नवीन कामगार नियमांना मान्यता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कामगारांना बळ देणारा मंत्रिमंडळ निर्णय


केंद्र शासनाने सर्व २९ कामगार कायदे एकत्र करून ४ कामगार संहिता तयार केल्या आहेत. व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता 2020 या चौथ्या संहितेसाठी राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. नवीन कामगार नियमांना मान्यता दिल्याने लाखो कामगारांचे हित जोपसले जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहितेस मान्यता दिल्याने 100 पेक्षा जास्त कामगारांना कारखान्यांमध्ये उपहारगृह बंधनकारक असेल. 250 पेक्षा जास्त कामगारांना कारखान्यात कल्याण अधिकारी, 50 पेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखान्यात पाळणाघर अशा काही तरतुदी लागू केल्या जातील. वेतन संहिता 2019, औद्योगिक संबंध संहिता, 2020, सामाजिक सुरक्षा संहिता 2020 या 3 संहितांच्या नियमांना राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

केंद्र शासनाने 1999 मध्ये माजी केंद्रीय कामगार मंत्री रविंद्र वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा श्रम आयोग नेमला होता. या आयोगाने सर्व 29 कामगार कायदे एकत्रित करुन या 4 कामगार संहिता तयार करण्याची शिफारस केली होती. या 4 संहिता अधिनियम संसदेने पारित केले आहेत. कामगार हा विषय समवर्ती सूची मध्ये समाविष्ट असल्याने केंद्र शासनाने सर्व राज्यांसाठी एकत्रित संहिता तयार केली आहे. 

सर्व संहितांची अंमलबजावणी सर्व राज्यांमध्ये एकत्रितरित्या करावयाची असल्याने राज्यांनी संबंधित संहितांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने नियम पारित करणे आवश्यक आहे. त्यानुसार केंद्र शासनाने व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता अधिनियम, 2020 प्रसिध्द केले आहेत. या अधिनियमात राज्यांना समुचित शासन व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती (कामगार) संहिता नियम तयार करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार या संहितेस मान्यता देण्यात आली आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.