कार्गो शिपिग बोट बंदीच्या परिपत्रकाचा सरसकट नियम स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना लावून बंदर विभागाने येथील सागरी जलपर्यटन बंद केले आहे.
प्रत्यक्षात पर्यटन जिल्ह्यासाठी स्वतंत्र जलपर्यटन परिपत्रकाची गरज आहे, असे मत पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी व्यक्त केले.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील जलपर्यटन २६ मे ते ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश बंदर विभागाने दिल्याने संपूर्ण सागरी जलपर्यटन ऐन पर्यटन हंगामात बंद झाले असून पर्यटन व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे.
ज्या परिपत्रकाने ही जलपर्यटनाची बंदी घालण्यात येते, ते परिपत्रक शिंपीग कार्गो बोटींगसाठी असून दरवर्षी त्याचा वापर करून संपूर्ण किनारपट्टी बंदी केली जाते. वास्तविक सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक, जिल्ह्यात होणाऱ्या खाडी क्षेत्रातील जलक्रीडा तसेच समुद्र किनाऱ्यावर होणारी जलपर्यटन ७ ते ८ पेक्षा सागरी फॅदम क्षेत्रात होत असताना यासाठी स्वतंत्र जलपर्यटन परिपत्रक बनविणे गरजेचे आहे. दरवर्षी पर्यटन व्यावसायिकांच्या असंघटितपणाचा फायदा घेऊन बंदर विभाग बंदी आदेश काढून जलपर्यटन व्यावसायिकांवर अन्याय करत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून राज्य व केंद्राने मान्यता देऊन २५ वर्षे पूर्ण झाली, तरीही जिल्ह्यातील प्रशासकीय पद्धतीमध्ये पर्यटन क्षेत्रासाठी आवश्यक परिपत्रक न बनल्यामुळे त्याचा नाहक मनस्ताप जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांना होत आहे. पावसाळी हंगाम १० जूननंतर सुरू होत असून याचाही विचार प्रशासनाने करावा. हा विषय स्थानिक व वरिष्ठ मुख्य बंदर अधिकारी यांच्याशी बोलून या परिपत्रकात जल पर्यटनासाठी बदल व्हावा, यासाठी महासंघ प्रयत्नशील आहे.
मुख्य बंदर अधिकाऱ्यांकडून स्थानिक जल पर्यटन व्यावसायिकांस सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास पर्यटन महासंघास असल्याचेही मोंडकर यांनी पत्रकात म्हटले आहे.