याने अभिषेक करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे आणि जगदंबा तलवार पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार वाघनखे दर्शनासाठी देण्याचे ब्रिटन सरकारने मान्य केले आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या सेनापतींवर आधारित टपाल तिकिटांचे प्रकाशन या कालावधीत व्हावे, असा प्रयत्न सुरु आहे. त्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय, राज्यभर महानाट्य ‘जाणता राजा’चे प्रयोग करण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराजांवरील सर्वोत्कृष्ट दहा चित्रपटांचा महोत्सव आयोजित करण्यात येईल. या वेगवेगळ्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात येतील, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.