सावरकर म्हणजे उत्तुंग भरारी , सावरकर म्हणजे क्षितिजझेप..याच आभाळव्यापी विचारांना राजकीय मर्यादांची आकुंचन येत होत्या. याच आकुंचनाच्या साखळदंडांना तोडण्याचे काम आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानं केवळ सावरकरप्रेमीच नाही, तर अवघा भारतवर्ष सुखावला. सावरकर नाव उच्चारण्याची जिथे धैर्यक्षमता नेतृत्वात नव्हती त्याच राजकीय पटलावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दोन धाडसी निर्णय सावरकर नावाला विरोध करणाऱ्या सर्वांना चारी मुंड्या चित करणारे आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दोन ऐतिहासिक निर्णय
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे – वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू’ असे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुंबईतील एक भव्यदिव्य प्रकल्प म्हणून वांद्रे – वर्सोवा सागरी मार्गाकडे पाहण्यात येतेय. याच प्रकल्पाला आता स्वातंत्र्यवीर यांच्या नावाची ओळख मिळाली आहे. मुंबईतील वांद्रे – वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू’ असे मोठ्या अभिमानाने उच्चारण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाने आज सर्वांना मिळाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आणखी एका निर्णयाचे आता राज्यभरासह देशभर कौतुक होतंय. केंद्र सरकारच्या शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवर अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. सावरकर म्हणजे अतुलनीय शौर्य या उक्तीला साजेसा असा हा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा निर्णय आहे.
या दोन मोठ्या घोषणा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विषद केलेले स्वातंत्र्यवीर समजून घेणे काळाची गरज आहे.
"स्वातंत्र्यवीरांचे श्रेष्ठत्व, त्याग, बलिदान, देशभक्ती ही सर्वश्रुत आहे. या देशाचे, राज्याचे व मातीचे सुदैव स्वा. सावरकर यांच्यासारखे क्रांतिकारक येथे जन्माला आले. प्रखर देशभक्तीमुळे त्यांची इंग्रजांमध्ये दहशत होती. संपूर्ण सावरकर समजून घेणं अशक्य व अवघड आहे, परंतु त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास हिंदुत्वाचा सुगंध आपल्याला नक्कीच येईल. स्वदेशीचे कट्टर पुरस्कर्ते, महान क्रांतिकारक, सक्रिय समाजसुधारक अशा विविधांगाने त्यांची ओळख होती. ते प्रतिभावंत साहित्यिक, कवी होते तसेच अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते आणि भाषिक गुलामगिरी दूर करण्यासाठी इंग्रजीला त्यांनी अनेक पर्यायी शब्द उपलब्ध करून दिले", असे म्हणत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शब्दसुमने अर्पण केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या भविष्यवेधी निर्णयासाठी प्रसिद्ध आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा समाजासमोर आदर्श मांडण्याची गरज आहे, आणि म्हणूनच मुख्यमंत्री शिंदे यांचे दोन निर्णय अत्यंत महत्वाचे मानले जातात. यावर्षीपासून दरवर्षी ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन‘ साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे सांगून यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.