वादळवाऱ्याला भिडणार प्रशासन, मुख्यमंत्र्यांचा एक्शन प्लॅन ठरला !


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत राज्यातील सर्व यंत्रणांच्या मान्सूनपूर्व तयारीचा आज सर्वंकष आढावा घेण्यात आला. येत्या पावसाळ्यात आपत्तीमुळे जीवितहानी होऊ नये यासाठी दक्ष रहावे. शोध मोहिम -बचाव आणि सुटकेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. या काळात सर्व अधिकाऱ्यांनी चोवीस तास फोन सुरु ठेवावेत. आपत्तीवर मात करण्यासाठी जिल्हा-विभाग ते राज्यस्तरीय सर्व यंत्रणांतील अधिकाऱ्यांनी उत्तम संपर्क आणि समन्वय राखावा, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या बैठकीत दिले.

लष्कर, नौदल, हवाई, तटरक्षक दल, एनडीआरएफ, रेल्वे यांनीही पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व ती तयारी केली आहे.  एनडीआरएफची १८, एसडीआरएफची सात पथके, नौदलाची १० पथके, तटरक्षक दलाची ६ पथके, हवाई दलाची मिग ७० हेलिकॉप्टर्स, तसेच या सर्वच पथकांकडे बोटी,उपकरणे अनुषंगिक गोष्टींची सज्जता ठेवण्यात आली आहे.


कोकणासाठी काय निर्देश ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक पार पडली. याच बैठकीत कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पाचा देखील आढावा घेण्यात आला.
विविध नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढत असून प्रत्येक विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावेत तसेच पालिकांनी देखील त्यांच्या स्तरावर आपत्ती काळात तत्काळ बचाव कार्य करणारी पथके तयार करावीत, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या. राज्य आपत्ती धोके व्यवस्थापन निधीचा प्रभावीपणे खर्च करा तसेच कोकण आपत्ती सौम्यीकरण कामे त्वरित सुरु करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

राज्यात कोकण भागास वारंवार वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वीच ३२०० कोटी रुपये कोकणात विविध आपत्ती निवारण कामे करण्यासाठी मंजूर केले आहेत. यामध्ये भूमिगत वाहिन्या, धूप प्रतिबंधक बंधारे, बांध घालणे, बहुउद्देशीय चक्रीवादळामधले आसरे बांधणे, दरडी प्रवण क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाय, वीज अटकाव यंत्रणा यांचा समावेश आहे. यासंदर्भातील तांत्रिक कार्यवाही पूर्ण करीत ही कामे तत्काळ सुरु करावीत अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  दिल्या.

आपत्तीप्रवण भागाचे आधुनिक तंत्रज्ञानाने डिजिटल मॅपिंग करा. प्रतिसाद आणि शोध-बचाव आणि सुटका यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपकरणांची मदत घ्या. यापूर्वीच भूस्खलन झालेल्या भागातील नागरिकांशी संवाद साधा. पुन्हा काही लोक त्या भागात रहिवासासाठी गेले असतील, तर त्यांची माहिती घ्या. भूस्खलन, दरडी आणि जमीनीच्या अनुषंगाने होणाऱ्या हालचाली या भागातील नागरिकांना माहित असतात. त्याबाबत त्यांच्याशी संवाद साधा. त्यांचे स्थलांतर आणि पुनर्वसनाबाबत आतापासूनच तयारी करा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

पंचनाम्यांच्या पद्धतीत सुधारणा करून मोबाईल एपद्वारे पंचनामे करावेत यासाठी एमआर एसएसी या कंपनीस नियुक्त केले आहे. यातून केल्या जाणाऱ्या ई-पंचनाम्यानुसार १५ दिवसांत बाधितांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी व्यवस्था तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.